उकडीच्या मोदकांना गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. कारण हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे. गणेश चतुर्थीला पारंपारिकरित्या तांदूळ, गूळ आणि नारळ यांच्यापासून बनवलेले मोदक नैवेद्य म्हणून दाखवला जातो. जे चवीला तर उत्तम असतातच, पण दिसायला छान असतात. हे मोदक एकत्र बसून करण्यातही वेगळीच मजा आहे. आमच्याकडे अकरा दिवसाचा गणपती बसतो तेव्हा मी आणि माझी बहिण आई आजी एकत्र बसून उकडीचे पौष्टिक मोदक बनवतो.
साहित्य :-
- तांदळाचे पीठ - १.२५ कप (२०० ग्रॅम)
- ओल खोवलेलं खोबरं – १.५ कप
- गूळ - 1 कप (२०० ग्राम) (गूळ आवडीनुसार कुस्करून किंवा किसून पण घेऊ शकतात)
- बदाम – १० ते १२
- काजू – १० ते १२
- तूप - ०२ टेबल स्पून
- वेलची – ६ ते ७
- मनुका - ०१ टेबल स्पून
- चिमूटभर मीठ
उकड घेण्याची कृती :-
तांदळाचे पीठ घ्या. एका मोठ्या पातेल्यात १.५ कप पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवा. या पाण्यात ०२ छोटे चमचे तेल आणि ०१ चिमूट मीठ घालून पाण्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर गॅस कमी करून मंद आचेवर त्यात तांदळाचे पीठ घाला आणि मिक्स करा. तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होऊ देऊ नका. नंतर गॅस बंद करून हे मिश्रण ०५ मिनिटे झाकून ठेवा.
सारणाची कृती :-
जोपर्यंत उकड वाफेत शिजतेय तोपर्यंत सारण बनवून घ्या. एका कढईत एक चमचा तूप टाकून गरम करायला गॅसवर ठेवा. तूप तापल्यावर त्यात गूळ आणि खोवलेला नारळ घाला. हे मिश्रण मंद आचेवर चांगलं शिजवून घ्या. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडरही घालू शकता. हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर तुमचे सारण तयार आहे. नंतर ते थंड करायला ठेवा.
आता उकड एका प्लेटमध्ये काढून चांगली मळून घ्या. हाताला थोडं तेल किंवा तूप लावून उकड चांगली मळा. तुमची उकड मोदक करण्यासाठी तयार आहे.
मोदकाची कृती :-
मोदक बनवण्यासाठी पुन्हा एकदा हाताला तेल किंवा तूप लावून घ्या. लिंबाएवढा गोळा तयार करून घ्या आणि तो हातावर चपटी करा किंवा पोळपाटावर लाटून पण घेऊ शकतो. मग त्याची खोलगट पारी करून घ्या. लक्षात घ्या हाताला हे पीठ चिकटता कामा नये. तसंच ते जास्त कोरडंही होऊ नये. त्यात सारण भरून त्याच्या कळ्या करून मोदक बंद करा.
एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवा. या चाळणीला तूप लावून त्यावर मोदक ठेवा. ते एकमेकांना चिकटता कामा नये एवढं अंतर ठेवा. मोदक ठेवून झाल्यावर ते झाका. वाफेवर शिजून द्या. किमान १२ मिनिट शिजू द्या. तुम्ही गॅस फास्ट ठेवू शकता. नंतर गॅस बंद करा. मोदक ठेवलेली चाळणी भांड्यातून काढा. गरमगरम मोदक फारच चविष्ट लागतात. पण बाप्पाला नैवेद्य दाखविल्याशिवाय आणि त्यावर तूप घातल्याशिवाय मोदक खाऊ नका. अशा प्रकारे स्वादिष्ट मोदक तयार होतात.