अ‍ॅपलचे घडयाळ आता तब्येतीची काळजी घेणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 September 2020
  • सप्टेंबर महिना हा अ‍ॅपल चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. अ‍ॅपल चाहत्यासाठी आता नविन घड्याळ लॉन्च होणार आहे.
  • करोनामुळे प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या गोष्टींचा समावेश असलेले नवे ‘अ‍ॅपल ६’ हे मनगटी घडयाळ अ‍ॅपल या कंपनीने मंगळवारी एका कार्यक्रमातून जाहीर केले.

मुंबई :- सप्टेंबर महिना हा अ‍ॅपल चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. अ‍ॅपल चाहत्यासाठी आता नविन घड्याळ लॉन्च होणार आहे. करोनामुळे प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या गोष्टींचा समावेश असलेले नवे ‘अ‍ॅपल ६’ हे मनगटी घडयाळ अ‍ॅपल या कंपनीने मंगळवारी एका कार्यक्रमातून जाहीर केले. रक्तातील ऑक्सीजन मोजण्याच्या सुविधेसह ‘हॅण्डवॉश’ बाबत सूचना देणे, व्यायामाचे धडे देणे, हृदयाचे ठोके मोजणे आणि त्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यांशी सदैव संपर्कात ठेवणारी वैशिष्टये या घडयाळात आहेत.

‘अ‍ॅपल ६’ खेरीज ‘अ‍ॅपल एसई’ हे स्मार्ट वॉच, आयपॅड आठ आणि आयपॅड एअर यांचीही घोषणा कंपनीच्या ‘टाइम फ्लाइज’ या ऑनलाइन सोहळयातून करण्यात आली.

करोना काळात ऑक्सीमीटर, हृदयाची गती मोजणे इत्यादी गोष्टी नित्यक्रमाचा भाग झाल्या आहेत. ही नस ओळखून अ‍ॅपलने आपल्या नव्या घडयाळात शारीरीक हालचालींची नोंद ठेवणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. यातील ऑक्सिमीटरसाठी संवेदक (सेन्सर) लावलेले असून चार रंगांचे एलईडी दिवे त्यात आहेत. लाल रंगाच्या प्रकाशलहरी किती प्रमाणात शोषल्या जातात यावरून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ठरते. त्यानंतर अ‍ॅपल अलगॉरिदमच्या मदतीने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते. याशिवाय यात हृदयाचे ठोकेही मोजले जाणार आहेत.

अ‍ॅपल वॉच ६ मालिकेत कोविडच्या दृष्टिकोनातून नवीन वैशिष्टयांचा समावेश केला आहे. त्यात हँडवॉशिंग टायमर, स्लीप ट्रॅकर यांचाही समावेश आहे.

फिटबिट ही कंपनी गूगलची ‘अल्फाबेट इनकार्पोरेशन’ विकत घेत असून त्यांच्या घडयाळातही ऑक्सिमीटर आहे. फिटबिटशी हे घडयाळ स्पर्धा करणार आहे.

अ‍ॅपल वॉच रोज १४ तास चालू शकते. त्यात फॅमिली सेट अप आहे. त्याची किंमत भारतात जीपीएससह ४० हजार ९९० रुपये, तर जीपीएस आणि सेल्युलरसह ४४ हजार ९९० रुपये इतकी असेल.

‘अ‍ॅपल’ची नवीन उत्पादने

‘अ‍ॅपल वॉच एसई’ हे भारतीयांना परवडणाऱ्या किमतीत असून त्याचा डिस्प्ले मोठा आहे. त्यात व्यायामशाळेतील साधनांशी सुसंसगती साधणारे काही संवेदक असून स्लीप अ‍ॅपही आहे. हँडवॉश म्हणजे हात धुण्याची आठवण करून देण्याची व्यवस्था आहे. याची किंमत जीपीएससह २९ हजार ९०० रुपये, तर जीपीएस आणि सेल्युलरसह ३३ हजार ९०० रुपये आहे.

आयपॅड ८ ची नवी आवृत्ती आली असून त्यात ए १२ बायोनिक चिप आहे. यात मशीन लर्निगच्या पातळीवरचे तंत्रज्ञान असून सिरी, छायाचित्र संपादन, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, अ‍ॅपल पेन्सिल, एलटीई कनेक्टिव्हिटी, टच आयडी सपोर्ट ही वैशिष्टय़े आहेत. आयपॅड ८ ची किंमत वायफाय मॉडेलसाठी २९ हजार ९०० आणि वायफाय अधिक सेल्युलर मॉडेलसाठी ४१ हजार ९०० रुपये आहे. अ‍ॅपल पेन्सिलची स्वतंत्र किंमत ८ हजार ५०० रुपये असून स्मार्ट कीबोर्ड १३ हजार ९०० रुपयांना आहे. एकूण ३० भाषांचा समावेश त्यात आहे.

आयपॅड एअरची नवी म्हणजे चौथी आवृत्ती सादर करण्यात आली असून त्यात ए १४ बायोनिक प्रोसेसर आहे. त्याची किंमत ५४ हजार ९०० ते ६६,९०० दरम्यान राहील. तो ६४ जीबी आणि २५६ जीबी पर्यायात असणार आहे.

अ‍ॅपल वन सेवांमध्ये अ‍ॅपल म्युझिक, अ‍ॅपल टीव्ही, अ‍ॅपल आर्केड, अ‍ॅपल क्लाऊड यांचा समावेश आहे. तुलनेने त्याची किंमत कमी ठेवली आहे. ५० जीबी क्लाऊड स्टोरेजसह महिन्याला १९५ रुपये खर्च आहे. अ‍ॅपल फिटनेस ही सशुल्क सेवा असून त्यासाठी भारतातील लोकांना वाट पाहावी लागेल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News