तुकाराम ते साहित्यरत्न, अण्णाभाऊंचा थक्क करणारा प्रवास

छाया बेले, नांदेड
Saturday, 1 August 2020

जीवनाचा अस्सलपणा हा जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसात दिसून येतो. आणि हाच अस्सलपणा अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीने जगासमोर मांडला.

'ऐसी कळवळ्याची जाती लाभावीन करी प्रिती' जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या या ओळी थोर समाज सुधारक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाशी तंतोतंत जुळून येतात. या थोर समाजसुधारकाचं मानवतेवर माणसावर अपार प्रेम होतं. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे मानव कल्याणासाठी खर्ची घातलं. अण्णाभाऊचं जीवन एखाद्या महाकाव्याचा सारखा आहे. एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव, जिल्हा. सांगली येथे निवडुंगाच्या जाळीत वसलेल्या, ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेल्या, मांग वस्तीत जन्माला आलेले अण्णाभाऊंचा तुकाराम ते साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रवास  थक्क करणारा आहे.

कोणाचाही वरदहस्त पाठबळ नसताना दुनियेच्या विद्यापीठात अनुभवाचे शिक्षण घेत हे साहित्यसम्राट घडले. आपल्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाचे सोयरसुतक न बाळगता अण्णा भाऊ हे कायम इतरांसाठी लढत राहिले. कामगार व उपेक्षित समाज हा अण्णाभाऊंच्या साहित्याची प्रेरणा होता. या उपेक्षित समाजाची होणारी पिळवणूक त्यांचा जीवनसंघर्ष हे अण्णा भाऊंना लिहिण्यासाठी प्रेरित करत. या शोषित घटकाला न्याय मिळावा, उच्चनीचतेची दरी संपून समाजात सगळीकडे समानता प्रस्थापित व्हावी.
 हे या थोर समाजसुधारकांचे स्वप्न होते . 

या उदात्त ध्येयासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. मार्क्सवाद, आंबेडकरवाद किंवा कुठल्याही वादात अण्णाभाऊंना      बसवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल.  त्यांचे विचार त्यांचे कार्य आहे आहे वैश्विक स्वरूपाचे आहे. अण्णाभाऊ चा संघर्ष हा कोणत्या एका घटका विरुद्ध नाही. किंवा पूर्वग्रहदूषित नाही. हा संघर्ष म्हणजे समतेच्या, न्यायाच्या, मानवतेच्या मूल्यांसाठी आहे. अण्णाभाऊ ग्रामीण भागातील उपेक्षितांचे दैन्य ही मांडतात ्याच बरोबर शहरात झोपडपट्टी सारख्या बकाल वस्तीत राहणाऱ्या ,जगण्यासाठी धडपडणार्‍या लोकांचा संघर्षही मांडतात. म्हणूनच आण्णाभाऊ म्हणतात. "त्यांची झुंज यावर माझा विश्वास आहे त्यांना विद्रूप करणारे मात्र मला आवडत नाही" अण्णाभाऊंची जीवनावरील निष्ठा त्याविषयीची सौंदर्यदृष्टी या वाक्यातून प्रतीत होते.
 
अवघ्या एकोणपन्नास  वर्षाच्या आयुष्यात आण्णाभाऊंनी जगण्यासाठी संघर्ष करता करता समाजासाठी भरीव कामगिरी केली. ती मैलाचा दगड ठरावी अशी आहे. त्यांच्या शाहिरीने अवघा महाराष्ट्र पेटून उठला. तर सरकारला त्यावर बंदी आणावी लागली. हीच तर खरी जननायक असण्याची खूण होय. अण्णाभाऊ म्हणतात "आपण जे जीवन जगतो, तेच जीवन जगणाऱ्या बहुसंख्य जनतेच्या मनातील उदात्त स्वप्ने विचार शब्दबद्ध करावे या मोहने मी लिहीतो. जुन्या प्रतिगामी चालीरिती दूर साऱाव्या पण प्रगत प्रथांना पुन्हा पुढे आणावे वर हेवेदावे द्वेष वैर यांचे गंभीर परिणाम दाखवावेत. महाराष्ट्रात प्रेम सलोखा नांदावा असं मला वाटतं. माझा माझ्या देशावर जनतेवर नि तिच्या संघर्षावर विश्वास आहे. हा देश सुखी समृद्ध व्हावा या भूमीचे नंदनवन व्हावे. ही स्वप्ने पहात मी लिहीत असतो." वरील विचारातून अण्णाभाऊचे मानवते वरील तसेच आपल्या देशा वरील अपार प्रेम कळवळा दिसून येतो.या महामानवाने अमुक एक घटक  समोर ठेवून कार्य न करता संपूर्ण विश्वातील उपेक्षित घटक समोर ठेवून आपले लेखन कार्य केले.
   
