महावितरणची ग्राहकांना मोठी सवलत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 April 2020
  • ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली माहिती.

मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील उद्योग व्यवसाय बंद असल्याने विजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. तथापि आता केंद्र आणि राज्य सरकारने काही भागात उद्योग सुरु करण्यास परवानगी दिल्याने उद्योगांना वीज पुरवठा करण्यासाठी आपला विभाग सज्ज झाला आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या संकटामुळे घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रिडींग घेण्यात येणार नाही. मागील महिन्याच्या सरासरी बिलावरुन वीज देयक तयार करण्यात येईल. मार्च महिन्याचे बिल १५ मेपर्यंत तर चालू एप्रिलचे बिल ३१ मे पर्यंत भरण्याची सवलत देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर पुढील तीन महिने स्थिर आकार लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून वीजदर कमी करण्याचा मोठा निर्णय झाला असून ही मोठी उपलब्धी आहे. या निर्णयामुळे राज्यातील उद्योग आणि व्यवसाय वृद्धीसाठी मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

नियामक आयोगाच्या निश्चितीनंतर राज्यातील वीज दर सरासरी ७ टक्के कमी करण्यात आले आहेत. वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज दर येत्या पाच वर्षात वापर आकारानुसार सुमारे १० ते १५ टक्के कमी करण्यात आलेलआहेत. तर घरगुती विजेचे दर हे वापर आकारानुसार ५ टक्के एवढे कमी करण्यात आले आहेत. औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना वाढीव वीज वापरांवर ७५ पैसे प्रति युनिट सवलत राहणार आहे. कृषी ग्राहकांना कोणतीही वीज दरवाढ करण्यात आलेली नाही. सोलर रुफ टॉप वापरणार्या ग्राहकांना कोणताही अतिरिक्त भार लागू राहणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचा गौरव करणार

लॉकडाउनच्या काळात २४ तास वीज पुरवठा करण्याचे आव्हान होते. या काळात वीज पुरवठा अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले अशा कर्मचाऱ्यांना योग्य बक्षीस देऊन गौरविणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्र्यानी दिली.
  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News