देशात रोज सरासरी २४ ते २८ हजार रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020
  • जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.
  • केवळ पाच दिवसांत जगात १० लाख नवे रुग्ण सापडले आहेत.
  • हे प्रमाण चिंताजनक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

मुंबई :- जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. केवळ पाच दिवसांत जगात १० लाख नवे रुग्ण सापडले आहेत. हे प्रमाण चिंताजनक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रतिबंधात्मक नियम न पाळल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण होईल, असा इशारा संघटनेने दिला.

तीन देशांत ७० टक्के रुग्ण

अमेरिकेत दिवसाला सरासरी ६२ हजार रुग्ण सापडत आहेत; तर ब्राझीलमध्ये सरासरी ४५ हजार रुग्णांची भर पडत आहे. भारतात रोज सरासरी २५ ते २८ हजार नवे रुग्ण सापडत आहेत. रशिया, चिली, पेरू, मेक्‍सिको या देशांमध्येही रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. नव्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण केवळ अमेरिका, ब्राझील, भारत या तीन देशातून आहेत.

कोरोना बळींचा आकडा ६ लाखांवर

जगात १ कोटी ३० लाखांहून अधिक जणांना कोरोनासंसर्ग झाला आहे. यामध्ये एकट्या अमेरिकेत ३३ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत; तर अमेरिका, ब्राझील, भारत आणि रशियातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखाच्या जवळ पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात बाधितांची संख्या ९ लाखांवर

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला सरासरी २५ ते २८ हजारांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशात २८ हजार ५९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ५५३ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ६ हजार ७५२ एवढी आहे; तर आतापर्यंत एकूण २३ हजार ७२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाच दिवस १० लाख रुग्ण

९ जुलै - २,२३,११६
१० जुलै - २,३०,५०६
११ जुलै - २,१८,९०४
१२ जुलै - १,९२,७५४
१३ जुलै - १,६६,१९२

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News