...आणि मी त्याला निवांत भेटलो!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

तीस-चाळीस नव्हे, तर एकशे एकेचाळीस पावसाळे पाहिलेला कार्यमग्न सेवाव्रती. खूप दिवसांपासून मला त्याला निवांत भेटायची इच्छा होती. पण तो कार्यमग्न होता.
संजय रामचंद्र कामत,
कोल्हापूर. मो. ९०४९८४६५८०.
 

तीस-चाळीस नव्हे, तर एकशे एकेचाळीस पावसाळे पाहिलेला कार्यमग्न सेवाव्रती. खूप दिवसांपासून मला त्याला निवांत भेटायची इच्छा होती. पण तो कार्यमग्न होता.

वाहनांचे ताफेच्या ताफे नदीवरून आरपार करण्याचं काम तो करायचा. हे काम तो इ. स. १८७८ सालापासून अगदी कालपरवापर्यन्त अव्याहतपणे करत होता. आता त्याचे काम त्याचाच भाऊ त्याच्या शेजारी उभा राहून करणार आहे. त्यामुळे तो मोकळा आणि निवांत आहे. तसं पाहायला गेलं तर तो म्हणजे काळ्या पथ्थराची स्थापत्यशास्त्रीय रचना की जिला पूल म्हणतात, नदीचा ऐल पार आणि पैल पार जोडणारा पूल. पण या पुलाला त्याचा इंग्रज स्थापत्यकार वाल्टर डकेट यानं असं काही भव्य आणि देखण रूप दिलं आहे की, ते पाहताना एखाद्या राजवाड्याच्या बांधकामाची आठवण व्हावी. या पुलावर दिवाबत्तीसाठी उभारलेले खांब असोत किंवा वाहतुकीला वाव देण्यासाठी पादचाऱ्यांना बाजूला होऊन उभं राहण्यासाठी ठेवलेले सज्जे हे सगळं कसं अत्यंत सौंदर्यपूर्ण आणि देखणं.

होय मी कोल्हापूरच्या शिवाजी पुलाबद्दल बोलतोय. तो केवळ एक पूलच नव्हे, तर कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सुवर्णकाळाचा ठळक साक्षीदारच आहे. कधी कधी पुलावर गेल्यावर या सर्व गोष्टी मनात आल्यावर त्याच्यावर रेंगाळावंसं वाटायचं, पण त्याच्यावरून वाहणारी वाहतूक पाहता ते शक्‍य व्हायचं नाही आणि त्याच्या निवांत भेटीची ओढ मनात तशीच राहायची. वाहतुकीच्या वेगात अनेकांनी त्याचं देखणं रूप न्याहाळलं नसेल, पण अनेकदा मी आंबेवाडीकडच्या बाजूनं पंचगंगेच्या पात्रात उतरून त्याची भव्यता आणि सौंदर्य पाहताना दंग झालोय. पूल म्हणून त्यानं कोल्हापूर पश्‍चिम किनारपट्टीशी जोडलं, देशभरातून येणारे जोतिबाच्या भक्तांचे लोंढे जोतिबाच्या डोंगराकडे मार्गस्थ केले, त्याच्यावरून झालेल्या शेतमालाच्या वाहतुकीची तर गणतीच करता येणार नाही. पंचगंगाकाठच्या दर्जेदार गुळाची गोडी जगभर न्यायला त्यानंच मदत केली, स्वातंत्र्य चळवळीत जुलमी सत्तेला आव्हान देऊन परकियांच्या जुलूम जबरदस्तीला चकवा देणारी मर्द मंडळी याच्या अंगा खांद्यावरूनच रानोमाळ झाली. लोककल्याणकारी राजा म्हणून सर्व जगात वंदनीय ठरलेल्या राजर्षि छ. शाहू महाराजांची ये-जा तर त्याच्यावरून नित्याचीच होती.

महाराजांच्या लोकोत्तर राजवटीचा तो मूर्तिमंत साक्षीदारच आहे असं म्हणावं हवं तर, अशा प्रकारचं त्याचे महत्त्व आणि एका शतकाचं त्याचे योगदान हे लक्षात घेऊनच की काय धो धो पासवात अक्राळ विक्राळ होणारी पंचगंगा त्याच्या कमानी खालून निमूटपणे वाहत राहिली. असा तो ऐतिहासिक शिवाजी पूल शतकभराच्या कार्यमग्नतेनंतर सेवेतून निवृत्त झाला. नवीन पूल सुरू झाला आणि शिवाजी पुलाला कायमची विश्रांती देण्यात आली, नव्हे त्याला विश्रांती देणं अनिवार्य होतं. शिवाजी पुलाची सेवा संपली असेल, पण कोल्हापूरच्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून त्याच्याशी असलेले ऋणानुबंध कधीही संपणार नाहीत असेच आहेत. मोकळ्या शिवाजी पुलावरून फिरताना हा विचार कोणाच्याही मनात येईल यात शंका नाही. मीही त्याच्याबद्दलची कृतज्ञता मनात घोळवत पुलावरून फेरटका मारला आणि मला त्याला निवांत भेटल्याचा आनंद झाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News