सावधान ! तुमची 'ही' सवय एका नव्या आजाराला आमंत्रण ठरू शकते 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डॉक्‍टर, तज्ज्ञ सतत हात धुण्याचा सल्ला देतात.

मुंबई : कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डॉक्‍टर, तज्ज्ञ सतत हात धुण्याचा सल्ला देतात. अनेक जण या गोष्टी तंतोतंत पाळतही आहेत; मात्र कोरोनाच्या साथीपूर्वीपासून असे अनेक जण आहेत जे विनाकारण वारंवार हात धुतात. हात धुतल्यानंतरदेखील आपले हात अस्वच्छच असल्याचे त्यांना वाटते. त्यामुळे ते अगदी कपडे धुण्याच्या साबणानेदेखील हात धुत राहतात. ही सर्व ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर या आजाराची लक्षणेही असू शकतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सध्याच्या कोरोना संकटकाळात या आजाराकडे अनेकांचे लक्ष न जाण्याची शक्‍यता आहे. हा एक मानसिक आजार आहे. बीबीसीच्या एका अहवालानुसार कोरोना काळात या आजाराने ग्रस्त लोकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अशा व्यक्तींना प्रत्येक वस्तूमध्ये विषाणू, बॅक्‍टेरिया किंवा घाण असल्याचा भास होतो. त्यामुळे ते वारंवार हात धुतात आणि साफसफाई करत राहतात; मात्र तरीही त्यांच्या मनाचे समाधान होत नाही. आपण हात स्वच्छ धुतले आहेत किंवा साफसफाई योग्यप्रकारे केली आहे, यावर त्यांचाच विश्‍वास नसतो. अनेक वर्षे संशोधन केल्यानंतरही या आजाराचे नेमके कारण शोधण्यात यश आलेले नाही. मात्र मेंदूमधील सिरोटोनिन हे रसायन कमी झाल्याने एखादे काम अपूर्ण असल्याचा भास होत राहतो. त्यामुळे पीडित व्यक्ती ते काम वारंवार करत राहतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शौचालयास जाणेही टाळतात
वारंवार हात धुणे, आंघोळ करताना शरीर स्वच्छ झाले नाही असे वाटून तासनतास आंघोळ करणे, संपूर्ण दिवस साफसफाई करत राहणे, स्वत:वर विश्‍वास नसल्याने स्वच्छतेबाबत दुसऱ्या लोकांना विचारणे. आपले हात अस्वच्छ होतील, वारंवार धुवावे लागतील म्हणून अशी लोक शौचालयासदेखील जाणे टाळतात. अशा व्यक्ती दरवाजाची कडी व्यवस्थित लागली नाही म्हणून वारंवार तपासतात तसेच विजेचा स्वीचही वारंवार पाहतात.

शारीरिक, मानसिक नुकसान
ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर आजाराने ग्रस्त लोकांना मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रकारचे नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा पीडित व्यक्ती कपडे धुण्याचा साबण किंवा निरमासारख्या पावडरनेदेखील हात धुतात किंवा आंघोळ करतात. वारंवार हात धुतल्याने किंवा आंघोळ केल्याने त्यांची त्वचा निस्तेज बनते. त्वचेवर सुरकुत्या येतात किंवा नंतरती फाटू शकते. त्यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. दैनंदिन कामाकडे लक्ष न देता पीडित दिवसभर केवळ साफसफाई करत राहतात. त्यामुळे चिडचिड वाढते, नैराश्‍य येते. याचा वाईट परिणाम कालांतराने व्यक्तीच्या आरोग्यावर होतो.

आजार बरा होतो
या आजारावर वेळेत उपचार करणे अतिशय आवश्‍यक आहे. अन्यथा हा आजार अधिक गंभीर रूप धारण करण्याचा धोका असतो. वेळेत निदान आणि उपचारानंतर हा आजार बरा होऊ शकतो. औषधोपचाराबरोबर आजाराने ग्रस्त व्यक्तीचे समुपदेशन करणे गरजेचे असते. उपचारादरम्यान एखादे काम वारंवार करण्यापासून त्यांना रोखले जाते. मात्र, त्यासाठी आजाराचे वेळेत निदान आणि उपचार होणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्‍टर सांगतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News