बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; खेळाडूंचा विरोध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 24 May 2020

आता खेळाडू खेळू शकतील की नाही, हा विचारही जागतिक महासंघ करण्यास तयार नाही. त्यांनी स्पर्धा कार्यक्रमाऐवजी ऑलिंपिक पात्रतेचा विचार करायला हवा होता.

नवी दिल्ली: जागतिक बॅडमिंटन महासंघाने पाच महिन्यांत 22 स्पर्धा घेण्याचा भरगच्च कार्यक्रम घेत सर्वांना खूष करण्याचा प्रयत्न केला; पण कमालीच्या थकवणाऱ्या या कार्यक्रमावर भारतीय बॅडमिंटनपटूंनी टीकेचे स्मॅश सुरू केले आहेत. त्यांनी या कार्यक्रमाची स्टुपिड या शब्दात अवहेलना केली आहे.

कोरोनाच्या बिनतोड सर्व्हिसमुळे जागतिक बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा मार्च ते ऑगस्टदरम्यान होऊ शकणार नाहीत. पण त्याची भरपाई खेळाडूंना थकवणारी आहे. "पाच महिन्यात 22 स्पर्धा याच थकवणाऱ्या आहेत. या स्पर्धा खेळताना आंतरराष्ट्रीय नियमावलीचे पालन कसे करणार? सक्तीच्या विलगीकरणाचे काय? जगभरात प्रवासावर निर्बंध असताना असा कार्यक्रम कसा तयार करण्यात आला? बॅडमिंटन सुरू व्हावे ही सगळ्यांचीच इच्छा आहे, पण त्याबाबत अनेक प्रश्न आहेत. अजून सरावही सुरू झालेला नाही," असे कश्‍यपने सांगितले.

ऑलिंपिक पात्रता शर्यतीत आघाडीवर असलेल्या बी साई प्रणीतनेही टीका केली. "पाच महिन्यांत 22 स्पर्धा खेळण्यास भाग पाडणे हा मूर्खपणा झाला. ते खेळाडूंचा काहीच विचार करीत नाहीत. जागतिक बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष ऑलिंपिक विजेते आहेत. त्यांनी दर आठवड्याला खेळाडू कसे खेळतील, हा विचार करायला हवा होता," असे त्याने सांगितले.

कोणताही तंदुरुस्त खेळाडू हे खेळू शकणार नाही. यामुळे दुखापती वाढतील. कोरोनामुळे परदेश प्रवास कमी होईल, असे सांगितले जाते. आता खेळाडू खेळू शकतील की नाही, हा विचारही जागतिक महासंघ करण्यास तयार नाही. त्यांनी स्पर्धा कार्यक्रमाऐवजी ऑलिंपिक पात्रतेचा विचार करायला हवा होता. आता एवढ्या स्पर्धा आम्ही का खेळायच्या? सध्या सर्वच जण ऑलिंपिक पात्रतेचा विचार करतात. त्यांचे मानांकन कसे मोजणार, अशी विचारणाही प्रणीतने केली.

दुहेरीतील खेळाडू चिराग शेट्टीलाही लागोपाठच्या स्पर्धांची संकल्पना रुचली नाही. गतवर्षी 18 स्पर्धा खेळलो होतो. आता प्रत्येक आठवड्यात खेळणे कसे भाग पाडता. सय्यद मोदी स्पर्धा होतानाच इंडोनेशिया सुपर स्पर्धा होणार आहे. आता या परिस्थितीत भारतातीलच स्पर्धा खेळू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रवासाला भारत सरकार कधी परवानगी देणार, हा प्रश्नच आहे. अनेक प्रश्न आहेत. घाईघाईने निर्णय घेतल्यामुळे हे घडले आहे, असे चिरागने सांगितले.

 

ऑगस्ट ते डिसेंबर असे पाच महिने सलग प्रवास आणि सलग स्पर्धा. आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबतच्या सूचना काय असू शकतात, हे जागतिक महासंघाने विचारातच घेतले नाही. टेनिस तर ऑक्‍टोबरपर्यंत स्पर्धांचा विचारही करण्यास तयार नाही
- साईना नेहवाल, ऑलिंपिक ब्रॉंझविजेती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News