ऑलिंपिकवर लक्ष केंद्रीत करणारा रायगडचा अर्जुन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 December 2019

महाड तालुक्‍यातील माझेरी या छोट्याशा गावातील तन्मय या खेळाडूने तिरंदाजीचे लक्ष्य आता ऑलिम्पिकवर केंद्रित करत. आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील १२५ पदकांची कमाई केली.

महाड : ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय पातळीवरही चुणूक दाखवू शकतात, हे तन्मय मालुसरे या तरुण तिरंदाजाने सिद्ध करून दाखवले आहे. महाड तालुक्‍यातील माझेरी या छोट्याशा गावातील या खेळाडूने तिरंदाजीचे लक्ष्य आता ऑलिम्पिकवर केंद्रित केले आहे. आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील १२५ पदकांची कमाई तन्मयने केली आहे. तिरंदाजी किंवा धनुर्विद्या हा प्राचीन काळातील प्रचलित क्रीडा प्रकार आहे. रामायण-महाभारताप्रमाणे प्राचीन युद्धे धनुर्विद्येच्या जोरावर जिंकली जात होती. आता या खेळात आधुनिक शस्त्रे वापरली जात आहेत. 

महाड - पुणे मार्गावरील वरंध घाटामध्ये माझेरी एक छोटेसे गाव आहे. या गावातील तन्मय मालुसरे यांनी त्याचे वडील अनिल मालुसरे यांच्या मित्राची मुलगी तिरंदाजीचा सराव करताना पाहिली. आणि तन्मयच्या मनातही तिरंदाजीबद्दल आकर्षण निर्माण झाले. आपल्यालाही हा खेळ खेळता आला पाहिजे, या जिद्दीतून त्यानेही हळूहळू तिरंदाजीचा सराव सुरू केला. 

महाडसारख्या ठिकाणी तिरंदाजीला वाव नव्हता; तरीही वयाच्या १५ व्या वर्षापासून तिरंदाजीमध्ये करिअर पणाला लावलेल्या या तरुणांनी आता ऑलिंपिकमध्ये उद्दिष्ट ठेवले आहे. गावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ तिरंदाजीसाठी तन्मयने पुणे वाघोली येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत नाव नोंदवले. त्यानंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी पुण्यातील भारती विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला; परंतु इंजिनिअरिंगचा मोठा अभ्यास आणि तिरंदाजी यातून तिरंदाजीसाठी आवश्‍यक असणारा सराव याचा मेळ बसत नव्हता. तिरंदाजीकडे दुर्लक्ष होऊ नये, अशा वेळी काही तरी एक निवडण्याचे आव्हान तन्मयसमोर उभे राहिले.

अशा वेळी तन्मयने तिरंदाजीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये पुण्यातून त्यांनी तिरंदाजीला सुरुवात केली. २०१४ मध्ये त्याला पहिले राष्ट्रीय पदक मिळाले आणि राष्ट्रीय पातळीसाठी त्याची निवडही झाली. त्यानंतर तन्मयने तिरंदाजीचा सराव दिवस-रात्र करत वाटचाल सुरू ठेवली. थायलंड येथील प्रिन्सेस कप असो, की मंगोलिया येथील जागतिक विद्यापीठ चॅम्पियनशिपसाठी झालेली निवड असो, तेथे त्याने खेळाचा ठसा उमटवला. फरिदाबाद येथे सिनियर नॅशनल संघासाठी मिळवलेले सुवर्णपदक, ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत मिळालेले पदक अशी सुमारे १२५ पदकांची कमाई तन्मयने केली आहे. 

तन्मयला ३५ पुरस्कार 
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेत वाटचाल करणाऱ्या प्रत्येक खेळाडूची ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खेळण्याची सर्वाधिक इच्छा असते. २०१६ साठी रियो ऑलिंपिक सरावासाठी त्यांची निवड झाली होती. २०१४ मध्ये त्याने आशियाई स्पर्धेसाठी सराव केला होता, हे त्याचे मोठे यश आहे. आता २०२४ ऑलंपिकमध्ये निवड होण्याच्या दृष्टीने तन्मयचे प्रयत्न सुरू आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी तिरंदाजीमध्ये झोकून देणारा तन्मय २२ व्या वर्षी ऑलिंपिकसाठी संघर्ष करत आहे. तन्मयने तिरंदाजीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल रायगड जिल्हाप्रमाणे राज्यातील विविध भागांमध्येही घेण्यात आली आहे. तन्मयला आतापर्यंत ३५ पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये रायगड भूषण तसेच वामनदादा करंडक महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले आहे. पुणे येथील रणजीत कांबळे यांच्याकडे पुणे आर्चरी अकादमी येथे त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. विविध ठिकाणी भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तन्मयचे देशासाठी ऑलिंपिक पदक जिंकून देण्याचे स्वप्न आहे.

तिरंदाजी किंवा धनुर्विद्या हा प्राचीन काळातील प्रचलित क्रीडा प्रकार आहे. रामायण-महाभारताप्रमाणे प्राचीन युद्धे धनुर्विद्येच्या जोरावर जिंकली जात होती. आता या खेळात आधुनिक शस्त्रे वापरली जात आहेत. महाड तालुक्‍यातील माझेरी या छोट्याशा गावातील तिरंदाज तन्मय मालुसरे याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर कामगिरीची छाप पाडून १२५ पदकांची कमाई केली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्याला आतापर्यंत ३५ पुरस्कार मिळाले आहेत. पुण्यातील रणजीत कांबळे यांच्या पुणे आर्चरी अकादमी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या तन्मयचे देशासाठी ऑलिंपिक पदक जिंकून देण्याचे स्वप्न आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News