ऑस्ट्रेलियाचा आज नैसर्गिक आक्रमकतेशी सामना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • ऑस्ट्रेलियासमोर आज विंडीजचे आव्हान
     

नॉटिंगहॅम - पहिल्या सामन्यात विजय मिळविल्याने विश्‍वकरंडक स्पर्धेत आत्मविश्‍वास उंचावलेल्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज या संघांत उद्या सामना होईल. ऑस्ट्रेलियाच्या संयम आणि चिकाटीचा या वेळी वेस्ट इंडीजच्या नैसर्गिक आक्रमकतेशी सामना होईल. विश्‍वकरंडक स्पर्धेतील पुढील प्रवासाचे नियोजन करण्यासाठी दोन्ही सामना या संघांसाठी महत्त्वाचा असेल, त्यामुळे एक तुल्यबळ लढत उद्या बघायला मिळेल.

यंदाच्या स्पर्धेतील सुरवात करताना दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान अगदी सहज मोडून काढले आहे. ऑस्ट्रेलियाने  अफगाणिस्तान, तर वेस्ट इंडीजने पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. 

आक्रमकतेचे आव्हान
ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी विंडीजच्या तुलनेत भेदक दिसून येत असली, तरी त्यांच्यासमोर या वेळी विंडीजच्या आक्रमकतेचे आव्हान राहणार आहे. हे आव्हान सलामीला, मध्या फळीत नव्हे, तर अखेरपर्यंत राहणार आहे. विंडीज संघाची रचनाच तशी आहे. सलामीला ख्रिस गेल, शाय होप, मधल्या फळीत हेटमेर, ब्राव्हो, त्यानंतर होल्डर, रसेल आणि शेवटी ब्रेथवेट अशी त्यांची फलंदाजी खोलवर आहे.

विंडीज क्रिकेटला पाहून क्रिकेटचे मैदान गाठणारे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी हा धोका ओळखला आहे. त्यामुळेच त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वेळीच विंडीजच्या वेगवान गोलंदाज आणि त्यांच्या आक्रमक फलंदाजांचा विचार करून खेळण्याचा सल्ला दिला आहे. 

वेस्ट इंडीजची फलंदाजी, गोलंदाजी जरूर आक्रमक आहे. पण त्यांच्या कामगिरीत कच्चे दुवे नाहीत, हे मान्य नाही. हेच कच्चे दुवे ओळखून आम्ही चांगले क्रिकेट खेळू.
- जस्टिन लॅंगर, 
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक
 

आमने - सामने ; १३९ लढतीत
ऑस्ट्रेलियाचे ७३ विजय, तर वेस्ट इंडिजचे ६०.
इंग्लंडमधील लढतीत - पाचपैकी एकाच सामन्यात ऑस्ट्रेलियाची सरशी, तर चार लढतीत वेस्ट इंडिजची.
विश्‍वकरंडक स्पर्धेत - नऊ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे चार विजय, तर विंडीजचे पाच.

हवामानाचा अंदाज - प्रामुख्याने ढगाळ. पावसाची शक्‍यता अवघी २० टक्के. जास्तीचे तपमान १७ अंश. एकंदरीत प्रथम गोलंदाजीस पसंती अपेक्षित.
खेळपट्टीचा अंदाज - या मैदानावरील स्पर्धेतील पहिल्या लढतीत विंडीजने पाकचा खुर्दा उडवला होता, पण त्यानंतरच्या लढतीत इंग्लंड आणि पाकने एकत्रितपणे ६८२ धावा केल्या. एकंदरीत वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्‍यता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News