महर्षी पातंजली योगाचे दुसरे अंग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

अंतरंगात आणत संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे असे योगशास्त्र आहे. खालील पाच नियम आपली योगाची तयारी पक्की करायला मदत करतील.

महर्षी पातंजली योगाचे दुसरे अंग म्हणजे ‘नियम’. आपल्या वैयक्तिक पातळीवर पाळण्याचे हे पाच नियम आहेत. बाहेरून हळूहळू आपली जाणीव(Awareness) अंतरंगात आणत संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे असे योगशास्त्र आहे. खालील पाच नियम आपली योगाची तयारी पक्की करायला मदत करतील.

शौच
शरीर आतून-बाहेरून स्वच्छ, तसेच मनही पवित्र ठेवणे म्हणजे शौच. आपल्या शरीरातून कान, नाक, डोळे, तोंड आणि घामाद्वारे घाण बाहेर पडत असते. यासाठी रोज अंघोळ करणे आवश्यक आहे. रोज पोट साफ राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मनाची शुद्धी आणि पावित्र्यासाठी मनातील मल काढणेही आवश्यक आहे- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, वाईट संगत, खुपणारी भाषा, अहंकार, विस्कळित विचार, आळस, जडत्व, अवेळी झोप वगैरे! मन स्वच्छ ठेवणे म्हणजे ते सात्त्विक, निर्मळ, प्रसन्न, एकाग्र ठेवण्याची दक्षता बाळगणे. आपण रोज शरीर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे मनही साफ ठेवायला हवे. शौच पाळण्यासाठी सात्त्विक व माफक आहार घ्यावा. तो शरीर-मनाला बांधणारा महत्त्वाचा धागा आहे.

संतोष
आपण आहोत त्या परिस्थितीत समाधानी राहणे म्हणजे संतोष. याचा अर्थ आपली परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक यशाची धोरणे आखायची नाहीत, असे नाही. पण असमाधानाने फक्त दुःखच हाती येते. आपल्या जवळ असलेल्या स्रोताचा करता येईल तितका उपयोग करून येणाऱ्या निकालाबद्दल समाधानी असणे महत्त्वाचे. हवा तसा निकाल न आल्यावर दु:खी होण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून पुन्हा प्रयत्न करावेत. यश मिळते. आपला आनंद कुठल्याही बाहेरच्या गोष्टींवर, माणसांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नाही. आनंदाच्या संकल्पनेच्या मागे धावण्यापेक्षा अखंड आंतरिक आनंदात राहिलो, की तो बाहेर व सर्वत्र दिसू लागतो. महर्षी पातंजली याला ‘उत्तम सुख’ म्हणतात.

तप
आपले चित्त शुद्ध राहण्यासाठी शरीर, वाणी आणि मन यांच्यावर ठेवलेले नियंत्रण म्हणजे तप. सर्वांशी सहृदपणे आणि आदरयुक्त वागणे, यमांचे पालन करणे, अनुष्ठान करणे आणि एकंदरीत सर्व शारीरिक व्यापारांवर नियमन ठेवणे म्हणजे कायिक तप. आपल्या बोलण्याने कोणाला न दुखावणे, सत्य व प्रिय बोलणे, सौम्य शब्दांचा वापर करणे, शक्य तितके मौन पाळणे, नामस्मरण इत्यादी म्हणजे वाचिक तप. कोणाचेही वाईट न चिंतणे, मन प्रसन्न व शांत ठेवणे म्हणजे मानसिक तप. तपाने शरीर व इंद्रिये यांची अशुद्धी नाहीशी होते आणि मन:संयमन साधले जाते.

स्वाध्याय
बुद्धीला कुशाग्र व सूक्ष्म बनविण्यासाठी योग्यता उत्पन्न करून देणारे ग्रंथ व वाङ्मय यांचे अध्ययन म्हणजे स्वाध्याय. कुठल्याही अवांतर पुस्तकाचे वाचन म्हणजे स्वाध्याय नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट स्वतःच अनुभवून शिकता येत नाही, तर स्वाध्याय केल्याने आपल्या ज्ञानाची खोली आणि उंची दोन्ही लवकर विकसित करता येते. ''Excellence is not an accident''.

ईश्‍वरप्रणिधान
शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीद्वारा केलेली कर्मे ईश्‍वरार्पण बुद्धीने करणे म्हणजे ईश्‍वरप्रणिधान. मागील लेखात आपण पाहिले की, कर्म व कर्मफळ ईश्‍वराला अर्पण केल्यावर मन प्रसन्न राहू लागते आणि सहृदयतेमुळे राग-द्वेष कमी होऊ लागतात. आपण आपल्या फाजील मनाचे सेवक न राहता मन आपल्या ताब्यात ठेवून संयम वाढवू शकतो. तप, स्वाध्याय आणि ईश्‍वरप्रणिधान यांना पातंजली ‘क्रियायोग’ म्हणतात. या क्रिया योगाच्या पालनाने योगशास्त्रात सांगितलेले पाच क्लेश म्हणजे अज्ञान, अहंकार, लोभ, द्वेष आणि देहबुद्धी कमी होतात. कधी अशा भावना उत्पन्न झाल्या तरी त्यांचे कृतीत रूपांतर होत नाही आणि मग हळूहळू या भावनाही क्षीण होत जातात. पाच यम वागण्यात पावित्र्य आणतात आणि पाच नियम व्यक्तिमत्त्वाला बळकटपणा! बुद्धीला कुशाग्र व सूक्ष्म बनविण्यासाठी योग्यता उत्पन्न करून देणारे ग्रंथ व वाङ्मय यांचे अध्ययन म्हणजे स्वाध्याय. कुठल्याही अवांतर पुस्तकाचे वाचन म्हणजे स्वाध्याय नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट स्वतःच अनुभवून शिकता येत नाही, तर स्वाध्याय केल्याने आपल्या ज्ञानाची खोली आणि उंची दोन्ही लवकर विकसित करता येते. ''Excellence is not an accident''.

ईश्‍वरप्रणिधान
शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीद्वारा केलेली कर्मे ईश्‍वरार्पण बुद्धीने करणे म्हणजे ईश्‍वरप्रणिधान. मागील लेखात आपण पाहिले की, कर्म व कर्मफळ ईश्‍वराला अर्पण केल्यावर मन प्रसन्न राहू लागते आणि सहृदयतेमुळे राग-द्वेष कमी होऊ लागतात. आपण आपल्या फाजील मनाचे सेवक न राहता मन आपल्या ताब्यात ठेवून संयम वाढवू शकतो. तप, स्वाध्याय आणि ईश्‍वरप्रणिधान यांना पातंजली ‘क्रियायोग’ म्हणतात. या क्रिया योगाच्या पालनाने योगशास्त्रात सांगितलेले पाच क्लेश म्हणजे अज्ञान, अहंकार, लोभ, द्वेष आणि देहबुद्धी कमी होतात. कधी अशा भावना उत्पन्न झाल्या तरी त्यांचे कृतीत रूपांतर होत नाही आणि मग हळूहळू या भावनाही क्षीण होत जातात. पाच यम वागण्यात पावित्र्य आणतात आणि पाच नियम व्यक्तिमत्त्वाला बळकटपणा!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News