विज्ञानवादी ते मोदीविरोधी छात्रभारती संघटना

संदीप काळे / सुरज पाटील (सकाळ वृत्तसंस्था, यिनबझ टीम)
Thursday, 28 March 2019

छात्रभारती विद्यार्थी संघटना बहुजनांच्या मुलांचे कवचकुंडल म्हणून गेल्या 36 वर्षांपासून कार्यरत आहे. संघाच्या माध्यमातून पेरल्या जाणाऱ्या विषाला प्रत्युत्तर म्हणून छात्रभारतीने अनेक यशस्वी प्रयोग केले. चुकीच्या प्रथांचा नेहमी फडशा फाडण्याचं काम या संघटनेने केले आहे. आता नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षे कारकिर्दीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जे काही चुकीचे निर्णय झाले आहेत, त्या निर्णयाला सातत्याने बदलण्यास भाग पाडायला लावण्यास छात्रभारती कारणीभूत होती.

छात्रभारती विद्यार्थी संघटना बहुजनांच्या मुलांचे कवचकुंडल म्हणून गेल्या 36 वर्षांपासून कार्यरत आहे. संघाच्या माध्यमातून पेरल्या जाणाऱ्या विषाला प्रत्युत्तर म्हणून छात्रभारतीने अनेक यशस्वी प्रयोग केले. चुकीच्या प्रथांचा नेहमी फडशा फाडण्याचं काम या संघटनेने केले आहे. आता नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षे कारकिर्दीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जे काही चुकीचे निर्णय झाले आहेत, त्या निर्णयाला सातत्याने बदलण्यास भाग पाडायला लावण्यास छात्रभारती कारणीभूत होती. मोदी सरकारने जी जी चुकीची शैक्षणिक धोरणे आखली, त्याला ही धोरणे चुकीची आहेत, असे छातीठोकपणे म्हणणारी छात्रभारती ही एकमेव संघटना आहे. 

"कोण लायेगा देश में क्रांती, छात्रभारती छात्रभारती', हा ऊर्जा देणारा नारा म्हणत खांद्यावर छात्रभारतीचा झेंडा घेऊन राज्यभर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी लढणारी एकमेव विज्ञानवादी संघटना म्हणून छात्रभारतीकडे आजही बघितले जाते. समाजवादी विचारसरणीच्या अनेक दिग्गज मान्यवरांनी एकत्रित येऊन छात्रभारती विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. अर्थातच, छात्रभारतीवर समाजवादी विचारसरणीचा कमालीचा पगडा होता. चुकीच्या प्रथांना थारा द्यायचा नाही, मूल्य शिक्षणासाठी सतत लढा द्यायचा आणि वंचित बहुजनांच्या मुलांना शिक्षणासाठी सर्व प्रकारची दारे खुली करायची, हा मूलमंत्र घेऊन लढणारी छात्रभारती, बहुजनांच्या विद्यार्थ्यांची संघटना म्हणून तेव्हापासून आजपर्यंत कार्यरत आहे. पहिले अध्यक्ष मु. ब. शहा ते आजचे अध्यक्ष प्रा. रवींद्र मेढे हा सर्व प्रवास एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. आजही विद्यार्थी संघटना आपले मूल्य जपण्याचे काम आणि युवकांना न्याय देण्याचे काम करीत आहे. 

