'या' कारणांमुळे होतो गर्भाशयाचा कर्करोग.. 

नेत्वा धुरी
Monday, 11 March 2019

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्करोगामध्ये प्रामुख्याने महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. लागण किंवा उपचार यांबाबतही माहिती नीटशी घेतली जात नसल्याने महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग असा काही प्रकार असतो हेच मुळी समजत नव्हतं. वाढत्या जनजागृतीमुळे या कर्करोगाबाबत आता नेमका आकडा समोर येऊ लागला आहे. असं असलं तरी आता आधुनिक औषधोपचारांनी या कर्करोगाला प्रतिबंध आणता येतोय.

आपल्या देशात प्रत्येक सात मिनिटांनी एका महिलेचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतोय. गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाला झालेला कर्करोग. २५ ते ४५ वयोगटातील शरीरसंबंध आलेल्या महिलेला गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्‍यता दाट असते. शरीरसंबंधादरम्यान होणाऱ्या संसर्गामुळे (sexually transmited infection) गर्भाशयाचा कर्करोग होतो.

गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत मुळात माहिती मिळाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपायांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांना संपर्क करायला हवा. महिला पहिल्यांदाच आपल्या जोडीदारासोबत शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी प्रतिबंधात्मक इंजेक्‍शन घेऊ शकते; मात्र हा कर्करोग एकापेक्षा जास्त पुरुषांशी शरीरसंबंध आल्याने होत असल्याची माहिती वोक्‍हार्ट रुग्णालयाच्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. मेघल सांघवी यांनी दिली.

काही वर्षांपर्यंत गर्भाशयाच्या कर्करोगाचे उशिराने निदान व्हायचे. आता मात्र या कर्करोगाला वेळीच प्रतिबंधही घालता येतो. पहिल्या शारीरिक संबंधापूर्वी तसेच शारीरिक संबंध आल्यानंतर दर तीन वर्षांनी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून आवश्‍यक तपासण्या करून घ्याव्यात, असा सल्ला मुंबई सेंट्रल येथील वोक्‍हार्ट रुग्णालयाच्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. मेघल सांघवी सांगतात.

गर्भाशय कर्करोगाची जाणीव आता महिलांमध्ये होत असल्याने या केसेस जास्त दिसत असल्याचेही त्या म्हणतात. ‘अशक्तपणा, सततचे गर्भारपण यामुळे ग्रामीण महिलांमध्ये गर्भाशयातला कर्करोग जास्त प्रमाणात आढळून येतो. माझ्याकडे राज्यातल्या ग्रामीण भागांतून गर्भाशयाचा कर्करोग झालेली महिला आली होती. तिचा कर्करोग पुढच्या पातळीवर गेला होता; मात्र ती बरी झाली’, थोडक्‍यात हा आजार बरा होतो, हा मुद्दाही त्या अधोरेखित करतात. 

तुम्ही रोजच्या जगण्यात निरोगी सवयी ठेवल्या तरीही गर्भाशयाचा कर्करोग टाळता येऊ शकतो, असे डॉ. सांघवी म्हणतात. पाळीच्या दरम्यान आजही कित्येक महिलांना सातत्याने सॅनिटरी नॅपकिन्स बदलायचा कंटाळा येतो. त्यामुळे मूत्रमार्गावर संसर्ग होतो. त्याचा थेट परिणाम गर्भाशयाच्या कर्करोगावर होत असल्याचे त्या म्हणतात.

त्याचप्रमाणे एकामागून एक गर्भारपण ठेवता कामा नये, दोन गर्भारपणामध्ये किमान दोन वर्षांचे अंतर हवे. एकापेक्षा अनेक पुरुषांसोबत शारीरिक संबंध टाळावेत, असा सल्लाही त्या देतात. एकाच पुरुषासोबत सतत शारीरिक संबंध आले तर गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका नाही, असेही त्या म्हणाल्या.

प्रमुख कारणे 

 •  पुरेसा आहार न घेणे
 •  अशक्तपणा
 •  अनेक वेळा गर्भारपण राहणे
 •  अनेक पुरुषांशी आलेला शारीरिक संबंध
 •  लक्षणे 

  •  दोन मासिक पाळ्यांमधील दिवसांचे अंतर कमी होणे
  •  एरवीही अंगावरून रक्त जाणे
  •  अनियमित पाळीत अतिरक्तस्राव होणे
    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News