बेळगावात नाट्यचळवळ पुन्हा बहरतेय... 

जितेंद्र शिंदे
Tuesday, 19 February 2019

लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नेपथ्य, ध्वनी योजना, प्रकाश योजना, वेशभूषा, नाट्यगीत गायन अशा सर्व बाजू समर्थपणे पेलत येथील तरुण पिढी झपाट्याने आश्‍वासक वाटचाल करते आहे. गेल्या काही वर्षांत येथील तरुण पिढीवर नाट्यकलेचे चांगले संस्कार झाल्याचे दर्शन बेळगावकरच्या नाट्यरसिकांना वेळोवेळी घडते आहे. नवनवीन कलाकार या क्षेत्रात दमदारपणे वाटचाल करताना दिसतात. बेळगावकर नाट्यरसिकही अशा उपक्रमांना उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत.

वरेरकर नाट्य संघ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा, नाट्यांकुर, शारदोत्सव महिला समिती, कॅपिटल वन सोसायटी आदी संस्थांनी बेळगावच्या नाट्यचळवळीला बळ देण्याचे कार्य केले आहे. याशिवाय विविध महाविद्यालयांमधील सांस्कृतिक विभागही आपापले योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील कॉमन टच प्रॉडक्‍शन्स, रंगभूमी ग्रुप, बेळगाव थिएटर्स असोसिएशन, क्रुसेडर्स थिएटर, खानापूरचा सुखकर्ता कला जिज्ञासू नाट्य संघ आदींनी विविध ठिकाणी एकांकिका, नाटके सादर करत व पारितोषिके पटकावत बेळगावचा झेंडा नाट्यक्षेत्रात दमदारपणे फडकवत ठेवला आहे.

वरेरकर नाट्य संघ ही बेळगावातली एक जुनी संस्था. येथील नाट्यपरंपरा जपण्यात या संस्थेचे मोलाचे योगदान आहे. या संघातर्फे यापूर्वी बेळगावबरोबरच महाराष्ट्र व गोवा येथे अनेक ठिकाणी नाटके सादर केली होती. या संस्थेने मध्यंतरी काही वर्षे एकांकिका स्पर्धांचे यशस्वी आयोजनही केले होते. नाट्यांकुर संस्थेच्या संस्थापिका प्रा. डॉ. संध्या देशपांडे यांनीही विविध नाटके, एकांकिका सादर करत बेळगावचे नाव रोशन केले आहे. महिलांमध्ये नाट्यगुण विकसित करण्याचे काम शारदोत्सव महिला समितीने केले आहे.

पूर्वी पुरुषच महिलांच्या भूमिका करायचे; मात्र शारदोत्सवात पुरुष पात्रेही महिलाच समर्थपणे साकारतात. एवढेच नव्हे, तर नाट्यलेखनासह सर्व जबाबदाऱ्या महिलाच पेलतात. त्यांचा अभिनय तर थक्क करणारा असतो. याशिवाय गेली नऊ वर्षे "कॅपिटल वन' सोसायटीतर्फे एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. मागील महिन्यात एसकेई सोसायटीच्या गोविंदराम सक्‍सेरिया विज्ञान महाविद्यालयातर्फे आंतरराज्य-आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. 

पुन्हा स्पर्धांचे आयोजन गेल्या काही महिन्यांत तर नजरेत भरणारे कार्य बेळगावच्या नाट्यक्षेत्रात घडते आहे. महाराष्ट्र शासनाच्या संस्कृती संचालनालयाच्या मराठी भाषा विकास विभागातर्फे आयोजित "रंगवैखरी' पर्व दुसरे नाट्य सादरीकरण स्पर्धेनेही बेळगावच्या नाट्यपरंपरेला बळकटी दिली आहे. येथील ज्योती महाविद्यालयातर्फे सादर झालेल्या "द्रोण' एकांकिकेने विभागीय पातळीवर प्रथम; तर महाअंतिम फेरीत चौथा क्रमांक मिळवला. रोख 50 हजार रुपयांचे बक्षीस देऊन या संघाचा गौरव झाला, तर प्रणाली पेडणेकर हिला लेखनाचा रोख 15 हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. याच एकांकिकेने जीएसएस कॉलेजतर्फे आयोजित स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला. 

कोल्हापूरची छाप 
बेळगावात मागील महिन्यात आयोजित केलेल्या कॅपिटल वन आणि जीएसएस महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धांत कोल्हापूरने आपली छाप सोडली. जिल्ह्यातील अनेक संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. खुल्या गटात रुद्रांश ऍकॅडमीच्या "इट हॅपन्स'ने तृतीय क्रमांक पटकावला; तर बालनाट्य स्पर्धेत शिंदे ऍकॅडमीच्या "ठोंब्या ठोंबीची गोष्ट'ला प्रथम; तर रुद्रांशच्या "श्री श्री 108 दगड'ला तृतीय क्रमांक मिळाला. तसेच अनेक वैयक्‍तिक पारितोषिकेही कोल्हापूरच्या कलाकारांनी पटकावली.

बेळगाव वैभवशाली नाट्यपरंपरा जपणारे शहर. मराठी नाट्यपरंपरेला दिग्गज कलाकार बहाल करणारी ही भूमी. मध्यंतरी कानडीकरणाच्या रेट्याखाली या नाट्यचळवळीला मरगळ आली होती; मात्र अलीकडे बेळगावचे नाट्यवैभव आता पुन्हा एकदा बहरू लागले आहे.

- बसवंत शहापूरकर 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News