पुणे महापौर करंडक कबड्डी स्पर्धेत बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन विजेते...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

अंतिम लढतीत बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनने मुंबईच्या विजय क्‍लबचा ४०-१७ असा २३ गुणांनी पराभव केला.

पुणे : पुणे महानगरपालिका आयोजित राज्यस्तरीय मॅटवरील खुल्या गटाच्या पुणे महापौर करंडक कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात पुण्याच्या बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनने विजेतेपदाचा मान मिळविला.

महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने कोथरूड येथील जीत मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटातील एकतर्फी ठरलेल्या अंतिम लढतीत बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनने मुंबईच्या विजय क्‍लबचा ४०-१७ असा २३ गुणांनी पराभव केला. दोन्ही संघानी सुरुवातीपासूनच सावध खेळ करण्यास सुरुवात केली. पहिल्या दहा मिनिटांतच बाबूराव चांदेरे संघाचा प्रमुख खेळाडू सिद्धार्थ देसाई, अक्षय जाधव, विकास काळे आणि निखिल ससारने आपले आक्रमण वाढवत सामना एकतर्फी केला. विजय क्‍लब संघाला सुरुवातीलाच बाबूराव चांदेरे संघाचे आक्रमण थोपविणे व बचाव भेदणे शक्‍य न झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तरार्धातही सामना संथ गतीने खेळला गेला. विजय क्‍लबच्या अजिंक्‍य कापरे व श्री भारतीने केलेली प्रतिकार बाबूराव चांदेरे संघाच्या अनुभवी खेळाडूंनी परतवून लावित विजय प्राप्त केला. उपांत्य फेरीत मुंबईच्या विजय क्‍लबने पुण्याच्या सतेज संघ बाणेर संघावर ४०-१५ असा विजय मिळविला. मध्यंतराला विजय क्‍लब संघाकडे १९-७ अशी आघाडी होती. विजय क्‍लबकडून विजय कापरे, विजय देवकर तर सतेज संघाकडून शुभम कुंभार, प्रदीप झिरपेने चांगला खेळ केला.  

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक बाबूराव चांदेरे, किरण दगडे, वासंती जाधव, अल्पना वरपे, मोनिका मोहोळ, अमोल बालवडकर, किशोरी शिंदे, शकुंतला खटावकर, वासंती बोर्डे, राजेंद्र देशमुख, योगिराज टकले हे उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News