बाबा आमटे यांची कविता श्रममूल्यांचा उद्घोष करते  :  प्रा. जयदेव डोळे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020
  • डॉ. बाळू दुगडूमवार लिखित 'बाबा आमटे : व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व' या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न

नांदेड  - वर्तमानात जगभरात उजव्या विचारसरणीची सरशी होते आहे. बहुतांश देशांमध्ये समाजवादाऐवजी साम्राज्यवाद वाढत चालला आहे. भारतातील बदललेल्या शासनव्यवस्थेचे उपेक्षित, गरीब, वंचित व दलित समाजाकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे उपेक्षित हा अत्यंत दयनीय स्थितीत जगतो आहे. 

विषमतेची दरी वाढते आहे. अशा काळात बाबा आमटे यांची कविता जीवनाचे रणांगण तुडवीत वास्तवाचा शोध घेते आणि श्रममूल्यांचा सतत उद्घोष करते. त्यांच्या कवितांमधून अभिव्यक्त झालेला समाजवादी विचार हा जीवनाचे विदारक वास्तव आणि श्रममूल्यांचा स्वीकार करण्याचा आग्रह धरते. तर दुसरीकडे ती एकाचवेळी साम्यवादातील शुध्द रक्ताकडून श्रमिकांची सत्ता आणू पाहणारी विचारधारा, श्रमाचा दुरान्वयाने संबंध नसलेल्या ब्राह्मणवादाच्या भेदभावी विचाराला आणि रोगग्रस्ततेतून आलेले दलितत्व या तीनही शाह्यांविरुध्द बंड करते. त्यांना आपल्या कवितेच्या माध्यमातून ती श्रममूल्यांचा पर्याय देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे यांनी केले.

ते ग्रंथाली प्रकाशन मुंबई आणि साने गुरुजींची धडपडणारी मुले कुंटूर आयोजित डा. बाळू दुगडूमवार लिखित 'बाबा आमटे व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व' या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी पीपल्स महाविद्यालयाच्या कै. नरहर कुरुंदकर सभागृहात बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात जेष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत, राजेश देशमुख कुंटूरकर, ग्रंथालीचे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर, भारत जोडो यात्री डा. अशोक बेलखोडे, माधव बावगे, सकाळ यिनबझचे संपादक संदीप काळे, सूर्यकांत पाटील कदम, बालाजीराव पवार अदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

प्रा. डोळे म्हणाले की, कागदावर पेन ठेवणारी प्रत्येक व्यक्ती लेखक, कवी होत नाही. महात्मा गांधी लेखक नव्हते तरी त्यांनी अनेक पत्रांद्वारे लेखन केलेले आहे. अशाच मौखिक स्वरूपाच्या परंपरेत लेखन करणारे बाबा आमटे हेही मोठे कवी होते, हे मान्यच करावे लागते. डॉ.बाळू यांनी या पुस्तकात बाबांच्या व्यक्तित्वाचा, कवित्वाचा आणि त्यांच्या एकूणच कर्तृत्वाचा समग्र नि चिकित्सक असा आढावा घेतला आहे. बाबा आमटे यांचे सेवाकार्य हे एका अर्थाने राजकीय कार्य होते. ते प्रत्यक्षही राजकारणात होते आणि त्यांनी आपली सेवा आणि श्रमाची एक सत्ता आनंदवनात निर्माण करून ठेवली आहे. त्यांची सेवाकार्याची प्रत्येक कृती ही मानवीय कल्याणाची कृती होती आणि प्रत्येक अशी कृती ही खऱ्या अर्थाने राजकीयच असते. त्यांच्या व्यक्तित्वाचे, त्यांच्या कवितेचे उत्तम आकलन या ग्रंथात मांडण्यात डॉ. बाळू यांना यश आले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल.
 
यावेळी बोलताना डॉ. सुरेश सावंत यांनी बाळू दुगडूमवार यांनी मला संशोधनाच्या निमित्ताने बाबा आमटे यांचे जीवन व काव्य समजावल्याची विनम्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सोमनाथ रोडे यांनी हा बाबा आमटे यांच्यावरील इतर ग्रंथांपेक्षा मूलभूत स्वरूपाचा ग्रंथ असल्याचे म्हटले. यावेळी ग्रंथालीचे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर यांनीही आपली भूमिका मांडली. संदीप काळे यांनी हा ग्रंथ युवकांना प्रेरणा देणारा असल्याची नोंद केली. या समारंभासाठी मारोतराव पा. कदम, गजानन आडकिने, शिवाजी आडकिने, विनोद झुंजारे प्रविंद दुगडूमवार यांच्यासह कुंटूरच्या साने गुरुजींची धडपडणारी मुले या युवा चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. शारदा कदम यांनी केले तर आभार गजानन आडकिने यांनी व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News