मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम परीक्षा घेतल्या शिवाय पदवी देऊन नये, असा निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारला परीक्षेसंदर्भात निर्णय करणे भाग पडले आहे. आता अंतिम परीक्षेसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. 'विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत न बोलवण्यावर राज्य सरकार ठाम आहे. काल यासंदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिला असून विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचे एकमत झाले आहे', अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षेचा निर्णय घेणारी एक समिती राज्य सरकारने गठित केली होती. या समितीने अहवाल तयार केला आहे. त्यांच्याशी बैठक घेऊन परीक्षा कशी घ्यायची हे ठरवले जाईल, असे सामंत म्हणाले. 'कुलगुरूंनी आणखी एक दिवस नियोजनासाठी मागितला आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी ४ वाजता अंतीम निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देणार आहोत', असे ते म्हणाले.
राज्यातल्या ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रांवर परीक्षा द्यायला जावे लागू नये यासाठी सुरक्षित आणि सोपा पर्याय निवडत आहोत, असे उच्च शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेण्याची सूचना केली आहे. तर काही विद्यापीठांनी १० नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेण्याची सूचना केली. आता बुधवारपर्यंत याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
कशी असेल परीक्षा? काय म्हणाले मंत्री?
- कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालच्या समितीने परीक्षेसंदर्भात सूचना शासनाला कळवल्या आहेत.
- एकूण ७,९२,३८५ विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठांना घ्यायची आहे.
- पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात येईल.
- परीक्षा कमी मार्कांची असेल, म्हणजे विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही.
- विध्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत यावर आम्ही ठाम.
- ऑनलाईन परिक्षेमध्येही अनेक प्रकार आहेत. MCQ, OMR किंवा असाईनमेंट पद्धतीमधून परीक्षा घेता येईल याचा विचार होईल.
- ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात परीक्षेचा निर्णय होऊ शकतो.
- मुंबई युनिव्हर्सिटीने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीची UGC कडे मागणी करावी अशी विनंती केली आहे.
- यशवंतराव मुक्त विध्यापीठाने आणि अमरावतीने १० नोव्हेंबरपर्यंत परीक्षेसाठी मुदत मागितली आहे.
- दोन दिवसात आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक लावून UGC कडे मागणी करणार आहोत.
- विध्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.
- काही कुलगुरूंनी सूचनांसाठी अजून एक दिवस मागितला आहे.
- परीक्षा आणि निकालाची तारीख, एटीकेटीचे काय यासंदर्भात निर्णय घेऊ.
- विध्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचे एकमत झाले आहे
- परवाच्या बैठकीत टाइम टेबलबाबत आखणी करू आणि मुख्यमंत्र्यांकडे माहिती ठेऊ.
उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी १२ वाजता राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होणार आहे. त्यानंतर परीक्षा समितीची बैठक ४ वाजता होईल. त्यात जो निर्णय होईल तो शासनासमोर मांडण्यासाठी शेवटची बैठक घेण्यात येईल.