पक्षपाताने बजरंगची घौडदोड थांबविली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 September 2019

भारताचा अव्वल मानांकित मल्ल बजरंग पुनियाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण घोडदौड जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत एका वादग्रस्त निर्णयानंतर रोखली गेली.

नूर सुलतान (कझाकस्तान):  भारताचा अव्वल मानांकित मल्ल बजरंग पुनियाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण घोडदौड जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत एका वादग्रस्त निर्णयानंतर रोखली गेली. जागतिक स्पर्धेत त्याला कझाकस्तानच्या दौलत नियाझबेकोवविरुद्ध ९-९ अशा बरोबरीनंतर हार पत्करावी लागली.

जागतिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून ऑलिंपिक पात्रता सिद्ध करणाऱ्या बजरंगचे जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न मात्र पंचांच्या वादग्रस्त निर्णयाने भंग पावले. स्पर्धेतील ६५ किलो वजनी गटातील बजरंग आणि नियाझबेकोव यांच्यातील लढत ९-९ अशी बरोबरीत सुटली होती.

मात्र, लढतीत नियाझबेकोव याने एका क्षणी एकत्रित चार गुणांची कमाई केल्याने पंचांनी त्याला विजयी घोषित केले. या क्षणी बजरंगचे प्रशिक्षक शाको बेनीटिडीस यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, रिप्लेनंतरही हा आक्षेप फेटाळला गेल्यामुळे तो एक गुणही त्याच्याविरुद्ध गेला.

बजरंगच्या पूर्वी ५७ किलो वजनी गटात रवी कुमारलाही उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली. त्याला रशियाच्या झावूर उगुएव याने ६-४ असे गुणांवर पराभूत केले. आता बजरंग आणि रवी कुमार दोघे ब्राँझपदकाची लढत खेळतील. जागतिक स्पर्धेतून सहा मल्ल ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार असल्यामुळे दोघांच्या पराभवाचा त्यांच्या ऑलिंपिक पात्रतेवर परिणाम होणार नाही. 

जागतिक स्पर्धेतून भारताने आतापर्यंत तीन ऑलिंपिक प्रवेश मिळविले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकांमध्ये सातत्य राखणाऱ्या बजरंगची हार भारतासाठी सर्वांत धक्कादायक होती. गेल्या स्पर्धेत बजरंग रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.

त्यापूर्वी, बजरंगने पहिल्या फेरीत पोलंडच्या बेंकोवस्की याला ९-२ असे, तर दुसऱ्या फेरीत स्लोवाकियाच्या डेव्हिड याला ३-० असे आणि तिसऱ्या फेरीत कोरियाच्या जाँग सूग याला ८-१ असे पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्याचवेळी रवी कुमारने प्रथम कोरियाच्या किम याचे ११-०, त्यानंतर अर्मेनियाच्या अरसेनचे आव्हान १७-६ असे संपुष्टात आणले होते. उपांत्यपूर्व फेरीत त्याने जपानच्या टाकाताशी याला ६-१ असे हरविले होते.

साक्षी मलिक पात्रतेपासून दूर

पहिल्या फेरीत ‘बाय’ मिळाल्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत साक्षी मलिक सातत्य राखू शकली नाही. नायजेरियाच्या अमिनत ओलुवाफनमिलायो हिने ऑलिंपिक ब्राँझविजेत्या साक्षीला १०-७ असे पराभूत केले. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत अमिनत ओलुवाफनमिलायो पराभूत झाल्याने साक्षीच्या रिपेचेजमधून संधी मिळण्याच्याही वाटा बंद झाल्या. 

पुजा धांडा देखील जागतिक पदकापासून दूर राहिली. महिलांच्या ५९ किलो गटात उपांत्य फेरी गाठल्यानंतर तिला ब्राँझपदकाच्या लढतीत चीनच्या झिंगरु पेईविरुद्ध ६-३ असा पराभव पत्करावा लागला.

लढतीच्या पहिल्या फेरीत पंचांनी यजमान देशाच्या नियाझबेकोव याला दम घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला. तीनवेळा त्याला ताकिद देणे अपेक्षित असतानाही पंचांनी ती दिली नाही. त्यानंतर मॅटवरील मुख्य सर्कलच्या अगदी बाजूला नियाझबेकोव याने थ्रो करून बजरंगविरुद्ध एकत्रित चार गुणांची कमाई केली. त्या वेळी बजरंगने हात उंचावून निराशाही व्यक्त केली. मात्र परिणाम झाला नाही. प्रशिक्षकांनी आक्षेप नोंदवला. मात्र, रिप्ले पाहिल्यानंतरही पंचांचा निर्णय कायम राहिला. त्यामुळे तो एक गुणही बजरंगच्या विरुद्ध गेला.

बरोबरीनंतर असा होतो निर्णयलढतीत जो मल्ल एकत्रित चार गुणांची कमाई करतो तो मल्ल विजयी ठरतो एकत्रित गुण नसतील किंवा दोन्ही मल्लांनी एकत्रित गुणांची कमाई केली असेल, तर ज्याला सर्वांत कमी ताकीद मिळते तो मल्ल विजयी ठरतो पहिल्या दोन्हीपैकी काही घडले नसेल, तर जो मल्ल अखेरचा गुण घेतो त्याला विजयी घोषित करण्यात येते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News