असे असणार खेळांचे “अनलॉक 3” सरावास सुरुवात हेच समाधान : खेळाडूंची भावना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • खुल्या वातावरणातील काही मर्यादित खेळांना राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे, पण हे करतानाही प्रामुख्याने बंदिस्त वातावरणात होणाऱ्या बॅडमिंटन, जिम्नॅस्टिकलाही खुल्या वातावरणात सराव करण्यास सांगितले आहे.
  • जिम्नॅस्टिकच्या काही प्रकारात सराव खुल्या मैदानात होत असतो, पण बॅडमिटनचे स्पर्धक बंदिस्त स्टेडियममध्येच सराव करतात.

मुंबई :- खुल्या वातावरणातील काही मर्यादित खेळांना राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे, पण हे करतानाही प्रामुख्याने बंदिस्त वातावरणात होणाऱ्या बॅडमिंटन, जिम्नॅस्टिकलाही खुल्या वातावरणात सराव करण्यास सांगितले आहे. जिम्नॅस्टिकच्या काही प्रकारात सराव खुल्या मैदानात होत असतो, पण बॅडमिटनचे स्पर्धक बंदिस्त स्टेडियममध्येच सराव करतात. कमालीचा सुरक्षित जाणारा नेमबाजी हा खेळ बंदीस्त स्टेडियममध्ये प्रामुख्याने होतो. अर्थात या खेळातीलच नव्हे, तर अनेक क्रीडा पदाधिकारी तसेच क्रीडा प्रेमींना सरावास सुरुवात झाली हेच सध्या समाधान आहे.

५० टक्के सरावापासून वंचित

जिम्नॅस्टिकचा सराव हा खुल्या मैदानात होत असतो. व्हॉल्टिंग हॉर्स, रोमन रिंग्ज, हॉरिझॉंटल बार या प्रकारावरील कसरतीसाठी लागणारी जागा तसेच या साहित्याची उंची लक्षात घेतल्यास त्याचा सराव खुल्या मैदानातच होत असतो. रोमन रिंग्ज आणि हॉरिझॉंटल बारवरील कसरतीसाठी हॉलची उंची खूपच जास्त आवश्‍यक असते. त्यामुळे अगदी मुंबईतील काही ठिकाणीही याचा सराव खुल्या मैदानातच होत असतो, असे महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव मकरंद जोशी यांनी सांगितले.

ओपन बॅडमिंटन हौशींसाठीच

आंतरराष्ट्रीय स्पर्धात पंच असलेल्या उदय साने यांनी खुल्या मैदानातील बॅडमिंटनचा सराव खेळाडू नव्हे तर केवळ हौशीच लोक करतात असे सांगितले. आता हे कोर्ट चारही बाजूंनी बंद आहे आणि त्याला छप्पर नाही तर तो सराव खुल्या कोर्टवरचा असणार की, बंदिस्त कोर्टवरचा, अशीही विचारणा केली.
बॅडमिंटनची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत खूप वाढली आहे. त्यामुळे स्पर्धा सहभागही वाढला आहे. मुंबईच नव्हे, तर भारतात पावसाळ्याच्या मोसमात बॅडमिंटन स्पर्धांचे प्रमाण जास्त असते, पण सध्या सरावच झालेली नाही. आऊटडोअर बॅडमिंटन हा नवा खेळ तर सुरू झालेला नाही ना, अशी टिप्पणी काही बॅडमिंटन अभ्यासकांनी केली, त्याच वेळी त्यांनी अनेक ठिकाणी यापूर्वी खुली असलेली कोर्ट आता बंदिस्त झाली आहेत याकडे लक्ष वेधले.

बॅडमिंटन खेळात शटलवरील नियंत्रण मोलाचे आहे. वारे वाहत असताना सराव करताच येणार नाही, याकडे बॅडमिंटन मार्गदर्शक श्रीकांत वाड यांनी लक्ष वेधले. वाड यांनी देशातील अनेक राज्यांत बॅडमिंटनच्या सरावास परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातही देण्यास हरकत नाही याकडे लक्ष वेधले.

