औरंगाबादमधील अनोखी अशी वेरूळची लेणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 September 2019
  • मंदिर निर्माण करायला अंदाजे दोन लाख टन वजनाचा एक अखंड खडक वापरण्यात असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे.

महाराष्ट्रातील मराठवाडा भागात औरंगाबाद पासून ३० किमी अंतरावर वेरूळ हे एक गाव असून येथे प्राचीन लेणी आहेत. येथे १७ हिंदू, १२ बौद्ध आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे. वेरूळची लेणी साधरणत: इसवी सनाच्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरली असून प्राचीन भारतातील हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील परस्परसंहिता प्रकर्षाने या लेण्यामध्ये दिसून येते.

वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी, आणि जैन लेणी अशी विभागणी केली आहे. हिंदू लेण्यामध्ये शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पे आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. अशी लेणी कोरण्यासाठी कारागीरांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्याचा उल्लेख आहे.

हिंदू लेण्यामधील वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातील सर्वात मोठे कोरीव शिल्प असून या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर निर्मिलेली आहे. मंदिर निर्माण करायला अंदाजे दोन लाख टन वजनाचा एक अखंड खडक वापरण्यात असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे. हे प्रचंड कोरीव काम पुरे करण्यासाठी अनेक दशके लागली असतील.

वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी विहार स्वरुपाची असून काही विहारात पूजेसाठी मूर्तीही आहेत. या सर्व लेण्यांमध्ये विश्वकर्मा लेणी प्रसिद्ध आहेत. हे अत्यंत सुबक व नाजूक कोरीव काम असून जणू दगडा ऐवजी लाकूड कोरले आहे असे वाटते. या स्तूपात भगवान गौतम बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील मूर्ती आहे.

जैन लेणी हिंदू व बौद्ध लेण्याच्या तुलनेत असून या लेण्यामधून जैन धर्माची वैराग्य भावना दर्शवितात. या बरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या जैन लेण्यांची महती सांगतात. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत त्याचा उद्देश वाटसरुंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. सोबतच त्यांना राजाश्रय, धर्माश्रय, लोकाश्रय प्राप्त असे ह्यासाठीच या लेण्याची निर्मिती केली असावी. वेरूळ लेण्याला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News