अपंगत्वावर मात करून भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • करमाळा तालुक्यातील भाळवणी या छोट्याश्या गावात राहणाऱ्या सुयश जाधव ह्या जलतरण पटूला यावर्षीचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सुयशच्या रूपानं अर्जुन पुरस्काराची नोंद झाली आहे.

पंढरपूर :-  करमाळा तालुक्यातील भाळवणी या छोट्याश्या गावात राहणाऱ्या सुयश जाधव ह्या जलतरण पटूला यावर्षीचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सुयशच्या रूपानं अर्जुन पुरस्काराची नोंद झाली आहे. गावात राहणार एक साधा मुलगा ते अर्जुन पुरस्कार विजेता हा प्रवास सुयश करीता फार सोपा नव्हता. यादरम्यान सुयशला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लहानपणी एका लग्न समारंभासाठी गेला असताना विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने सुयशला आपले दोनही हात या अपघातात गमवावे लागले. सुयशचे वडील नारायण जाधव हे एक उत्कृष्ट जलतरणपटू होते. त्यांनी राज्यात आणि देशातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पुरस्कार देखील मिळवले होते. आपला मुलगा सुयश याला देखील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवायची त्यांची इच्छा होती परंतु सुयशचा अपघात झाल्याने त्यांची ही इच्छा काहीशी धूसर झाली. सुयशने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्ध बाळगली आणि इथूनच त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. 

सुयशने त्याचे हात गमावले असताना त्याच्या वडिलांनी त्याला गावातील नदीत सफाईदारपणे पोहोताना पहिले आणि त्याच्यावर मेहनत घ्यायला सुरुवात केली. यानंतर आपल्या मुलाला एक उत्तम दर्जाचा जलतरणपटू बनवून त्याला देश विदेशातील स्पर्धांमध्ये खेळायला पाठवण्याचे स्वप्नं सुयशच्या वडिलांनी पहिले. सुयशला प्रोत्साहन देऊन त्यांनी त्याचे मनोबल वाढवले. सुयशने आतापर्यंत तब्बल १११ पदकांची कमाई केली आहे.  त्यात राज्यस्तरावर ५० सुवर्ण पदके, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्णपदके तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. २०१६ मध्ये संपन्न झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयश जाधवने भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली. 

सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आली तेव्हा त्याचे कुटुंब हे शेतावरील त्यांच्या घरात होते. नारायण जाधव यांनी आपल्या मुलाला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद व्यक्त करत पेढे वाटले. सुयशने देखील त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी झगडणाऱ्या पालकांच्या चरणावर मस्तक ठेऊन त्यांना वंदन केले. आता टोकियो ऑलम्पिकमध्ये देशाला जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून द्यायचे स्वप्न सुयशने बाळगले आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सुयशने गेले पाच महीने टॅंक किंवा जिम मध्ये सराव केला नसला तरी सर्व सुरळीत झाल्यावर पुन्हा एकदा जिद्दीने पुढील येणाऱ्या स्पर्धांसाठी तयारी करण्याची इच्छा सुयशने व्यक्त केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News