...तर बच्चू भाऊ कडू जीवंत राहिले नसते, आणि मी ट्रेकिंग कायमचं सोडलं असतं

डॉ. शिवरत्न शेटे
Tuesday, 14 April 2020
  • हिंदवी परिवार हिवाळी मोहीम 7 ते 9 जाने 2012

आजपर्यंतच्या पन्हाळगड, पावनखिंड पावसाळी मोहीम असो, किंवा मी आयोजित केलेल्या कोणत्याही मोहिमेत बच्चूभाऊ सहभागी असायचेच, आम्ही मात्र सर्वजण राजगड पायथ्याशी गुंजवणे या गावी जमलो चढाई करायला सुरुवात ही केली, पद्मावती माचीवर पोहोचलो, सर्वांचं रात्रीचे भोजनही झाले, अनेकजण येऊन म्हणू लागले की यावेळी बच्चूभाऊ कदाचित येणार नाहीत? मी मात्र ठाम होतो, की कोणत्याही परिस्थितीत भाऊ येणारच, आम्ही झोपलो, सकाळी सकाळी कोवळं ऊन पडलं होतं, आणि बघतो तर काय, बच्चूभाऊ दिसले, विचारलं तेंव्हा त्यांनी सांगितलं की,

"मुंबईवरून पुणे ते नसरापूरमार्गे गुंजवणेला येण्यास रात्रीचे 10 वाजले, एका गावकऱ्यांला घेऊन मध्यरात्री 12:30 ला राजगडावर पोहोचलो, तुम्हाला झोपेतून कशाला उठवायचे म्हणून तसाच झोपलो" (पद्मावती मंदिराच्या ओट्यावर हा आमदार रात्रभर झोपला) दिनांक 08 जानेवारी 12 वाजता दुसरा दिवस उजाडला, आमच्या ठरल्या वेळापत्रकानुसार...

सुवेळा माची, नेढे, बालेकिल्ला त्यावरील अष्टकोनी दरवाजा, तेथील देवळीत पुरलेले अफजलखानाचं मुंडकं हा सर्व इतिहास कथन करून झाल्यानंतर उर्वरित किल्ला बघून संजीवनी माची बघायला प्रारंभ केला, दुहेरी तटबंदी तळापासून वरपर्यंत बच्चूभाऊना दाखवत होतो, जगातील सर्वात मजबूत अशा किल्ल्याची, अशी वेगळ्या धाटणीची तटबंदी बघून, त्याचा विशाल घेरा बघून, भाऊ उपरोधिक म्हणायचे  की आजचं पीडब्लूडी आणि अभियंते एवढं बांधु शकतील? अन्  किती अवास्तव पैसे खर्च करतील" आम्ही सर्वजण हसत होतो, त्याच दिवशी आम्ही पाली दरवाजा दाखविला.  दिनांक 25 सप्टेंबर1666 ला याच दरवाज्यातून आग्र्यालाहून सुखरूप निसटून आलेले महाराज, गोसाव्याच्या पेहरावात वेषांतर करून राजगडावर दाखिल झालेले होते. आणि मी हाच प्रसंग... त्याच ठिकाणी व्याख्यानातून उभा केला होता.

पाली दरवाज्याच्या  पायऱ्यावर बसून बच्चूभाऊसह सर्वांनी व्याख्यान ऐकले, त्या दुसऱ्या रात्री मुक्काम राजगडावर होता, मशालीच्या प्रकाशात माझे रात्री  शिवरायांच्या अर्ध्या आयुष्याचा साक्षीदार, 'राजीयांचा गड आणि गडांचा राजा राजगड' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

दिनांक 9 जानेवारी 2012 तिसरा दिवस उजाडला. ठरल्या प्रमाणे आम्ही संजीवनी माची मार्गे जड अंत:करणाने राजगड सोडला, आणि तिथूनच... उतरून, तोरणा किल्ल्याला जोडणाऱ्या छोट्या डोंगराने (शिराडाने)... काही तास चालून गेल्यावर, तोरण्यावर चढायला सुरुवात केली. अगोदरच आमच्या #Rescue_Teamने, दोर बांधलेली होतीच, त्याच्या साहाय्याने सर्वजण वर चढले, तोरण्यावरील बुधला माचीजवळ समांतर सर्वजण चढाई करीत होते.

15 फुटाचा एक पट्टा, अत्यंत निमुळता, अरुंद, आणि चुकून घसरल्यास धरायला खडक, कपार, झाडाच्या फांद्या असे काहीच नाही फक्त जांभ्या खडकाची बारीक खडी असलेला अत्यंत निसरडा पट्टा, दोन्ही बाजूस खोल दऱ्या, असा किल्ल्यावरील भिंतीवजा, भाग तिथून एकेकजण पुढे जात होता, आम्ही सर्वजण मागे मागेच चालत होतो, माझी त्यावेळी 10 वर्षे वय असलेली मुलगी आर्या ही सरसर तो डेंजर झोन क्रॉस करून गेली, पाठोपाठ अमोल मोहिते, आणि सोलापूरातील प्रसिद्ध अशा Nutsया स्वीट मार्टच्या शृंखलेचे मालक भावेश शहा यांची मुलगी मौसम शहा, हिला मी बोललो की तुझी पाठीवरची सॅक मला दे अन् मग क्रॉस कर, तिने ती सॅक मला दिली नाही, (चुकून ती घसरली आणि खोल दरीत पडून काही अघटित घडले तर कच्छ गुजरातहुन सोलापूरात स्थायिक झालेले तिने ट्रेकिंगचा आग्रह केला म्हणून कन्याहट्ट म्हणून माझ्या विश्वासावर तिच्या वडिलांनी सोबत पाठविलेले असल्याने त्या भावेश शहाना काय सांगणार ही भीती मनात होती) तीने तो टप्पा पार केला. 

