नेमबाजी नियमांच्या पालनाची जबाबदारी पंडित यांच्यावर असल्याची संघटनेची घोषणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020
  • भारतीय नेमबाजी संघटनेने अपेक्षेप्रमाणे ऑलिंपिक पूर्वतयारी शिबिर १ ऑगस्टपासून नवी दिल्लीत असेल असे जाहीर केले.
  • त्याचवेळी या शिबिराच्या सुरक्षित संयोजनाची जबाबदारी रोनक पंडित यांच्याकडे सोपवली आहे.

  

मुंबई :- भारतीय नेमबाजी संघटनेने अपेक्षेप्रमाणे ऑलिंपिक पूर्वतयारी शिबिर १ ऑगस्टपासून नवी दिल्लीत असेल असे जाहीर केले. त्याचवेळी या शिबिराच्या सुरक्षित संयोजनाची जबाबदारी रोनक पंडित यांच्याकडे सोपवली आहे. मात्र आपल्याला अजूनपर्यंत संघटनेने काहीही कळवले नसल्याचे रोनक यांनी सांगितले.

माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज रोनक हे भारतीय संघाचे हाय परफॉर्मन्स मॅनेजर आहेत. ते या शिबिरासाठी भारतीय नेमबाजी संघटनेच्या वतीने नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्यावर शिबिराच्यावेळी सर्व सुरक्षा उपायांचे पालन करण्याची जबाबदारी असेल, असे भारतीय नेमबाजी संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. मात्र रोनक यांनी संघटनेने अजूनपर्यंत आपल्याशी याबाबत संपर्क साधलेला नाही.
नोडल अधिकारी नेमल्याचे मी ऐकले आहे, पण संघटनेने याबाबत कोणताही संपर्क साधलेला नाही. या कामाचे नेमके स्वरूप जाणून घेतल्याशिवाय, संघटनेसह चर्चा केल्याशिवाय त्याबाबत काहीही बोलणे उचित ठरणार नाही, असे रोनक यांनी सांगितले. त्याचबरोबर मी सध्या पुण्यात आले. शिबिरास एक ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यावेळी असलेल्या सर्व व्यवस्थेबाबत काहीही समजल्याशिवाय मी बोलणे अनुचित ठरेल, असे रोनकने सांगितले.

नेमबाजी संघटनेच्या पत्रकानुसार रोनक हे नेमबाज, मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफ, खेळाडूची निवास व्यवस्था तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यात दुवा राहतील तसेच या सर्वांकडून कोरोना महामारी रोखण्यासाठी केलेल्या नियमांचे सर्व पालन होईल, हे पाहण्याचीही जबाबदारी असेल.

शिबिराच्या सक्तीस नेमबाजांचा विरोध

एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या शिबिरास नेमबाजांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत कोरोनाची मोठ्या प्रमाणावर साथ आहे. त्याचबरोबर दिल्लीला जाणेही सोपे नाही, शिबिर सुरक्षित ठिकाणी असले तरी तिथे जाईपर्यंत अनेक ठिकाणी कोरोनाचा धोका आहे, असे नेमबाजांनी सांगितले. नेमबाज, मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफ सुरक्षा उपायांचे पालन करेल, पण ड्रायव्हर आणि कुकचे काय, अशी विचारणा नेमबाज करीत आहेत.

  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News