संकल्पच्या मनात रूजला ‘अंकुर’

डॉ. सुरेश सावंत
Thursday, 9 July 2020

संकल्प जीवनराव शिंदे-वसूरकर हा नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील दहावीचा विद्यार्थी. संकल्प आठवीत शिकत असताना म्हणजे २०१८ साली "अंकुर' हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. संग्रहाला जोडलेल्या अर्धपान मनोगतात संकल्प लिहितो, की शब्दांशी खेळण्याचा आनंद वाटत गेला. त्यातूनच कविता लिहिण्याचा छंद लागला.

संकल्प जीवनराव शिंदे-वसूरकर हा नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील दहावीचा विद्यार्थी. संकल्प आठवीत शिकत असताना म्हणजे २०१८ साली "अंकुर' हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. संग्रहाला जोडलेल्या अर्धपान मनोगतात संकल्प लिहितो, की शब्दांशी खेळण्याचा आनंद वाटत गेला. त्यातूनच कविता लिहिण्याचा छंद लागला. आई-वडील आणि इसाप प्रकाशनाचे प्रकाशक दत्ता डांगे यांच्यामुळे संकल्पचा कवितानिर्मितीचा आणि पुस्तक प्रकाशनाचा संकल्प सिद्धीस गेला आहे. एक वर्षभरापूर्वी कुठून तरी माझा मोबाईल नंबर मिळवून संकल्पने मला थेट प्रश्न विचारला होता, ''माझा 'अंकुर' कवितासंग्रह वाचला का ? वाचा आणि मला मार्गदर्शन करा.''

 

त्यावेळी मी त्याला 'नाही' असेच प्रांजळ उत्तर दिले होते. फोनवरील आमचा संवाद संपल्यावर मी संकल्पच्या आत्मविश्वासाला आणि धीटपणाला दाद दिली. खेड्यातला एक 14-15 वर्षांचा मुलगा विचारतो आहे, म्हणून माझेही कुतूहल चाळवले गेले. मी संकल्पचा 'अंकुर' हा कवितासंग्रह प्रकाशकांकडून विकत घेऊन वाचला. केवळ वाचला असे नाही, तर अक्षरश: अभ्यासला. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात बालकुमारांची अनेक पुस्तके अभ्यासल्यानंतर आता मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की, आजच्या बालकुमारांचे मन कल्पनारम्य विश्वात मुळीच रमत नाही. ही मुली-मुले आता थेट समकालीन सामाजिक आणि पर्यावरणविषयक प्रश्नांना भिडत आहेत. भोवतालच्या समस्यांवर भाष्य करणे त्यांना गरजेचे वाटते आहे. संकल्पची 'अंकुर'मधील कविताही अशीच प्रश्नांशी भांडणारी कविता आहे. अर्थहीन आभासाची अंडी उबविण्यापेक्षा समस्यांचा समचार घेण्यात ह्या कवितेला अधिक रूची आहे.

 

40 पृष्ठांच्या 'अंकुर' कवितासंग्रहात संकल्पच्या 30 कविता आहेत. ह्या कवितेला 'बालकविता' संबोधणे धाडसाचेच होईल.

 

'अंकुर'मधील निसर्गकविताही निसर्गाचे खडतर रूप वाचकांसमोर उभे करते.

'प्रतीक्षा पावसाची' ह्या कवितेत संकल्प लिहितो-

'ओसाड जमीन म्हणाली

मेघराजा द्या थोडं पाणी

कोकीळा प्रतीक्षा करायची

मी कधी गाईन गाणी'

 

पावसाअभावी चिमणी-पाखरं, चातक पक्षी आणि माणसांचीही केविलवाणी अवस्था झाली आहे. ती अवस्था संकल्पला अस्वस्थ करते आहे.

