पालिका शाळेतील मुलांची लक्षवेधी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

ही मुले शहरांतील झोपडपट्टीमध्ये लहानशा घरांमध्ये राहतात आणि सरकारी किंवा महापालिकेच्या शाळांत शिकतात. प्रशिक्षणातून विविध प्रयोग करत अखेर त्यांनी ‘अरमान’ रोबोच्या हाताची यशस्वी निर्मिती केली. अरमनाच्या हाताची क्रिया अचूक होत आहे

मुंबई : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ‘अरमान’ यंत्रमानव मुंबईकरांचे लक्ष वेधणार आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाबद्दल कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेल्या पालिका शाळेतील मुलांनी त्याचा हात (आर्म) साकारला आहे. ‘सलाम बॉम्बे’ सामाजिक संस्थेच्या स्किल्स ॲट स्कूल कार्यक्रमाच्या रोबोटिक्‍स प्रकल्पांतर्गत रोबो तयार करण्याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. त्यासाठी मुलांना पुण्याच्या ‘इंडियाफर्स्ट रोबोटिक्‍स’ शैक्षणिक कंपनीने साहाय्य केले आहे.

‘अरमान’ रोबोचा हात तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबद्दल कोणतीही पार्श्‍वभूमी नव्हती. काही मुले शहरांतील झोपडपट्टीमध्ये लहानशा घरांमध्ये राहतात आणि सरकारी किंवा महापालिकेच्या शाळांत शिकतात. त्यांना ‘सलाम बॉम्बे’ने ‘इंडियाफर्स्ट रोबोटिक्‍स’चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांना रोबोटिक तंत्रज्ञानाबद्दलची मूलभूत माहिती देत रोबो तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणातून विविध प्रयोग करत अखेर त्यांनी ‘अरमान’ रोबोच्या हाताची यशस्वी निर्मिती केली. अरमनाच्या हाताची क्रिया अचूक होत आहे. रोबोची हालचाल योग्य प्रमाणात व्हावी यासाठी त्यामध्ये मोशन सेंसर्सचा वापर करण्यात आला आहे. 

तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आहे, पण त्यांना संधी मिळत नाही. अशा मुलांमध्ये रोबोटिक्‍स, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि नावीण्यपूर्ण शोध लावण्याबद्दलचा विचार जागवण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) विषयांसंबंधी नोकऱ्यांच्या बाजारपेठेत रोबोटिक्‍सचे शिक्षण घेतलेल्यांना सध्या प्रचंड मागणी आहे. सराकरी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने नवीन संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना भविष्यातील संधीसाठी तयार करण्याच्या उद्देशाने आम्ही अशा प्रकल्पाचे आयोजन करतो, असे सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या कम्युनिकेशन विभागाच्या उपसंचालिका आदिती पारिख यांनी सांगितले.

इथे पाहायला मिळेल रोबो 
मुंबई मॅरेथॉनमध्ये सलाम बॉम्बेच्या चिअरिंग स्टेजवर ‘अरमान’ रोबो स्पर्धकांना पाहता येईल. ‘स्किलिंग यंग इंडिया फॉर अ बेटर फ्युचर’ अशी टॅगलाईन असलेला फलक घेऊन तो स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उभा राहणार आहे. 

यापूर्वी विद्यार्थ्यांनी साकारलेली उपकरणे
२०१७-२०२८ मध्ये दोन विद्यार्थ्यांनी मुंबईतील कोहिनूर टेक्‍निकल इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षकांसोबत काम करत रुग्णालयातील रोबो बनवण्यात मदत केली. संसर्गजन्य रोग झालेल्या आणि वेगळे ठेवण्यात आलेल्या रुग्णांची तो शुश्रूषा करतो.

नववीच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने टोरो रोबो (बोलणारा आणि भाषांतर करणारा रोबो) च्या निर्मितीसाठी मदत केली आहे. जो इंग्रजीचे ११ भारतीय आणि चार परदेशी भाषांमध्ये भाषांतर करतो. नववीमध्ये असलेल्या रवी पटेल नावाच्या मुलाने आयओटी आधारित व्हॉईस नियंत्रित होम ऑटोमेशन प्रणालीच्या प्रकल्पावर काम केले. ई-कचऱ्यापासून स्मार्ट कचरापेटी आणि मिनी ब्ल्यू-टुथ व पॉवरबॅंकही विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News