ठाकरे सरकारच्या कामावर तरुणाई समाधानी आहे का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी ओरड विरोधकांनी सुरु केली, मात्र हे सरकार जनतेचे आहे विकासकामातून ठाकरे सरकारने सिद्ध करुन दाखवले.

मुंबई : यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. केंद्रात दोन वेळा आणि राज्यात एक वेळा भाजप सरकार असताना महाविकास आघाडीने सत्तेची सुत्रे हाती घेतली. एकीकडे धर्मनिरपेक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि दुसरीकडे हिंदूत्त्वाचा पुरस्कर्ता शिवसेना, दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. मात्र या काळात एक सत्तानाट्य घडले. राष्ट्रवादीच्या एक गटाने भाजपाशी हातमिळवणी केली आणि सुर्योदयापुर्वीच भाजप- राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यंत्री पदाची शपथ घेतली. मात्र भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे भाजपची फार मोठी नामुश्की झाली. शेवटी महाविकास आघाडी सत्तेवर आली. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी ओरड विरोधकांनी सुरु केली, मात्र हे सरकार जनतेचे आहे विकासकामातून ठाकरे सरकारने सिद्ध करुन दाखवले. 'ठाकरे सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? कसे ?' या विषयावर 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी आज मनसोक्त चर्चा केली. या झालेल्या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

युतीसोबतचा अनेक वर्षांचा संसार मोडत, उध्दव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकार स्थापण केलं. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर नांदतील की नाही अशी शंका होती. परंतु तिन्ही पक्षाची मोट बांधण्यात पवार साहेब यशस्वी ठरले असं म्हणायला हरकत नाही. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात नागरिकांशी चांगला संवाद साधून त्यांना कोरोना काय आहे, समजवून देण्यात ते यशस्वी झालेत असं मला वाटतं. लोकांकडून उध्दव ठाकरेंच कौतुक केलं आहे. 
- महेश घोलप

ठाकरे सरकार यांच्या कामावर पूर्णपणे समाधानी नसलो तरी, एक आत्मीयता वाटत आहे. कारण प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्री पद येणे आणि त्यात लगेच कोरोना सारखे संकट. यामध्ये त्यांनी सरकार सांभाळून सर्व योजना योग्य प्रकारे राबवत आहेत. यामध्ये खर श्रेय आदरणीय पवार साहेबांचे आहे. त्यांचा अनुभव ठाकरे सरकारच्या कामाला येत आहे. परंतु त्यांनी शेतकरी कष्टकरी वर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. खताचा पुरवठा योग्य प्रकारे झाला नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी गोंधळलेले आहेत. मागील 5 महिन्यात माझ्या माहितीनुसार 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्नाबाबत अजूनही ठोस अस निर्णय नाही. जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी भविष्यातील काही उपयोजना केलेल्या सध्या तरी दिसत नाही. बऱ्याच जिल्ह्यामध्ये ठाकरे सरकार मधील मंत्र्यांचा प्रशासन व अधिकारी यांच्यावर वचक नाही. त्यामुळे त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
- तेजस पाटील

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार चालवणे अत्यंत कठीण आहे. परंतु, विरोधकाला बाजूला ठेवण्यासाठी महाविकास आघाडी उदयास आली.  ठाकरे सरकारमध्ये अत्यंत अनुभवी मंत्री असल्याकारणाने ठाकरे सरकार उत्तम चालेल यात शंका नाही. परंतु आज कोरोनाची परिस्थिती बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कायम टीका होत असते. सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी वचन दिल्याप्रमाणे शिवभोजन थाळी सुरू केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात व तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू झाल्या. एवढ्या तळागाळापर्यंत कुठली योजना असेल असे मला वाटत नाही. त्याचबरोबर कर्जमाफीची योजना सुद्धा त्यांनी सुरू केली. परंतु, त्यानंतर कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बाकीच्या सगळ्या ब्रेक लागला. यामुळे ठाकरे सरकारवर मी समाधानी आहे.  शेवटी कुठलाही मुख्यमंत्री किंवा कुठलाही नेता शंभर टक्के समाधान जनतेचे करू शकत नाही त्यात काही नाराजी असते आणि आणि ते आपल्याला दिसून येत आहे.
- गणेश स्वामी

हे खरं आहे की राज्यात आज महाविकास आघाडी सरकार बाबत लोक समाधानी आहे. सद्य परिस्थिती बघून सरकारला लोकांची सहानभूती आहे माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात एक विश्वासू नेतृत्व जनता आज बघत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा लाभलेले अतिशय शांत व संयमी नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून लोक त्यांच्याकडे बघत आहेत. डब्ल्यू एच ओ सन्मानित केले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण हा अतिशय सकारात्मक आहे.
- रुपेश पाटील

