आनखी 4 लाख मजूर गावी जाणार; 260 श्रमिक रेल्वेची आवश्‍यकता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020

मुंबई पोलिसांकडे आतापर्यंत पाच लाख 16 हजार परप्रांतीय नागरिकांनी मूळ गावाकडे जाण्यासाठी अर्ज केले आहेत.

मुंबई : मुंबईत अडकलेल्या दोन लाख 86 हजार परप्रांतीयांना मूळ राज्यांत पाठवण्यात आले असून, पोलिसांकडे अद्याप दोन लाख 29 हजार अर्ज प्रलंबित आहेत. या मोहिमेसाठी नॅशनल मायग्रंट्‌स इन्फॉर्मेशन सिस्टम (एनएमआयएस) या डिजिटल यंत्रणेचा वापर केला जात आहे. 

मुंबई पोलिसांकडे आतापर्यंत पाच लाख 16 हजार परप्रांतीय नागरिकांनी मूळ गावाकडे जाण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी दोन लाख 42 जणांना श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांमधून आणि 43 हजार 348 जणांना बसमधून पाठवण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात आणखी चार लाख परप्रांतीय मजूर गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना गावी पाठवण्यासाठी आणखी 260 श्रमिक रेल्वेगाड्यांची आवश्‍यकता असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

कांदिवली पश्‍चिम परिसरातील 2 हजार मजूर गुरुवारी बोरिवली स्थानकातून दोन रेल्वेगाड्यांमधून रवाना होणार होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे या दोन रेल्वेगाड्या रद्द झाल्या. त्यामुळे या मजुरांसाठी अन्य रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. मुंबईत मोठ्या संख्येने राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना मूळ गावाकडे पाठवण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली होती. पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन राज्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत सहपोलिस आयुक्त विनय चौबे व उपसचिव राहुल कुलकर्णी यांचाही समावेश करण्यात आला असून, त्यांच्या मदतीसाठी 1421 मंत्रालयीन कर्मचारी देण्यात आले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News