'युवा चळवळीतला चेहरा' या नवीन सदराबद्दल सांगताना - संपादक संदीप काळे

काळ होता, शैक्षणिक वर्ष 1982 ते 1983 चा. या दरम्यानचा काळ म्हणजे देशात शैक्षणिक गुणवत्तेची भर पडत होती. इंजिनीअर, पॉलिटेक्‍निक आणि इतर शाखांचा विस्तार होण्यास सुरुवात होत होती. मात्र, त्या काळच्या महाराष्ट्र सरकारकडून अनेक धोरणांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यातील काही मुख्य धोरणे ही पुरेपूर विद्यार्थ्यांच्या आणि व्यवस्थेच्या विरुद्ध होती. बहुजन गरीब विद्यार्थ्यांचा विचार केल्यास त्या अटी-तटीने राबवण्यात येणाऱ्या धोरणांचा आणि आदिलशाही व्यवस्थेचा पाया रचण्याचं काम, त्या वेळच्या सरकारकडून केलं जात होतं. ती धोरणे, ती व्यवस्था, सरकारने मांडलेल्या संकल्पना या साऱ्यांना छेद देऊन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी स्वतंत्र आणि विशिष्ट नियमावलीत चालणाऱ्या संघटनेची गरज या काळात भासू लागली. प्रत्येक विद्यार्थ्याला शासन प्रणालीमधून मिळणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी, सरकारकडून मिळणाऱ्या मात्र भोंगळ कारभारामुळे मध्येच कुठेतरी खितपत पडणाऱ्या शिष्यवृत्तीसारख्या योजना, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी गरज भासू लागली, ती म्हणजे एका व्यवस्थेची आणि तीच व्यवस्था म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांनी सुरू केलेली छात्रभारती विद्यार्थी संघटना होय. 

गरीब विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांना आणि त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन 18 डिसेंबर 1983 रोजी छात्रभारती विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. देशात सुरू असलेले खासगीकरण, त्याचबरोबर सुरू असलेले बाजारीकरण रोखून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या शिर्षकाखाली वागवले पाहिजे, शिक्षणाचे सुरू असलेले बाजारीकरण थांबवायचे असेल तर सर्व विद्यार्थ्यांना मोफत सुविधा पुरविल्या पाहिजे. "राष्ट्रपती हो या मजदूर की संतान, सबको शिक्षा एक समान' या विचाराखाली छात्रभारती संघटना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. देशातल्या कितीही मोठ्या राजकारणी अथवा उद्योजकाचा मुलगा असला, तरी तो सामान्य विद्यार्थ्यांच्या सोबत शिकला पाहिजे; तसेच त्या विद्यार्थ्याला मिळणाऱ्या सुविधा या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे, या उद्देशाने छात्रभारती संघटनेने लढा उभा केला आहे. 

पहिलं सदर छात्रभारती या विषयी बोलताना - संपादक संदीप काळे

छात्रभारती संघटनेची सुरुवात ही सरकारच्या बंडखोरीच्या विरुद्ध आवाज उठवणारी ठरली. सुरुवातीच्या काळात सरकारने मांडलेल्या वेगवेगळ्या धोरणांविरुद्ध सामान्य विद्यार्थ्यांनी संघटित होऊन उठवलेला आवाज हा छात्रभारती संघटनेच्या रूपाने एकत्र येऊ लागला. ती धोरणे म्हणजे विनाअनुदानित शाळा आणि रात्रीच्या शाळांबद्दल. विनाअनुदानित धोरणाच्या अखत्यारित वेगवेगळे इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्‍निक कॉलेज उभे केले जात होते. त्या वेळी कॉलेजमधल्या डी.एड-बी.एड्‌च्या विद्यार्थ्यांना याचा मुख्य फटका बसू लागला. तर दुसरीकडे दिवसभर कष्ट करून, पोट भरून शिक्षणाची आवड असल्यामुळे रात्र शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय येत असताना सरकार मात्र डोळे बंद करून शांत निपचित असल्याचा आरोप त्या वेळी काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. गावाकडून आलेला आणि शहरात स्थायिक झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा आणि शैक्षणिक सोईंचा संपूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे, हे छात्रभारतीचे ध्येय आहे. 

12 डिसेंबर 1983 रोजी यदुनाथ थत्ते, ज्येष्ठ विचारवंत ना.य.डोळे, मु.ब.शहा, कपील पाटील यांच्या पुढाकाराने छात्रभारती विद्यार्थी संघटनेची सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, मौलाना आझाद, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी, तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर आदींच्या विचारांशी छात्रभारती संघटना पाईक होती आणि कायम आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांना घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष केला. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञाननिष्ठा हे या मूल्यांचे संवर्धन करणारे असल्याने विज्ञान युगातील विद्यार्थी या लढ्याकडे प्रामुख्याने आकर्षित होऊ लागले आहेत. त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांसाठी हा लढा सुरू असल्याने त्या विद्यार्थ्यांचा कलदेखील छात्रभारती संघटनेकडे मोठ्या प्रमाणात वाढू लागला. 