 

आतापर्यंतच्या बालकवितेची मजल अंगणात पडणाऱ्या सुखद गारा वेचण्यापर्यंतच गेली होती. ह्या सुखद गारांची जेव्हा गारपीट होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती किती दु:खदायक ठरते, याचा अनुभव संकल्पला आहे. म्हणून तो 'वारा' ह्या कवितेत लिहितो-

'वारा आला रे आला वारा

जिकडे तिकडे पडल्या गारा

गारा पडल्या रानोरान

पिकांचे झाले नुकसान

नाराज शेतकरी परतला घरा

जिकडे तिकडे पडल्या गारा.'

 

गारपिटीने पशुपक्ष्यांचे, गुरावासरांचे किती हाल होतात, शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो, हा संकल्पच्या नेहमीच्या अनुभवाचा विषय आहे. अशावेळी मदतीला कुणीही येत नाही, म्हणून संकल्प म्हणतो -

'आता आपणच आपल्याला तारा.' अशा प्रकारे संकलपने वारा आणि गारा यांचे विनाशकारी रूप आपल्या कवितेत बांधले आहे. यातून त्याची अनुभवांशी असलेली प्रामाणिकता दिसून येते.

 

कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी आणि परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे ग्रामीण भारतातील एक दुष्टचक्र आहे. 'शेतकऱ्यांची आत्महत्या' ह्या कवितेत संकल्प लिहितो -

'ओसाड शेत आता

पिकले पाहिजे

शेतकऱ्यांची आत्महत्या

थांबली पाहिजे.'

 

'बाप' ह्या कवितेत संकल्प आणखी एक थेट प्रश्न विचारतो-

'राबतो शेतात

माझा बाप

असं कोणते

केलं त्यानं पाप?'

 

कर्जात जन्मणाऱ्या, कर्जात, दारिद्र्यात जगणाऱ्या आणि कर्जातच मरणाऱ्या बापाची स्थिती पाहून विचारलेला वरवर साधा वाटणारा संकल्पचा हा प्रश्न काळीज चिरत जातो.

 

काही लोक प्रश्न विचारतात, की खेळण्याबागडण्याच्या कोवळ्या वयातील इतक्या लहान मुलांच्या बालकवितेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखे गंभीर विषय कसे काय येतात? याला उत्तर इतकेच, की ज्याचं जळतं त्यालाच कळतं!

 

असाच एक गंभीर प्रश्न आहे, खेड्यापाड्यांतील पाणीटंचाईचा. स्वातंत्र्याच्या 73 वर्षांत आम्ही खेड्यांतील मायमाऊल्यांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवून ठेवू शकलो नाही. त्यांच्या घरात पिण्याचे पाणी पोचवू शकलो नाहीत. अनेकांचा अख्खा उन्हाळा पिण्याचे पाणी भरण्यासाठी मैलोन्‌मैल भटकंती करण्यात जातो. 'पाण्याचा प्रश्न' ह्या कवितेत संकल्प लिहितो -

'स्त्रिया पाण्यासाठी

फिरती वणवण

ते पाहून आम्हा वाटे

दु:ख मनोमन.'

 

संकल्पही स्वप्नं पाहतो, पण त्याच्या स्वप्नात परी किंवा राजकुमारी येत नाही. त्याच्या 'स्वप्नातल्या जगात' त्याला गरिबी आणि भ्रष्टाचाराला मूठमाती द्यायची आहे. जातीभेद आणि प्रदूषणाला त्याला रामराम ठोकायचा आहे. शेतकऱ्याच्या घरातील कोठारे धनधान्याने भरावीत असे शीतल स्वप्न तो पाहतो. व्यसनाधीनता आणि अस्वच्छतेला तो गाढून टाकू इच्छितो. 'कल्पनेतलं जग' ह्या कवितेच्या शेवटी तो म्हणतो -

'माझ्या जगात अंधश्रद्धेला

थाराच नाही मिळणार

केवळ माणुसकीच्या नात्यांना

जागा मी देणार!'

 

माणुसकीला मखरात बसविण्याचा संकल्पचा हा शुभसंकल्प पाहून वाचकही मनोमन सुखावतो.