होय मी समाधानी आहे कारण सरकार स्थापन झाले तेव्हापासून मिळालेल्या संधीचे सोन त्यांनी केलं. ठाकरे सरकारने  कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना पिक विमा भेटला, सारथी चा प्रश्न मार्गी लागला, शिष्यवृत्ती मुलाना वेळेत जमा होतेय, 12 पोलीस भरतीची घोषणा केली, महापोर्टल बंद केले, कमी काळात खूप काम करण्यासाठी कटीबद्ध असलेले सरकार आहे परंतु, कोरोना संकटामुळे अडचणी आल्या आहेत पण लवकरच दूर होईल आणि सरकार अजून प्रभावी काम करेल.
- परमेश्वर इंगोले पाटील

विकास आणि प्रगतीसाठी स्थिर आणि बहुमत प्राप्त असलेलं सरकार किंवा एका विचाराचे सरकार नेहमी जनतेच्या फायद्याचे असते. मग ती विचारसरणी डावी असो की उजवी. सध्याचे सरकार हे तीन पक्षीय सरकार आहे. ज्यांची विचारसरणी वेगळी आहे. ठाकरे सरकार मध्ये शिवसेनेचे मोजके मंत्री सोडले तर इतर मंत्र्यांना अनुभव कमी असावा. कारण ते हवे तसे कार्यरत दिसत नाही. काँग्रेस पक्षाचा फक्त टेकू देण्यासाठी उपयोग होतोय का? असे वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री हे अनुभवी आहेत. त्याप्रमाणे ते तळागाळापर्यंत काम करत आहेत. पण ठाकरे सरकार धाडशी निर्णय घ्यायला अजूनही तयार नाही. जे आजच्या तरुण पिढीला आकर्षीत करतात. तसेच कोरोना परिस्थितीमध्ये सुद्धा सुधारणा करता आली नाही. दवाखान्यांमध्ये वाढलेलं गोंधळ. तसेच जास्तीत जास्त मुंबई केंद्रीत लक्ष असल्याचे दिसून येते. कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागाकडे पाहिजे असे लक्ष नाही, असे वाटते. विरोधी पक्ष सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतो, सत्ताधारी लक्ष ठेवण्यासाठी. पण सध्या वैयक्तीक हेवेदावे यांवर जास्त चर्चा दिसून येते. राज्याच्या विकासावर वाद झाले पाहिजेत. ते दिसून येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षाला शब्दाने उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर दिले तर त्याचा चांगला परिणाम जनतेच्या मनावर पडेल. हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. याची सुद्धा कमतरता जाणवते. तरी कोरोना काळात सगळ्या अपेक्षा ठेवणे पण चुकीचे आहे. कारण त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून वेळ दिला पाहिजे. पण जोपर्यंत राज्यात पुढील चार वर्षात नक्की काय करायचे आहे याचा वेळापत्रक बनवून त्यावर काम चालू नाही होत तोपर्यंत कामात सुसूत्रता दिसून येणार नाही. वेळेत निर्णय घेतले नाही तर ते निर्णय चुकतात. त्यामुळे उद्धावे ठाकरे यांनी त्यांचा पदाचा आणि अधिकाराचा योग्य आणि वेळेत वापर करावा. समाधानी आहे का नाही ही शेवटी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरच सांगता येईल. कारण त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून खूप वेळ आहे.
- शंभूराज पाटील.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर एक ना अनेक संकटे राज्यावर येतच आहे. उद्धवजी ठाकरे साहेब त्या प्रत्येक संकटांना तोंड देत महाराष्ट्र सांभाळत आहे. कोरोना सारख्या भयंकर संकटात वेळोवेळी त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. टाळ्या, घंट्या, ताट वाजविण्यापेक्षा त्यांनी त्यावर उपाय योजनावर भर दिला. महाराष्ट्रातील नागरिकांची मात्र मुख्यमंत्र्यांना साथ मिळत नाही हे देखील खरे. धारावी सारख्या आशिया खंडाच्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून कोरोना हद्दपार करून दाखवला. शहरी भागात नागरिकांची उदासीनता अशी की लॉकडाउन असताना देखील लोक विनाकारण बाहेर निघत आहेत. कुठेतरी मुख्यमंत्र्यांना जनतेची साथ मिळावी म्हणजे लवकरच महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल.
- प्रशांत बदकी