'युवा चळवळीतला चेहरा' या सदरातील माहिती सांगताना - सुरज पाटील

या संघटनेचे नाव छात्रभारती असे रघुनाथ थत्ते यांनी सूचित केले. डॉ. मु. ब. शहा हे छात्रभारतीचे पहिले अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर छात्रभारतीसाठी जो ढाचा उभा केला, तो आत्ताचे अध्यक्ष असलेल्या प्रा. रवींद्र मेढे यांच्यापर्यंत कायम आहे. सत्ता, मग कुणाची असो, त्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न पायदळी तुडवणाऱ्या प्रत्येकालाच त्याची जागा दाखवण्याचं काम छात्रभारतीने केले आहे. उच्च शिक्षणातील फी वाढीपासून ते ईबीसी सवलतीच्या मागणीसाठी छात्रभारतीने केलेले आंदोलन आजही, सगळ्या महाराष्ट्राला परिचयाचे आहे. शिक्षणाचे खासगीकरण, शिक्षणाच्या घराणेशाहीतली मक्तेशाही, संस्थाचालकाचा दुटप्पीपणा हे सारखं मोडून काढायचं काम छात्रभारतीने केले आहे. जीवघेणी, लोकांना त्रास होतील आणि शासकीय नुकसान होईल, असं आंदोलन छात्रभारतीने कधीच केले नाही. त्यामुळे या संघटनेकडे क्रियाशील मार्गाने चालणारी संघटना, असं म्हणून पाहिलं जायचं. या विद्यार्थी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक जोडले गेले. त्याचे कारण आपल्या मागणीवर निष्ठा आणि सर्वसामान्यांचं हित लक्षात घेऊनच हे विद्यार्थी मैदानात उतरायचे. सुरुवातीला आर्थिक अडचणींची चणचण भासत असलेल्या या संघटनेने आपल्या गरजा या सर्वसामान्य स्वरूपाच्या ठेवल्या. त्यामुळे ही संघटनाही सर्वसामान्यांसाठी आहे, हा संदेश युवकांमध्ये गेला...

1983 ते 2019 या 36 वर्षांच्या कालावधीत एकही चुकीचा आरोप या संघटनेवर करायची कोणी हिंमत केली नाही. कुठलाही झेंडा, कुठलाही पक्ष याचा कधीही विचार न करता केवळ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सतत क्रियाशील राहणं, हा एकमेव पुरस्कार या विज्ञानवादी छात्र संघटनेला जातो. गावकुसातील मोठ्या प्रमाणात असलेली बहुजन विद्यार्थ्यांची फळी, छात्रभारतीशी जोडली गेली. जिचं जाळं आज प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक कॉलेजात पसरलेलं आहे. 

