प्रतिभावंत साहित्यिक,लढवय्ये कॉम्रेड, मराठी भाषा व श्रमकऱयांचे कैवारी म्हणजे आण्णा भाऊ साठे!

श्रीमंत कोकाटे
Saturday, 1 August 2020
  • साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. ते केवळ कादंबरीकार नव्हते, तर कथाकार, पटकथाकार, शाहीर, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्यप्रकार शब्दबद्ध करणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते.
  • ते फक्त एकच दिवस शाळा शिकले.

साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. ते केवळ कादंबरीकार नव्हते, तर कथाकार, पटकथाकार, शाहीर, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्यप्रकार शब्दबद्ध करणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. ते फक्त एकच दिवस शाळा शिकले. पण विश्वविख्यात साहित्याची त्यांनी निर्मिती केली. त्यांनी दाखवून दिले की, गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट आले. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे जगातील अनेक महत्त्वाच्या भाषांमध्ये अनुवाद झाले. हेच खरे मराठी भाषेचे वैभव आहे.

आधुनिक काळातील जनमानसाची मराठी भाषा साहित्यात आणणारे ते एक महान साहित्यिक आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी लिहीलेला स्तालिनग्राडचा पोवाडा  रशियात प्रचंड गाजला. अण्णाभाऊ साठे यांची तुलना रशियन कादंबरीकार दोस्काहोस्की यांच्याशी केली जाते. तर जागतिक किर्तीचे प्राचविद्यापंडीत शरद पाटील म्हणतात "अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीची तुलना रशियन कादंबरीशीच होऊ शकते". पँरिस या ठिकाणच्या साहित्य संमेलनासाठी अण्णा भाऊ निमंत्रित होते. त्यांच्या हयातीतच ते विश्वविख्यात होते.

आण्णा भाऊ साठेंचे साहित्य गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी वर्गाच्या हक्क अधिकारांची जाणीव निर्माण करणारे आहे. ते म्हणतात, "पृथ्वी ही शेषाच्या फण्यावर तरलेली नसून ती श्रमकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे," यातून त्यांनी श्रमकऱ्यांचा कैवार घेतला. गिरणी कामगार, झाडूवाले, फेरीवाले यांचे दु:ख त्यांनी शब्दबद्ध केले. त्यांच्या साहित्यातील नायक नायिका सत्वशील, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणारे आहेत. 'माझी मैना गावावर राहिली'  या गाजलेल्या फक्कड मधून त्यांनी  मुंबईतील गरीब, कष्टकरी,  श्रमकऱ्यांचे ह्रदयद्रावक स्पष्टीकरण केले. अण्णा भाऊंचे साहित्य हे क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न आहे. ते मानवतावादी आहे.

आण्णा भाऊ साठे जसे साहित्यिक होते, तसेच ते रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे होते. ते कम्युनिस्ट होते, पण येथील वर्गीय लढ्याबरोबर सांस्कृतिक संघर्ष समजलेले प्रगल्भ लोकनेते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर यांच्या खांद्याला खांदा लावून जनजागृती केली. लाल बावटा कलापथकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती मध्ये आण्णा भाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा आहे.

आण्णा भाऊ साठे लढणारे होते, रडणारे नव्हते. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, परंतू संकटात ते  खचले नाहीत. नाऊमेद झाले नाहीत. ज्या आण्णा भाऊ साठे यांना वयाच्या दहाव्या वर्षी वाटेगावपासून मुंबईला जाण्यासाठी तिकीटाला पैसे नसल्यामुळे पायी चालत जावे लागले, त्याच आण्णा भाऊ साठे यांना रशियन सरकारने विमानाने निमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. हा विद्वत्तेचा, प्रतिभेचा, कष्टाचा, प्रामाणिकपणाचा सन्मान होता. त्यांनी 'रशियाचा प्रवास' नावाने प्रवासवर्णन लिहीले. संपूर्ण रशियात दोनच व्यक्ती लोकप्रिय होत्या, एक आण्णा भाऊ आणि दुसरे राज कपूर!

आण्णा भाऊ साठे यांनी पंजाब, दिल्ली, बंगाल येथील प्रश्नांना वाचा फोडली. आण्णाभाऊचे कार्य केवळ एका जाती, धर्म, पंथ,  प्रांत,  देश यापुरते मर्यादित नव्हते. तर ते वैश्विक स्वरूपाचे होते. त्यांनी समतावादी शिवाजी महाराज फकीरा कादंबरीत मांडले. रशियात जाऊन शिवरायांचा जयजयकार केला.

आण्णा भाऊ साठे यांनी तमाशाला लोकनाट्याचे स्वरूप दिले. त्यांनी तमाशा आणि गणाला नवा आयाम दिला. लोककलांना समाज परिवर्तनाचे हत्यार बनवले. म्हणूच म्हटले जाते, "आण्णाभाऊ साठे, लेखक मोठे" आण्णाभाऊ साठे यांचे मुळ नाव तुकाराम भाऊ साठे आहे. एक देहूचे संत तुकाराम महाराज आणि दुसरे वाटेगावचे तुकाराम साठे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. त्यांनी विषमता, अंधश्रद्धा याविरुद्ध लढा उभारला.  आण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण समाजासाठी आजन्म निरपेक्ष कार्य केले.

आण्णा भाऊ साठे यांनी जनमाणसांच्या मराठीचा कैवार घेतला. श्रमकरी कष्टकरी, शेतकरी यांच्या मराठीला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांनी अनेक प्रकारचे साहित्य लिहिले. त्यांनी मराठीला जगविख्यात केले. त्यामुळे मराठी भाषा दिन आण्णा भाऊ साठे यांच्या नावाने १ ऑगस्टलाच झाला पाहिजे.  त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News