बालवैज्ञानिकांसाठी बारामती होतेय सज्ज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

बारामतीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे बालवैज्ञानिक घडविण्यासाठी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हिटी सेंटर उभारण्यात येत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाने समाजजीवन ढवळून निघाले आहे. शाळा हा समाजाचा घटक असल्याने या प्रगतीचा प्रभाव शालेय शिक्षणावर पडणे स्वाभाविक आहे. -कल्याण पाचांगणे, माळेगाव

बारामतीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या या केंद्रात प्रयोग करण्यासाठी पुरेशी उपकरणे असतीलच, शिवाय विज्ञान सोपे आणि सहज करून शिकवता येईल अशी काही किट्‌सदेखील असणार आहेत. ‘नुसते पहा आणि शिका’ असे न करता मुलांना ती स्वत: मुक्तपणे हाताळता येतील. पूर्वी तारांगण, खगोलीय माहिती, वैज्ञानिक प्रयोग, खेळातून मनोरंजन आदी गोष्टींसाठी मुंबई, नागपूर, हैदराबाद किंवा पुणे अशी मोठी शहरे गाठावी लागत होती. आता या बाबी बारामतीत मिळतील.

काय उपलब्ध होणार?
या नियोजित विज्ञानकेंद्रामध्ये अंतराळ विज्ञान, संगणक आदी विविध विज्ञान शाखांची सखोल माहिती देणाऱ्या दालनांसोबतच बदलत्या प्रदर्शनाची सोय असलेली विज्ञान वाटिका प्रस्तावित आहे. अंतराळ विज्ञान, सूर्यमालिका तसेच सौर, अणु, पारंपरिक ऊर्जेचा अभ्यास, पूरविज्ञान, चक्रीवादळ, ओझोनचा ऱ्हास, पृथ्वीचे तापमान, पृथ्वीचे संरक्षण, संगणक शास्त्राची सखोल माहिती, २५ जणांची आसनक्षमता असलेले तारकामंडळ, वैज्ञानिक संस्थांची माहिती, भारतीय वैज्ञानिकांचा कार्यपरिचय असा माहितीचा खजिना असेल. सावलीचे घड्याळ, सूर्यप्रकाशाद्वारे वेळेची जाणीव, आवाजाचा प्रतिध्वनी, काष्ठ तरंग, कुजबुजणारी बाग, गुरुत्व खुर्ची, यांत्रिक तापमापक, चंद्राची बाजू ओळखणारे यंत्र, प्रतिध्वनी निर्माण करणारे उपकरण, संगीत लहरी निर्माण करणारे उपकरण, वैज्ञानिक रहस्ये सांगणारी खेळणी या सायन्स पार्कमध्ये उभारण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात तारे, ग्रह, नक्षत्र, दीर्घिका, तेजोमेघ, आकाशगंगा, धूमकेतू अशा अवकाशातील भव्य विश्वाविषयी शास्त्रीय पद्धतीने व्यापक माहिती देणारे थ्रीडी डोम थिएटर, नोबेल म्युझियम, फिरते विज्ञान प्रदर्शन यांसारख्या योजनाही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

इनोव्हेशन हब
‘डू इट युवरसेल्फ’ या संकल्पनेवर आधारित विज्ञानातील प्रयोग व उपकरणे बनवून प्रत्यक्ष कृतीवर आधारीत उपक्रम राबविण्यात येणार आहे. पाश्‍चिमात्य देशात लहान मुलांना हा कार्यानुभव शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असतो. आपण जे शिकलो त्याचा उपयोग मुले त्यांच्या रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी करू शकतात. दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याच्या विचारातून संशोधनास चालना मिळावी, या हेतूने मुलांना प्रयोग, प्रकल्प देले तर जिज्ञासू मुले त्यावर विचार करून ह्या समस्या सोडविणारी सोपी उपकरणे शोधू शकतील. विज्ञान शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी कठीण असले तरीही मुलांना प्रायोगिक दृष्टिकोनातून शिकवले तर ते लवकर समजेल. मुलांनी स्वानुभवातून अशी विज्ञान खेळणी, मॉडेल आणि किट्‌स बनवली तर कृतिशील शिक्षणातून विद्यार्थी घडतील. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात उद्योजक, शास्त्रज्ञ तसेच नवनिर्मिती करणारे चांगले व्यावसायिक घडू शकतील.

फिरती प्रयोगशाळा  
विद्यार्थी व सामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक विचारांची आवक निर्माण होण्यासाठी विज्ञान केंद्र नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यापुढे जाऊन फिरती प्रयोगशाळा सुरू करण्याचाही विचार आहे. बारामतीच्या आसपास असणाऱ्या विविध उद्योगांच्या मॉडेलचे आणि प्रक्रियांचे वैज्ञानिक प्रदर्शन दालन देखील येथे उभारण्यात येणार आहे. त्यात साखरउद्योग, ऑटोमोबाईल, डेअरी, चॉकलेट तसेच टेक्‍सटाइल उद्योगातील विज्ञान सोप्या भाषेत प्रदर्शित करण्यात येईल. पुढील वर्षभरात त्याला मूर्त स्वरूप येईल, अशी माहिती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News