छात्रभारतीबद्दल बोलताना, विलास किरोते (माजी अध्यक्ष, छात्रभारती) 
लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी मुक्तता, राष्ट्रवाद हे विचार समजून घेणे, या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणे; तसेच या तत्त्वांवर तरुणाईला उभे करणे हे छात्रभारतीचे मुख्य उद्दिष्ट अजूनपर्यंत राहिले आहे. छात्रभारती ही जर विद्यार्थ्यांची संघटना असेल, तर त्या संघटनेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी काम करणारं महत्त्वाचं होतं आणि तेच संघटना करत आली. अकरावीपासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्यार्थी या संघटनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि नंतर त्यांच्या प्रश्नांवर काम छात्रभारती संघटना करत होती आणि करत आहे. शिक्षण व्यवस्थेतून गळती होते, ती म्हणजे गरीब भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची. त्यामुळे मुख्यत: छात्रभारती संघटना ही गरीब, ग्रामीण, कष्टकरी विद्यार्थ्यांची संघटना म्हणून पुढे येते. ज्याकडे खाण्या-पिण्यासाठी काहीच नाही. शिक्षण घेण्यासाठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही. अशा विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्यासाठी लढा उभा करणे, हेच काम छात्रभारती संघटनेचं आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेमध्ये आला पाहिजे, आला असेल तर टिकला पाहिजे आणि टिकत असेल तर त्याला गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळाले पाहिजे. एक सकस आणि चांगलं शिक्षण मिळवून विद्यार्थी तयार होण्याची ही प्रक्रिया आहे. छात्रभारती संघटनेचे युनिट हे त्या महाविद्यालयाचे हॉस्टेल असायचे. छात्रभारती संघटना ही फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरच नाही, तर शिक्षकांच्याही हजार प्रश्नांवर आवाज उठवण्याचं कामही केलं आहे. शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळत नसेल, तर तो प्रश्नही गंभीर स्वरूपाने घेऊन त्यावर संघटनेने आवाज उठवला आहे आणि असे प्रश्न संघटितरित्या एकत्र येऊन मार्गी लावलेले आहेत. 

आताही छात्रभारती संघटनेचं नाव काढलं की, सगळ्यात आधी एक आंदोलन प्रखरतेने समोर येते, ते म्हणजे, रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी रात्री 12 वाजता मंत्रालयाची दारं उघडण्याचं सामर्थ्य दाखवलं होतं. कारण रात्रशाळेत शिकणारा विद्यार्थी हा एक मजूर आहे. तो विद्यार्थी दिवसा काम करतो आणि रात्री शिकतो. त्यामुळे दिवसाच्या शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली, त्यामुळे रात्रशाळांवर टाच आणण्यात येत होती. जी मुलं आज शिक्षणाच्या व्यवस्थेत येऊ पाहत आहेत, ज्यांना लहानपणी शिक्षण व्यवस्थेत येण्यास मज्जाव केला जात होता, त्यांना पुन्हा शिक्षण व्यवस्थेत यावंसं वाटत असेल, तर तो त्या विद्यार्थ्यांचा गुन्हा नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हापासून आतापर्यंत रात्रशाळेच्या हक्कासाठी लढण्याचं काम छात्रभारतीनं केलं. दोन वर्षांपूर्वी सरकारनं या रात्रशाळांना घेऊन उच्चाद मांडला होता, तो म्हणजे रात्रशाळेतील शिक्षकांचे पगार न देणं, इमारतींचे भाडे न देणं अशा अनेक गोष्टींतून रात्रशाळांवर बंदी घालण्याचं काम सरकार करत होते; पण त्यावर आवाज उठवून सातत्याने मोर्चे काढून अभिनव आंदोलन छात्रभारतीने केलं आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचा आवाज कोण असेल, त्यांचा मित्र कोण असेल तर तो छात्रभारती आहे, हे प्रखरतेने जाणून घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत छात्रभारतीची एसपीएससी आणि यूपीएससीने त्याचप्रमाणे एमएसडब्ल्यूने नोंद घेतली आहे. 

