पुण्यात ‘या’ दिवासापासून तिरंदाजांचे शिबिर  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठीच शिबिरांना परवानगी देण्याचे ठरवले आहे, त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजांचे शिबिर सुरू होताना केवळ रिकर्व्ह तिरंदाजांनाच निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई :- भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठीच शिबिरांना परवानगी देण्याचे ठरवले आहे, त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजांचे शिबिर सुरू होताना केवळ रिकर्व्ह तिरंदाजांनाच निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी एकंदर १६ तिरंदाज या शिबिरात सहभागी होतील.

सकाळने काही दिवसांपूर्वी भारताच्या तिरंदाजांचे ऑलिंपिक सराव शिबिर पुण्यात होणार असल्याचे वृत्त दिले होते. त्यानुसारच निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरणाने घेतला आहे. या शिबिरासाठी निवडलेले तिरंदाज २५ ऑगस्टला पुण्यातील लष्कर क्रीडा संस्थेत दाखल होतील. कोरोना चाचणीनंतर त्यांना १५ दिवस विलगीकरणात राहावे लागेल. त्यानंतरच त्यांचा सराव होणार आहे असे वृत्त आहे.

पुण्यातील लष्कर क्रीडा संस्थेतच तिरंदाजांची निवास व्यवस्था असेल. हा परिसर कमालीचा सुरक्षित विभाग आहे. त्यामुळे हे सरावाचे ठिकाण जैवसुरक्षित आहे. या संस्थेच्या नियमानुसार या ठिकाणी महिलांची निवास व्यवस्था करता येत नाही; मात्र तो प्रश्‍न आता सोडवण्यात आला असल्याचे संकेत मिळत आहेत. या ठिकाणी काही आठवड्यांपासून तरुणदीप राय, अतानु दास आणि प्रवीण जाधव हे लष्करातील नेमबाज सराव करीत आहेत.

पुण्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण असल्यामुळे जमशेदपूर, दिल्ली तसेच रांचीचा विचार केला जात होता, पण लष्करी क्रीडा संस्थेची सुरक्षा काटेकोर असल्यामुळे त्याच ठिकाणी अखेर शिबिर घेण्याचे ठरले असल्याचे संकेत देण्यात आले होते. दरम्यान, या शिबिराच्या वेळी क्रीडा प्राधिकरण, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येईल, असे क्रीडा प्राधिकरणाच्या पत्रकात म्हटले आहे.

शिबिरातील तिरंदाज :-

पुरुष :- तरुणदीप राय, अतानू दास, बी धीरज, प्रवीण जाधव, जयंत तालुकदार, सुखमणी बाबरेकर, कपिल, विश्‍वास.

महिला :- दीपिका कुमारी, अंकिता भकत, एल. बॉम्बयला देवी, रिधी, मधू वेदवान, हिमानी, प्रमिला बारिया, त्रिशा संचेती. चार मार्गदर्शक तसेच दोन सपोर्ट स्टाफ.

तिरंदाजी संघटनेकडून दुजोरा

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने २५ ऑगस्टपासून राष्ट्रीय शिबिर सुरू होईल असे जाहीर केले. भारतीय तिरंदाजी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News