अण्णाभाऊंनी स्वतःला समाजापासून कधीच वेगळं समजलं नाही. किंवा वेगळं केले नाही. तर त्याचा एक भाग बनून ते जगले. म्हणूनच अण्णाभाऊंना शोषित उपेक्षित अन्यायग्रस्त समाजाचं अंतरंग अगदी जसं  आहे तसं कळलं आणि ते आपल्या साहित्यातून तेवढ्याच ताकतीने उतरवता आले. म्हणूनच त्यांच्या हितासाठी या घटकाच्या परिस्थितीत सुधारणा कशी घडवून आणता येईल एवढा एकच उद्देश घेऊन ते जगले.
 आपल्या लिखाणातून समाजाला मार्गदर्शन केले. .आपल्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष कराण्याची शिकवण अण्णाभाऊंचे साहित्य देते. त्याच बरोबर काय चूक काय, बरोबर काय, स्वीकारायला हवं, किंवा काय टाकायला हवं , याविषयी आत्मभान अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून आपल्याला मिळतं. माणसाचे माणूसपण किती सुंदर असू शकतं हे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून माणूसपणाचं सुंदर दर्शन घडवले आहे. जीवनाचा अस्सलपणा हा जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसात दिसून येतो. आणि हाच अस्सलपणा अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीने जगासमोर मांडला. आपल्या साहित्यातून रुजवला, फुलवला, बहरून आणला . म्हणूनच वाटेगावातील तुकाराम नावाचा उनाड मुलगा ते थोर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हा प्रवास यशस्वी झाला.
 
एवढी साधी सोपी गोष्ट नाही समाजाला स्वतःसह  अजून काय देता येईल हा ध्यास अण्णाभाऊ साठे या थोर समाजसुधारकाने घेतला होता. माणूसपणाच्या उच्चतम स्थितीचे दर्शन आपल्याला अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून त्यांच्या जीवनातून घडतं. समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या व्यक्तीने किती निस्वार्थ असावं लागतं हेच त्यांच्या जीवनाकडे बघून लक्षात येतं. अण्णाभाऊंनी एवढ लिखाण केलं तेवढं अजरामर आहे. कारण अण्णाभाऊ च्या साहित्य मधून जीवनाचं खरं तत्वज्ञान कळतं . माणसाला माणसाशी जोडण्याचे काम त्यांचे साहित्य करते. फकिरा या अजरामर साहित्यकृतीमधून अण्णाभाऊंनी  नायकाचा इंग्रज सरकार सोबत  तसेच सरंजामशाही विरुद्ध लढा दाखवला आहे. मात्र गावगाड्यात असलेला एकोपा व जिव्हाळाही  तेवढ्याच प्रांजळपणे मांडला आहे.  

कुठल्याही एका विशिष्ट समाजघटकाविषयीचा आकस त्यांच्या साहित्यातून दिसून येत नाही. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून अंधश्रद्धेचा विरोध केला आहे. अंधश्रद्धा निर्माण होईल किंवा संभ्रम निर्माण होईल अशा गोष्टी येणार  नाही याची याची अण्णाभाऊंनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. मात्र मानवी समाजात शोषण हीच संस्कृती होत चालली आहे.
 या शोषण संस्कृतीच्या विरोधात महामानवांनी कायम लढा दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे, बिरसा मुंडा, राजे उमाजी नाईक, यांनी शोषण व्यवस्थेविरुद्ध लढा दिला.
 
आपलं सर्वस्व पणाला लावलं. हे सर्वच महानायक व्यवस्थेच्या आगीत होरपळले होते. हा दाह घेऊन ही शोषण व्यवस्था जाळून राख करण्यासाठी त्यांनी जीवन संघर्ष केला. या महामानवांच्या विचारांचा व कार्याचा वारसा अण्णाभाऊंनी चालवला. अण्णाभाऊंनी उपेक्षित घटकाच्या हक्कासाठी ,न्यायासाठी समतेसाठी संघर्ष करीत राहिले. समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास घेऊन ते जगले. अण्णाभाउंनी स्त्रियांना लढण्याचं बळ दिलं. त्यांच्या साहित्यातून त्यांनी स्त्रियांना सन्मान दिला. सत्वशील विद्रोही नायिकांचे पात्र चित्रित  करून स्त्रियांचे आत्मभान जागृत केले. प्रस्थापित साहित्यात स्त्रियांची अवहेलनात्मक चित्र दाखवले गेले. मात्र  अण्णाभाऊंनी सत्वशील व विद्रोही स्त्रीपात्रांमधून अण्णाभाऊंनी आत्मभान, आत्मप्रेरणा, याची जाणीव करून दिली .

अण्णाभाऊंना हे माहित होतं की स्त्रियांना स्वतःची ओळख होणं खूप आवश्यक आहे त्याशिवाय त्यांचा व समाजाचा विकास   होणार नाही. स्त्रिया जागृत होणं  खूप आवश्यक आहे  त्याशिवाय समाज प्रगती करू शकत नाही. हे अण्णाभाऊंची दूरदृष्टी होती. अशा समाजाच्या सर्वच आघाड्यांवर मार्गदर्शक ठरणारं अण्णाभाऊ च साहित्य आहे. त्यांच्या साहित्यातून कुठेही समाजात संभ्रम निर्माण करणारं  विधान ते करीत नाहीत. विघातक गोष्टीचं समर्थन करीत नाहीत . समाजाला पोषक असेच विचार अण्णाभाऊंनी  मांडले आहेत. म्हणूनच ते साहित्यसम्राट तर होतेच सोबतच ते थोर समाज सुधारक होते यावर कुणाचेही दुमत असणार नाही. थोर समाज सुधारक व साहित्य जन्मशताब्दी  वर्षानिमित्त कोटी कोटी वंदन !!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News