आनखी 8 हजार खाटांचे कोविड सेंटर अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 31 May 2020
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे याची माहिती 

 मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे आठ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार आहेत. गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहिसर, भायखळा येथे कोव्हिड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत गोरेगाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोव्हिड सेंटर कार्यान्वित होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे 53 मोठ्या रुग्णालयांतील सुमारे 12 हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे. खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा उपलब्ध झाल्या असल्या, तरी त्यांच्यासाठी दर आकारले जात असल्याने गरीब, गरजू रुग्णांचा कल हा सरकारी रुग्णालये आणि केंद्रांकडेच असल्याचे दिसते.

कोरोना रुग्णालयांतील गंभीर आणि दीर्घकालीन आजारी रुग्णांसाठी सहा हजार 99 खाटा तयार होत्या, त्यातील फक्त 244 खाटा शिल्लक असून 96 टक्के खाटांवर रुग्ण आहेत; तर आयसीयूतील 645 उपलब्ध खाटांपैकी फक्त सात खाटा म्हणजे एक टक्के खाटा आता शिल्लक आहेत. 268 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यातच पावसाळा तोंडावर असल्याने अधिक खाटांची गरज भासणार आहे.

खाटांचे नियोजन

मुंबईत भविष्यातील खाटांची निकड लक्षात घेऊन वाढीव खाटा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गोरेगाव येथे 2600 खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर 300 खाटांची उभारणी करण्यात आली. येत्या दोन दिवसांत हे सेंटर कार्यान्वित होईल. त्यापाठोपाठ मुलुंड येथे दोन हजार खाटा, दहिसर येथे दोन हजार आणि भायखळा येथेही दोन हजार खाटांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. त्यात आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजनची सुविधादेखील उपलब्ध करण्यात येत असून आठवडाभरात ते कार्यान्वित होणार असल्याचे सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News