छात्रभारतीबद्दल बोलताना, सुभाष वारे (राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ नेते) 
स्वत:ला ग्रामीण कष्टकरी विद्यार्थ्यांची संघटना म्हणून घेणारी संघटना म्हणजे छात्रभारती संघटना होय. सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील युवकांचं शिक्षण हे अडचणीत आलेलं असताना छात्रभारतीने त्याविरुद्ध आवाज उठवला. प्राथमिक शिक्षणाची अवस्था वाईट आहे. ती सुधारण्यासाठी, शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, चौथीच्या विद्यार्थ्यांना साक्षर बनवावं, सरकारने गुणवत्ता वाढवून नैतिकतेने प्राथमिक शिक्षणावर जोर द्यावा, या अखत्यारित छात्रभारती संघटनेने काम करायलाही त्या काळी सुरू केलं होतं. श्रीमंत आणि गरीब अशा सर्व मुलांनी सरकारी शाळेत शिकावं, "छात्रभारती की खास बात, लढाई पढाई साथ साथ' याचा नारा छात्रभारतीने देण्यास सुरुवात केला होता आणि तोच नारा छात्रभारतीने अजूनपर्यंत टिकवून ठेवला आहे. देशात युवकांच्या संघटना कमी नाहीत; पण त्या संघटना युवकांच्या प्रश्नांसाठी आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी सज्ज असतीलच अशा नाहीत; मात्र छात्रभारतीने गेल्या 36 वर्षांच्या कालावधीमध्ये केलेल्या कामांचा पुरावा हेच त्या संघटनेचे यश आहे. 1986 आणि 1987 या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सामना करावा लागला, तो म्हणजे दुष्काळाशी. त्यामुळे दुष्काळ भागात राहणाऱ्या मुलांच्या परीक्षा फीमध्ये सवलत मिळावी, त्याचबरोबर त्यांच्या महाविद्यालयातील प्रवेश फी माफ व्हाव्यात, परीक्षेच्या काळात कमी केंद्रे असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी जावं लागतं, म्हणून परीक्षेच्या केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची वसतिगृहाची व्यवस्था करावी, जेणेकरून परीक्षा काळात विद्यार्थी त्याच ठिकाणी राहतील आणि परीक्षा देतील, हा विषय छात्रभारतीने उचलून धरला. 

ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सामना करावा लागतो, तो म्हणजे प्रवासाचा. म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी करण्यात आलेल्या एसटीची सोय, ही त्या कॉलेजच्या वेळेत असावी, असं प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांचं मत असतं. काही वेळा विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या व एसटीच्या वेळेत काहीच तारतम्य नसतं आणि विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे छात्रभारतीने या विषयात प्रमुख भूमिका बजावत शाळा, महाविद्यालय, तसेच इतर महाविद्यालयांच्या वेळेनुसार एसटी सेवा मिळवून देण्याचं काम छात्रभारतीने केलं आहे. 

छात्रभारतीबद्दल बोलताना, रशिद मनियार (राज्यसचिव छात्रभारती) 
गेल्या 12 वर्षांपासून छात्रभारतीमध्ये कार्यरत असणारे अकोल्याचे रशिद मनियार आज राज्याचे सचिव आहेत. अकोल्यामध्ये छात्रभारतीचे काम करत त्यांनी छात्रभारतीत प्रवेश केला. आज ते पुणे येथे पोकळे माध्यमिक विद्यालय, धायरी या ठिकाणी शिक्षक आहेत. रशिद सांगत होते की, ही चळवळ माझ्यासाठी आधारवड बनलेली आहे. या चळवळीने मला माणूस म्हणून उभे राहण्यासाठी मदत केली आहे. आत्ता सध्या राज्यात युवकांचं संघटन बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये छात्रभारतीचा विचार पोहोचला पाहिजे, शिक्षणाचे बाजारीकरण रोखले पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक, नोकरभरती, शिक्षणाचे खासगीकरण, बंद असलेल्या शाळांना संजीवनी, अशा अनेक प्रश्नांवर आम्ही काम करतोय. ज्या-ज्या ठिकाणी युवकांना मदतीची गरज असते, तिथे कपिल पाटलांसारखे अनेक आमदार मदत करण्यासाठी धावून येतात. 

छात्रभारतीबद्दल बोलताना, प्रा. रविंद्र मेढे (अध्यक्ष छात्रभारती संघटना)
महाराष्ट्रभरात सगळ्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून विज्ञानयुगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना सुरू करून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढा उभा केला आणि तोच लढा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा वसा आणि वारसा तसाच पुढे चालू ठेवण्याचे काम आज आपण करत आहोत.