संकल्पच्या कवितेत जीवन आणि जीवनमूल्यांचा विचारही तितक्याच गंभीरपणे आला आहे. 'गर्व' ह्या कवितेत संकल्प सांगतो -

'ज्या माणसाला। नसतो गर्व।

त्यालाच मिळतात। गोष्टी सर्व।'

'हार-जीत' ह्या कवितेत संकल्प लिहितो-

'अरे, हार-जीत

काही नाही

आणि स्पर्धा काही

संपत नाही.'

 

अतिशय कमी शब्दांत ही कविता द्वेष-मत्सरविरहित साधेपणाने जीवन जगण्याचा संदेश देऊन जाते.

'दगडाचा देव' ह्या कवितेत संकल्पने भोंदूगिरीचा बुरखा फाडला आहे.

'दगडाचा देव माणसानेच केला

पण माणूस माणुसकीच विसरून गेला.'

 

देव दगडात नसून तो चालत्या बोलत्या माणसांत आहे, हा संतांचा संदेश ही कविता पुन्हा नव्याने अधोरेखित करते. पुन्हा 'देव' ह्या कवितेत हाच विचार आणखी घोटीव होऊन आला आहे.

'देव कोणत्या धर्माचा नसतो

देव चांगल्या कर्माचा असतो

माणसाने घेतले धर्म वाटून

त्यासोबतच देवही घेतले वाटून

भेदाभेद नको आहे देवाला

देव पाहतो सारखाच सर्वांना.'

 

हल्ली आपण सगळे नुसते उत्सवप्रिय झालो आहोत. मूळ प्रश्न बाजूला ठेवून दिखाऊगिरी करतो आहोत. अशा दांभिकतेवर बोट ठेवत 'स्वच्छता' ह्या कवितेत संकल्प लिहितो-

'गांधीजींचा फोटो लावून

होणार नाही काही

जिकडे तिकडे स्वच्छ ठेवा

पळून जाईल रोगराई'

अशा प्रकारे संकल्पने आजाराच्या मुळावरच घाव घातला आहे.

 

'आई' ह्या कवितेत संकल्पने आईची सहनशील, संस्कारी, कष्टाळू, संवेदनशील, कर्तबगार अशी विविध रूपे रेखाटली आहेत. दसरा आणि रक्षाबंधन ह्या कवितेत आपले सांस्कृतिक संचित मांडले आहे. 'शिवराय' ह्या कवितेत शिवरायांच्या तेजस्वी वारशाची आठवण देऊन मावळ्यांच्या विझत चाललेल्या अस्मितेवर फुंकर घातली आहे. 'निरोप' ह्या कवितेत निरोप समारंभाच्या निमित्ताने मनात दाटून आलेल्या शाळेविषयीच्या उत्कट भावना आहेत.

'इतिहास' ह्या कवितेत संकल्प 'पहिले देशासाठी दिले होते बलिदान। आता तुम्ही फक्त करा रक्तदान' असे कालोचित आवाहन करतो.

 

शिवरायांच्या इतिहासातील हिरकणीच्या जीवनावरील 'हिरकणी' हे कथाकाव्यही मुळातून वाचण्यासारखे आहे.

कविता हा संकल्पचा केवळ छंद नसून ती त्याचा श्वास बनली आहे. कवितेचा नाही अंत ह्या शेवटच्या कवितेत संकल्पची काव्यविषयक भूमिका स्पष्ट झाली आहे. कवितेविषयी तो म्हणतो-

'अंत होतो माणसाचा

अंत होतो झाडाचा

अंत होतो सर्वांचा

पण अंत होत नाही कवितेचा.'

ह्या कवितेच्या शेवटी तो कवितेचे महत्त्व अधोरेखित करताना दिसतो.

 

'कवितेतून होते मनोरंजन

कधी दुखत नाही मन

ती असते ज्ञानाची खाण

त्यामुळेच कविता आहे महान.'

कवितेच्या सहवासातील संकल्पचा हा जीवनप्रवास असाच सफल संपूर्ण व्हावा, ही शुभकामना!

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News