पर्यावरण विभागाचा नामविस्तार; कसा होणार वातावरणीय बदल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 June 2020
  • आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी माहिती

मुंबई : राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचे नाव "पर्यावरण व वातावरणीय बदल" विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश पंचतत्त्वांवर कार्य करेल. पृथ्वी तत्त्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर हा विभाग कार्य करेल. तसेच हवेच्या गुणवत्तेसाठी हा विभाग उद्योग, परिवहन व इतर विभागांना सहकार्य करून वायुप्रदूषण कमी करून राज्यातील हवेची गुणवत्ता सुधारेल व वायू तत्त्वाचे संरक्षण करेल. तसेच जल तत्त्वाशी संबंधित नदीसंवर्धनाच्या सध्यस्थितीतील चालू कामांसह सागरी जैवविविधता, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. अग्नी तत्त्वाशी संबंधित ऊर्जा स्रोत म्हणून अन्य विभागांसह कार्य करत ऊर्जाचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे; तर आकाश या तत्त्वासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात आपल्या कृतीद्वारे आपला भवताल अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवृत्त करेल, असेही आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

100 कोटींचा निधी उपलब्ध करणार

विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे अधिक व्यापक करण्यात येणार आहेत. याशिवाय त्यात सध्याच्या वातावरणातील बदल व त्याअनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे व राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली. सरकारची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्‍चित करण्यासाठी या वर्षी या विभागामार्फत 100 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News