सध्या कुठल्या विषयावर छात्रभारतीचे काम सुरू आहे... 
गेल्या 36 वर्षांपासून आपल्या सामाजिक विषयावर लढण्याच्या शैलीवर ठाम असलेल्या छात्रभारतीने शिक्षणाचे खासगीकरण आणि बाजारीकरण हा महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे. गेल्या वर्षभरामध्ये मोफत शिक्षण, शिक्षणाच्या धोरणाची व्यवस्थित अंमलबजावणी, एकूण उत्पादनामध्ये 10 टक्के शिक्षणावर खर्च, विनाअनुदानित हा शब्द वगळावा, शिक्षणामध्ये सांप्रदायिकता आणू नये, शाळाबाह्य मुलांसाठी सातत्याने काम व्हावं, बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावं, विद्यार्थ्यांना गरज असलेल्या सगळ्या योजना सरकारने अमलात आणाव्यात, 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात पदनिर्मिती करण्यात यावी, एमपीएससीच्या सर्व जागा त्वरित भराव्यात, महापरीक्षा पोर्टलवर बंद करून सर्व परीक्षा MPSC र्त घेण्यात याव्यात, संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणेच PSI / STI / ASST नुसार परीक्षा घेण्यात याव्यात, भरती प्रक्रिया MPSC र्तच घेण्यात याव्यात, महाराष्ट्रातील आर्थिक धोरणांमधून रोजगार कसे निर्माण होतील त्याचा विचार करावा, सरकारच्या विभागात असलेली नोकरभरतीची बंदी तत्काळ उठवावी, सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी लागणारा प्रवास पास मोफत देण्यात यावा, शाळा-महाविद्यालयांतील मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे, सर्व अभ्यासक्रमात शिष्यवृत्ती मिळावी, तेही वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावी, ओ.बी.सी. विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्त्या त्वरित मिळाव्यात, राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी, डी.बी.टी. धोरण तत्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे वसतिगृहातच विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी, सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण त्वरित बंद करावे, शिक्षक भरतीस त्वरित मंजुरी द्यावी, माध्यमिक शाळातील शिक्षकांना 12 व 24 वर्षांनंतर पहिला व दुसरा लाभ तत्काळ मंजूर व्हावा; तसेच महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 1 तारखेस वेतन मिळावे, कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करत असलेल्या शाळांना विरोध, 2012 पासून बंद असलेल्या शिक्षक-प्राध्यापकांची भरती सुरू करणे, शालेय पोषण आहार योजनेची तरतूद करणे, अशैक्षणिक कामांचा बडगा शिक्षकांवरून हटवावा आणि लोकसहभागाची सक्ती करणे, अशा अनेक मागण्या घेऊन त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी छात्रभारती रोज एक चळवळीचे पाऊल टाकताना दिसत असते. छात्रभारतीचं प्रत्येक पाऊल विद्यार्थ्यांच्या हिताला धरून असतं.

महाराष्ट्रातल्या विद्यार्थी संघटनेचा एकूण इतिहास बघितला, तर ती संघटना नेहमी कुठल्या तरी पक्षाला मोठं करण्याची भूमिका सातत्यानं घेत असते, असं आपल्याला पाहायला मिळते; पण छात्रभारती ही एकमेव विद्यार्थी संघटना आहे, जिच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा असूनही तिने कधीही पक्षीय कामात स्वत:ला गुरफटून घेतलं नाही. छात्रभारतीची जी क्रेझ 1983 ला होती, ती आज 2019लाही कायम आहे. पथनाट्य, गाणं, लिखाण आणि अहिंसक मार्गानं आंदोलन ही छात्रभारतीची खरी शस्त्रे होती. ज्याचा पगडा आजच्या सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो. ज्या संघटनेने केवळ आपल्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त युवकांसाठीचं काम केलंय, अशी संघटना म्हणून छात्रभारती विद्यार्थी संघटनेवर शिक्कामोर्तब करता येईल. छात्रभारतीच्या कार्याला आमचा सलाम.

Photos

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News