कोरोना काळातील अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी विद्यापीठ घेणार MCQ प्रश्नांचा आधार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020
  • पदवी परीक्षा घ्याव्याच लागतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षांचे नियोजन करण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे.

मुंबई :- पदवी परीक्षा घ्याव्याच लागतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षांचे नियोजन करण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिके विरुद्ध निर्णय दिला असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असे मंत्री उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आले होते.   

राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ, सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या ६ कुलगुरुंची समिती नेमली आहे. ही समिती कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षा कशा घेण्यात याव्या यासंदर्भात चर्चा करून राज्य सरकारला सूचना करणार आहेत. 

रविवारी डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परीक्षा नेमक्या कश्या घ्यावयाच्या याविषयी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना  परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय देण्यात यावे, असे समितीने राज्य सरकारला सुचवल्याचे सूत्रांकडून कळते. तसेच परीक्षा केंद्रांवर गर्दी होऊ नये, परीक्षांचे नियोजन करण्यास सोपे जावे यासाठी MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आधार घेण्यात यावा असे समितीने राज्य सरकारला सुचवल्याचे कळते. 

मुंबई आणि पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील इतर विद्यापीठांची परीक्षा ही यंत्रणांची कमतरता असल्याने ऑनलाईन घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्हींचा पर्याय देण्यात यावा या निर्णयावर कुलगुरूंच्या बैठकीत एकमत झाल्याचे समजते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोरोना परिस्तिथी लक्षात ३० सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेणे शक्य नसल्याने महाराष्ट्र सरकार यूजीसीला पत्र लिहून मुदतवाढीची मागणी करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कुलुगुरुंच्या समितीने तयार केलेला अहवाल ३१ तारखेला राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पदवी परीक्षांबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News