व्यसनापासून सावधान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी हसत-खेळत असलेला आपला मित्र आता अचानक विचित्र वागू लागला तर धोक्‍याची खूण ओळखा आणि आपल्या व त्याच्या आई-वडिलांना तसेच शिक्षकांना माहिती द्या. तुम्हीच गल्लीतले पोलिस आणि डॉक्‍टर बना, असा सल्ला मानसोपचारतज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी ‘सकाळ’ व ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठातर्फे आयोजित अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेत दिला.

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी हसत-खेळत असलेला आपला मित्र आता अचानक विचित्र वागू लागला तर धोक्‍याची खूण ओळखा आणि आपल्या व त्याच्या आई-वडिलांना तसेच शिक्षकांना माहिती द्या. तुम्हीच गल्लीतले पोलिस आणि डॉक्‍टर बना, असा सल्ला मानसोपचारतज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी ‘सकाळ’ व ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठातर्फे आयोजित अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेत दिला.

 
कांजूरमार्ग येथील सरस्वती विद्यालयात सोमवारी तनिष्का समन्वयक रेणुका साळुंखे यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे धोके समजावून सांगितले. तसेच आपला मित्र किंवा भाऊ ड्रग्जच्या आहारी गेला हे कसे ओळखावे, त्याला मदत कशी करावी. आपण चुकून अमली पदार्थ खाल्ल्यास ते कसे ओळखावे व अशावेळी काय करावे, याच्या टीप्सही दिल्या. 

काही दिवसांपूर्वी आपल्याशी उत्साहाने हसत खेळत बोलणारा, आपला डबा खेचून घेऊन खाणारा, अभ्यासात हुशार असलेला मित्र आता विचित्र वागतो, बोलवूनही खेळायला येत नाही, आवडती डिश खात नाही, स्वतःच्याच धुंदीत असतो, विचारले तर रागराग करतो, डोळे लाल असतात, अभ्यासाची इच्छा दिसत नाही, अशी लक्षणे दिसल्यास त्याला दूर लोटू नका. त्यांना एकदा विचारा, पण त्यांना फार सल्ले देऊ नका. अन्यथा ते तुमचाही रागराग करतील. याबाबत तुमच्या आई-वडिलांना, शाळेत शिक्षकांना सांगा व त्याच्या आई-वडिलांनाही तुम्हाला जे दिसले ते सांगा. , असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कधी पानटपरीवर चॉकलेट घेताना कोणी तुम्हाला वेगळे चॉकलेट फ्री देईल; मात्र असे काहीही घेऊ नका. त्यात अमली पदार्थ मिसळलेले असण्याची शक्‍यता आहे. तरीसुद्धा आपण चुकून चॉकलेट खाल्ले व आपल्याला वेगळी चव लागली, रिलॅक्‍स वाटू लागले, तर सावध व्हा, असे ते म्हणाले. 

यावेळी मनसेचे विभागप्रमुख अजय मिरेकर, शाखाप्रमुख मनोज महाडिक, उपशाखाप्रमुख दिशा गोसावी, संस्थेचे सरचिटणीस विजय तोडणकर, तनिष्का समन्वयक वर्षा निगडे, मुख्याध्यापक तुकाराम जगदाळे आदी मान्यवर हजर होते. नशेचा राक्षस समाजात हातपाय पसरत असून वेळीच त्याला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी ‘सकाळ’ने हाती घेतलेली मोहीम उपयुक्त आहे, असे सरस्वती शिक्षण प्रसारक समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले. धूम्रपान किंवा नशा करणार नाही, अशी प्रतिज्ञा मुलांनी घेतली. ‘मैने एक बार कमिटमेंट कर दी, तो फिर मै खुद की भी नही सुनता’, हा सलमान खानचा डायलॉग आठवा व ही प्रतिज्ञा पाळा, असे आवाहनही डॉक्‍टरांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News