आता बच्चू भाऊ तो टप्पा ओलांडत असताना, त्यांचा स्पोर्ट शूज स्लिप होऊन ते अचानक घसरले, खाली हजारो फूट खोल दरी... माझ्यासहित सर्वांचे श्वास रोखल्या गेले... सुदैवाने त्यांच्या हाताला डोंगरातला छोटासा दगड (बुडत्याला काठीचा आधार ह्या वाक्प्रचार अर्थ  त्यावेळी कळला) हातात आला,आणि खाली दरीत कोसळणे वाचले, सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला, (आता याच काही फुटाच्या धोकादायक पॉईंटला साखळी बांधल्याचे कळते) पुढे आम्ही मंदिरात बसलो, बच्चू भाऊ आणि माझ्यासहित ट्रेकिंगला आलेले शेकडो शिवभक्त सुन्न झालेले होते, अर्धा तास कोणीच कोणाला बोलत नव्हतं, बच्चू भाऊनी स्वतःचे मरण डोळ्यांनी बघितले होते, ते त्यानंतर बोलले... "मी राजगडाच्या मावंद्याचं जेवण अचलपूरला गेल्यावर सर्वांना घालतो (पूर्वी प्रवास पायी घोड्यावर असायचा, काशीला जाऊन जीवंत परत आल्याचे celebration म्हणून मावंद्याचं जेवण घालण्याची प्रथा होती) खरं सांगू ... जर त्या दिवशी, घसरत जाणाऱ्या बच्चूभाऊना तो छोटासा दगड धरायला सापडला नसता... आणि भाऊ... दरीत कोसळले असते तर जीवंतच राहिले नसते, आणि  मी आयुष्यातून ट्रेकिंग कायमचं सोडलं असतं, आणि त्यानंतर बच्चूभाऊ पुन्हा कोणत्याही किल्ले भ्रमंतीला (ट्रेकिंग) येणार नाहीत असं वाटत असताना त्यानंतरही आम्ही आयोजित केलेल्या हिंदवी परिवाराच्या प्रत्येक मोहिमेला हा अवलिया सहभागी झालाय, पन्हाळगड ते पावनखिंड या 52 किलोमीटरच्या दरवर्षी जुलै महिन्यात असणाऱ्या, रिमझिम पावसात होणाऱ्या या पदभ्रमंतीत बच्चू कडू हे गेल्या 13 वर्षांपासून अखंडितपणे सहभागी असतात, आणि हिवाळी मोहिमेत दरवर्षी नवीन भूभागावरील किल्लेभ्रमंतीत आजवर रायगड, राजगड, तोरणा, साल्हेर (महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीचा किल्ला) मुल्हेर, मांगी तुंगी, अंकाई टंकाई, इंद्राई धोडप, मकरंदगड, रायरेश्वर प्रतापगड, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड, जीवधन नाणेघाट, शिवनेरी, विसापूर लोहगड राजमाची, अगदी 2018 ला  त्यांच्या विदर्भातील गडकोट नरनाळा आणि त्यांच्या अचलपूर या अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघातील किल्ले गाविलगड ह्या  मोहिमेच्या वेळी.... 

राजगडावरुन जीवंत वापस आल्याने त्यांनी तिथे कबुल केलेलं मावंद्याचं पंचपक्वान्न जेवण, अगदी मुलीचा बाप, एखादया मुलाकडच्या वऱ्हाडाची बडदास्त ठेवावी अशी व्यवस्था 850 ट्रेकर्सची आमदार बच्चूभाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. प्रा. नयना कडू यांनी केली. बच्चूभाऊच्या जागी दुसरा कोणताही आमदार राहिला असता आणि ट्रेकिंग करताना मृत्यूच्या जबड्यातून वाचून आला असता तर त्याने आयुष्यात काहीच पुन्हा किल्लेभ्रमंती केली नसती. परंतु, बचेंगे तो और भी लडेंगे या दत्ताजी शिंदेंच्या ऐतिहासिक स्वाभिमानी वक्तव्याची प्रचिती उभ्या महाराष्ट्रास बच्चूभाऊच्या रूपाने आली. बच्चूभाऊनी मात्र मृत्यूची पर्वा न करता. आयुष्यात शरीर साथ देईल तोपर्यंत आमच्यासमवेत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक युद्धभूमीवर आणि गडकोटांवर अखंडपणे येण्याचा केलेला संकल्प म्हणजे आचरणकर्ता शिवभक्त काय असतो त्याचे ज्वलंत प्रतीक होय.

(लेखक हिंदवी परिवाराचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आहेत. संपर्क- 9272710020)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News