आंबट गोड आवळ्याची चटणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020
  • चटणीचे अनेक प्रकार आहेत पण आम्ही तुमच्यासाठी एक खास चटणी घेऊन आलो ती म्हणजे आंबट गोड आवळ्याची चटणी ही चटणी नक्की करून बघा... 

तुम्ही अनेक चटणीचे प्रकार ऐकले असतील खाले असतील पण आज मी जी रेसिपी घेऊन आली आहे ती काहीही विशेष आहे त्या चटणीचे नाव ऐकल की, तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. 

साहित्य :-

  • आवळे :- अर्धा किलो
  • गुळ :- अर्धा ते पाऊण किलो
  • बडीशेप :- दोन टी-स्पून शीग लावून
  • मिरपूड :- अर्धा टी-स्पून
  • दालचिनी :- छोटे तुकडे दोन टी स्पून
  • मेथी :- एक टी -स्पून
  • लाल मिरची पूड :- एक टी -स्पून
  • मीठ :- चवीप्रमाणे

कृती :-

आवळे धुऊन, पुसून घ्यावेत. एका स्टीलच्या जाड बुडाच्या पातेल्यात आवळे बुडतील एवढेच पाणी घालून उकडून घ्यावेत. साधारण १५ मिनिटे लागतील. आवळ्याच्या फाका (फोडी) सुट्या होताना दिसतील. गार झाल्यावर बियांपासून फोडी सुट्या करून घ्याव्यात. आवळे उकडलेले पाणी वापरून स्टीलच्या पातेल्यात/ कढईत गुळ घालून पाक करायला ठेवावा.

बडीशेप, मेथी थोडी भाजून घ्यावी. मिक्सरच्या छोट्या भांड्यात भाजलेली बडीशोप, मेथी, दालचिनी (न भाजलेली) यांची पूड करून घ्यावी. आवळ्याच्या फोडी थोड्या गरम असतानाच मिक्सरमध्ये वाटून ‘पल्प’ करून घ्याव्यात. गार झाल्यावर पटकन वाटल्या जात नाहीत. गुळाचा पाक होताना कढईमध्ये बुडबुडे खूप वेगाने येतात. कढई भरून बुडबुडे वर येऊ लागले, की आवळ्याचा वाटलेला गर (पल्प) टाकावा.

भाजलेली मेथी, भाजलेली बडीशेप, दालचिनी यांच्या पुडी, मिरी-पूड, तिखट, मीठ घालावे. सतत ढवळत राहावे. ढवळताना मिश्रणाचे थेंब चट-चट असे कढई बाहेर उडू लागतात. हळू हळू मिश्रण बाहेर उडण्याचे प्रमाण कमी होते. लालसर-सोनेरी रंग आला; आणि जामसारखे घट्ट होत आले, की झाली आपली चटणी. गार झाल्यावर काचेच्या अथवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News