असमाधानी असण्याचं कारणंच नाही मुख्यमंत्री साहेब यापूर्वी कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते त्यांना प्रशासनाचा कोणताही अभ्यास नव्हता तरी देखील आज कोरोनाच्या या महाभयंकर आपत्तीला सावरण्याचे काम ते करत आहेत आर्थिक परिस्थिती मंदावलेली असतेवेळी देखील माझ्या शेतकरी राजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी कर्जमाफी केली महाविद्यालयीन परीक्षेच्या संदर्भात देखील विद्यार्थी हिताची भूमिका घेऊन परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात देखील रद्द करण्यासाठी ते आग्रही आहेत याच बरोबर अनेक महत्वाचे निर्णय या सहा महिन्याच्या काळात झाले आणि हे करण्याची धमक फक्त आणि फक्त ठाकरे सरकार करू शकत..
-श्रीकांत जाधव

ठाकरे सरकार आल्यापासून बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडून आल्या आहेत. तसेच अनेक प्रलंबित विषयांचे निर्णय यावेळी लागले.जे स्वागतार्ह आहेत. आणि विशेषकरून सध्याची कोरोनाची जी परिस्थिती आहे, ज्याने संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्यांना आधार देण्याचं काम या सरकारने केलं आहे. एवढंच नाही तर कोरोनास्थिती अत्यंत काळजीपूर्वक हाताळली जात आहे
- नागेंद्र स्वामी

मागील काही वर्षातील सरकारी यंत्रणा पाहता मला आनंदाने सांगायला आवडेल की, मी ठाकरे सरकारच्या कामावर काही अंशी समाधानी आहे, मागील काही महिन्यांपासून चालू असलेली चर्चा त्यात ठाकरे सरकार टिकणार का नाही, हे तीन चाकी सरकार आहे असा विरोधी पक्ष हिणवत असताना देखील ,भिन वीच्यारी पक्ष एकत्र येऊन एकनिष्ठ पणे काम करत हे सोप नसतं परंतु, उध्दव जी ठाकरे साहेब यांनी ते शक्य करून दाखवले, सरकार येताच २ लाखाची शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊन आपला शब्द काही अंशी पाळला, सरकारी यंत्रणा चांगली चालत असताना कोरोना सारख्या महामारीच्या संकटात कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना उत्तम पणे काम करत आहे हा काही गोष्टी या काळात नवीन घडल्या, पण आणि काही गोष्टी करताही आल्या असत्या पण त्या राहून गेल्या शेतकऱ्यांचा विषय असो ज्या पीक विमा कंपन्या शेतकऱ्याची लूट करत आहे त्याकडे दुर्लक्ष झालं आसं मला वाटतयं पण येत्या काळात न्याय मिळेल एवढी अपेक्षा आणि ठाकरे सरकार चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात काम करत राहो व एक मजबूत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण होईल एवढीच अपेक्षा..
- दिपक वाघ

हो मी ठाकरे सरकारच्या कामावर समाधानी आहे. महाराष्ट्रला खूप चांगले मुख्यमंत्री मिळले. आता महाराष्ट्रावर एवढे मोठे कोरोनाचे संकट आले तरी ते सुध्दा ते व्यवस्थित पध्दतीने हाताळत आहे. वेळच्या वेळी लॉकडाऊन देखील ते करत आहेत. लॉकडाऊन देखील त्यांनी गरजे नुसार केले आहे. ज्या ठिकाणी खरंच गरज आहे त्या ठिकाणी कडक लाकडाऊन केले आणि जिथे लाकडाऊनची आवश्यकता नाही त्या ठिकाणी शिथल लॉकडाऊन ठेवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याची आधी जी आश्वासने दिली ती त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण देखील केली आहेत. मुख्यमंत्र्यानी शपथ घेतल्या नंतर अनेक चांगली कामे केली आहेत.  विद्यार्थांच्या हिताचे अनेक निर्णय देखील त्यांनी घेतले आहेत. मुख्यमंत्री असून देखील सामान्य माणसा प्रमाणे ते वागतात. विरोधी पक्ष सतत त्यांच्यावर टिका करत असतात. परंतु ते त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करून ते त्यांना वाटते तसे ते योग्य काम करतात. शेतकऱ्यांना सुध्दा कर्ज लवकरात लवकर मिळण्यासाठी त्यांनी काही उपयायोजना देखील केल्या आहेत. अनेक लोक म्हणायचे की, हे महाविकास आघाडी सरकार टिकणारं नाही कारण अनेक मतभेद निर्माण होतील. पण या सरकारने बोलणाऱ्याचे तोंड बंद करून दाखवून दिले की, हे सरकार टिकू शकते आणि नवनविन बदल घडून आणू शकते. उध्दव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री जे आषाढी एकादशीला स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले. एवढेच नव्हे तर तेव्हा त्यांच्या सोबत गाड्यांचा ताफा नव्हता. मुख्यमंत्री असून देखील सामान्य माणसात राहून सामान्य माणसा सारखे वागणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. आज त्याचा वाढदिवस आहे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना सांगितले आहे की, माझे कुठे ही बॅनर लावू नका आणि मला भेटण्यासाठी कोणीही घराच्या बाहेर येऊ नका, घरात राहा आणि सुरक्षित रहा असे त्यांनी सांगितले आहे. रक्तदान करा हा संदेश आज त्यांनी एका वृत्तवाहिनीद्वारे सांगितले आहे. 
- रसिका जाधव