स्पर्धांबाबत नियम हवेत

मल्लखांबाच्या सरावास मान्यता दिली आहे, हे ऐकून चांगले वाटले. आम्हाला एकावेळी सर्व खेळाडूंना सरावास बोलावण्याऐवजी त्याच्या तुकड्या करणे भाग पडेल. ही एक तुकडी 10 ते 15 जणांची असू शकेल. मल्लखांबमधील पुरलेला मल्लखांब तसेच दोरीवरचा मल्लखांब प्रत्येकाने करण्यापूर्वी त्याचे निर्जंतुकीकरण करावे लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सध्या नवोदितांना कठीण असलेल्या आसनांऐवजी ते स्वतःच करू शकतील यावर भर द्यावा लागेल. अर्थात, मार्गदर्शक त्यांच्या सुरक्षेसाठी नजीक उभे राहतील असे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन आरक्षण सक्तीचे

नेमबाजी हा सुरक्षित खेळ आहे. त्यामुळे आम्ही सरावास परवानगीसाठी राज्य सरकारकडे आग्रही होतो. अर्थात, त्या वेळीही सरावास परवानगी दिली तरी नेमबाज सरावाच्या ठिकाणी येणार कसे, हा प्रश्‍न होताच. आम्ही सरावाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन आरक्षण करण्याचा विचार करीत आहोत, असे राज्य नेमबाजी संघटनेचे अशोक पंडित यांनी सांगितले.

आता खुल्या वातावरणात सरावास परवानगी दिली आहे, त्यामुळे रेंजवर एअर पिस्तूल आणि एअर रायफल हे सोडून अन्य प्रकारांत सराव होऊ शकेल. अर्थात बहुतेक नेमबाज याच प्रकारातील आहेत. आता काहींचा सराव सुरू होत आहे असे त्यांनी सांगितले.

नेमबाजीत स्पर्धकांत सुरक्षित अंतर असतेच. आम्ही एक लेन सोडून सराव सुरू करण्यास परवानगी देणार आहोत. त्यामुळे क्षमता निम्म्यावर येईल. त्यामुळे रेंजवरील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन लेन आरक्षणाचा विचार करीत आहोत. आम्ही रेंज निर्जंतुक करणार आहोत, पण त्याचबरोबर स्पर्धकांनीही सरावापूर्वी तसेच सरावानंतर हात निर्जंतुक केले, तर काहीही प्रश्‍न येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टेनिसपटूंसाठी फायदा

टेनिसच्या सरावास मंजुरी दिल्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या अंकिता रैना, पुरव राजा यांसारख्या खेळाडूंना प्रामुख्याने होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होत आहेत. त्यासाठी तयारी करण्याची संधी आता महाराष्ट्रातील टेनिसपटूंनाही मिळणार आहे. त्यांच्यासाठी हा निर्णय जास्त फायदेशीर आहे, असे राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील बहुतेक कोर्ट डेकोटर्फची आहेत, त्यामुळे या कोर्टवर पाऊस नसताना सहज सराव शक्‍य होतो. आता सराव तसेच प्रशिक्षणावर मर्यादा असतील. आता सरावातील प्रत्येक खेळाडूंचे चेंडू वेगळे असतील. एका कोर्टवर चौघे सराव करू शकतील. अजूनही सर्व सुविधा लहान मुलांसाठी नाहीत, त्यामुळे नवोदित गटातील खेळाडूंना कोर्टपासून दूरच राहावे लागेल. त्याचबरोबर बुजुर्गही नसतील. सरावानंतर शॉवर घेण्यास, कपडे बदलण्यास प्रतिबंधच असेल असेही त्यांनी सांगितले.
 

---------------------------
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News