या करणामुळे डॉक्‍टरांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 April 2020

त्यामुळे राज्यात आतापर्यंत 212 पेक्षा अधिक डॉक्‍टरांना कोरोनाची बाधा झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले आहे. 

मुंबई: पीपीई किटचा तुटवडा असल्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना निकृष्ट दर्जाचे सुरक्षा पोषाख वापरावे लागत आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 212 पेक्षा अधिक डॉक्‍टरांना कोरोनाची बाधा झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्यामुळे डॉक्‍टरांसह सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दर्जेदार पीपीई किट देण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.

सरकारी व खासगी रुग्णालयांतील डॉक्‍टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारीवर्ग कोरोनाच्या प्रादुर्भावाशी दोन हात करत आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कामुळे बाधा होऊ नये यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दर्जेदार पीपीई पोषाख वापरणे अत्यावश्‍यक आहे. सरकारने सरकारी रुग्णालयांना दर्जेदार पीपीई संच दिले असले, तरी खासगी रुग्णालयांत त्यांची कमतरता आहे. त्यामुळे नाइलाजाने तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध असणारे हलक्‍या दर्जाचे पीपीई पोषाख वापरावे लागत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढलेअसून, आतापर्यंत 212 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, काही जणांना क्वारंटाईन करावे लागले आहे.

कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी किंवा इतरांना बाधा होऊ नये यासाठी 90 जीएसएम गुणवत्तेचे पीपीई पोषाख आवश्‍यक असतात. सध्या आपल्याकडे साधारणत: 50 जीएसएम गुणवत्तेचे पीपीई पोषाख उपलब्ध आहेत. त्यातून संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरविंद भोंडवे यांनी सांगितले. कोरोनासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने रुग्णालयांसाठी अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत; मात्र त्यांचे पालन होत नाही. रुग्णालयांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह प्रत्येक रुग्णाला मास्क आणि पीपीई किट देणे आवश्‍यक आहे असेही ते म्हणाले. अनेक खासगी रुग्णालयांत विलगीकरण कक्षाची सुविधा नसल्याने सर्व रुग्णांना एकत्र ठेवण्यात येते; त्यातूनही संसर्ग पसरत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय आवश्‍यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एकवाक्‍यता नसल्याने गोंधळ?

कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकवाक्‍यता नाही. परस्परविरोधी सूचना येत असल्यानेही गोंधळ उडत आहे, असा आरोप डॉ. अरविंद भोंडवे यांनी केला. अधिकाधिक लोकांना कोरोना चाचणी करणे शक्‍य व्हावे यासाठी जास्तीत जास्त खासगी प्रयोगशाळांना परवानगी देणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News