ठाकरे सरकारमध्ये प्रामुख्याने कोणतेही निर्णय घेताना सर्व मंत्र्यांना विचारात घेऊन निर्णय घ्यावेत. तसेच मागील सरकारने ज्या योजना राबविल्या होत्या त्या योजना बंद न करता पुढे चालू ठेवाव्यात. प्रामुख्याने शेतकऱ्यांना बांधावर खत पोहोचविण्याची जी योजना आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी. तसंच खतांचा काळाबाजार जो चालला आहे तो थांबवावा. वेळोवेळी केंद्र सरकारचे मार्गदर्शन घ्यावे. तसंच केंद्रात जो GST कर लागू केला आहे. त्याची राज्यात योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. शक्यतो नुकसानभरपाईचे पैसे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावे.
- स्वप्निल सच्चिदानंद नावडकर

मी ठाकरे सरकारच्या कामावर खूप समाधानी आहे. आपल्या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला एक संयमी आणि प्रेमळ मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे मिळाले आहेत. तीन पक्ष एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले, आणि मग या सरकार वर विरोधी पक्षांनी अनेक ठिकाशस्त्रे सोडली. तरीसुद्धा हे सरकार खंबीरपणे उभे राहिले हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच मुख्य म्हणजे ठाकरे सरकारनी जनतेला जी आश्वासने दिली होती ती टप्याटप्याने यशवीरित्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्यात ते यशस्वी होत होते. पण त्यातच ह्या महाराष्ट्राला कोणाची नजर लागली देव जाणे आणि या महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक संकट येऊन उभी राहिली. कोरोना, चक्रीवादळ, टोळधाड या संकटांनी महाराष्ट्राला पार पिजून ठाकले.  मुख्य म्हणजे कोरोनासारख्या महामारीच्या संकटाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला तरी सुद्धा  कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय अनुभव नसताना देखील, उद्धव ठाकरेंनी कोणत्याही परिस्थितीचा आव न आणता अगदी व्यवस्थित, काटेकोरपणे,आणि डोळ्यात तेल घालून  उत्कृष्ट पद्धतीने हे संकट हाताळत आहे. तसेच आपला महाराष्ट्र हा एक मराठी माणूस किती उत्तमपणे सांभाळू शकतो हे सर्वांच्या डोळ्यासमोरील ज्वलंत उदाहरण हे उद्धव ठाकरे आहेत. वेगवेगळ्या प्रकारे होणाऱ्या टिकेकडे दुर्लक्ष करून, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न व्यवस्थितपणे समजून ते हाताळणे आणि जनतेच्या विकासाकडे लक्ष देणारे  मुख्यमंत्री आहेत. आज खरोखरच आपल्या महाराष्ट्राला सुटाबुटातला नुसत्याच बढाया मारणारा  मुख्यमंत्री नाही, तर या गोर-गरीब सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेचा विचार करणारणारे मुख्यमंत्री हवे होते. आणि ते उद्धव ठाकरेंच्या रूपात जनतेला मिळालेही ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांना जे वेळोवेळी शरद पवार यांचं मोलाचं योगदान, मार्गदर्शन मिळाले ते खूप प्रेरणादायी ठरले. अगदी अशाच प्रकारे जर सर्व मराठी माणसे एकत्र येऊन या महाराष्ट्राचे नेतृत्व करू लागली, तर नक्कीच आपला महाराष्ट्र  प्रगतीच्या दिशेने पाऊले टाकून यशस्वी होईल आणि मग या महाराष्ट्रावर वाकडी नजर सुद्धा कोणी फिरकवणार नाही.
- शिल्पा नरवडे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News