बीसीसीआयला ‘या’ कारणामुळे ४८०० कोटीचा फटका?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020

ललित मोदींविरुद्धचा खटला जिंकल्यामुळे ८०० कोटी रुपयांची कमाई झाल्याचा भारतीय क्रिकेट मंडळ सुखावलेले असताना त्यांना ४८०० कोटींचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबई :- ललित मोदींविरुद्धचा खटला जिंकल्यामुळे ८०० कोटी रुपयांची कमाई झाल्याचा भारतीय क्रिकेट मंडळ सुखावलेले असताना त्यांना ४८०० कोटींचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून असलेला डेक्कन चार्जर्स संघ बडतर्फ करण्याच्या निर्णयामुळे भारतीय मंडळास ही नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

डेक्कन चार्जर्सने आयपीएलच्या दुसऱ्या मोसमाचे म्हणजेच २००९ मध्ये विजेतेपद जिंकले होते; मात्र संघाच्या फ्रॅंचाईजमध्ये वाद झाल्यामुळे भारतीय मंडळाच्या आयपीएल प्रशासकीय समितीने १५ सप्टेंबर २०१२ या दिवशी या फ्रॅंचाईजला लीगमधून बडतर्फ केले होते. त्यास या संघाची मालकी असलेल्या डेक्कन क्रॉनिकल होल्डिंगने न्यायालयात आव्हान दिले होते. भारतीय मडळाने त्यानंतरही या संघाची नव्याने निविदा काढली. त्यात कलांतीलाल मरान यांची मालकी सन टीव्ही नेटवर्कने बाजी मारली. त्यांनी संघाचे नाव हैदराबाद सनरायजर्स असे केले.

डेक्कन क्रॉनिकल लिमिटेडने दिलेल्या आव्हान याचिकेबाबत उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश सी. के. ठक्कर यांचा लवाद नेमला होता. आता लवादाने डेक्कन क्रॉनिकल लिमिटेडच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट मंडळास या वर्षी सप्टेंबरपर्यंत ४ हजार ८०० कोटी रुपये देण्याचा आदेश दिला. डेक्कन क्रॉनिकल लिमिटेडने केलेल्या विविध दाव्यांनुसार ही रक्कम ठरवण्यात आली आहे.

दरम्यान, डेक्कन क्रॉनिकल लिमिटेडचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या धीर अँड धीर असोसिएटस्‌च्या आशिष प्यासी यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. भारतीय क्रिकेट मंडळ लवादाच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्‍यता आहे. आम्हाला निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे भारतीय मंडळाचे सीईओ हेमांग अमीन यांनी सांगितले.

तेव्हा कोची, आता डेक्कन

आयपीएलमधील संघ बरखास्त केल्यामुळे नुकसान भरपाईचा आदेश भारतीय मंडळास दिली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. कोची टस्कर्स केरळा हा संघ बडतर्फ केल्यामुळे भारतीय मंडळास ८५० कोटी देण्याचा आदेश २०१७ मध्ये देण्यात आला होता. त्याचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आता डेक्कन चार्जर्सची बडतर्फीही अवैध ठरवण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News