...आणि मला खूपच समर्पक उत्तर मिळालं

संदेश थोरवे
Tuesday, 22 September 2020

मग माझ्या लक्षात आलं की, मी पाकिटच आणलं नाही. मग ऑनलाईन पेमेंटसाठी काकांना विचारलं की,"या क्यू आर कोडवर पैसे पाठवतो." काका लगेच बोलले,"संदेश पैसे देऊ नकोस." मग मी काकांना विचारलं,"का ओ काका ?" काकांनी खूपच छान उत्तर दिलं.

...आणि मला खूपच समर्पक उत्तर मिळालं

शनिवारी कॉलेजचे ४ वाजताचे लेक्चर रद्द झाले. पहिल्यांदाच लेक्चरला गॅलरीत निवांत हवेशीर बसलो होतो. लेक्चर रद्द झाल्यामुळे आता काय करावं त्यामुळे तिथेच बसलो. आपलं बसल्या बसल्या सहज व्हाट्स अ‌ॅप पाहत होतो. तेवढ्यात तिथे बाबा आले आणि म्हणाले,"संदेश लेक्चर संपलय का ?" मी उत्तर दिलं,"हो संपलय." मग बाबा बोलले की,"ते आपल्या जुन्या घराचं विजेचे रिडींग पाठवायचं होतं. मला त्यांचा संदेश आलाय. जर तुम्हाला विजेचे रिडींग येत नसेल तर तुम्ही स्वतः ते रिडींग पाठवा." मी बोललो,"माझ्याकडे महावितरणाचे अ‌ॅप आहे. त्यातून आपण पाठवू. मी ते अ‌ॅप उघडलं, पण त्यात रिडींगसोबत त्याचा फोटोही हवा होता."

मग बाबा बोलले,"आपण नाष्टा करून जाऊ." थोड्या वेळात आम्ही नाष्टा केला. सव्वा पाचच्या दरम्यान आम्ही दोघं मास्क घालून जुन्या घरी जायला निघालो. बाबा दुचाकी चालवत होते. मी मागे बसलो होतो. खरंतर मी गाडी चालवायला हवी होती, पण बाबांच्या मागे बसण्याचा एक वेगळाच आनंद असतो.

पुणे-नाशिक महामार्गावरून चाललो होतो. हवेली हॉटेलसमोर नेहरे काकांच्या वडापावची गाडी होती. बाबा म्हणाले,"नेहरे काकांशी बोलायचंय का ?" मी बोललो,"नाही, मी येताना त्यांच्याशी निवांत बोलतो." मग आम्ही अगदी ५-६ मिनिटांत जुन्या घरी पोहोचलो. मी विजेचे रिडींग घेऊन आणि फोटो काढून महावितरण अ‌ॅपमधून पाठवून दिलं. मग आम्ही पुन्हा घरी यायला निघालो. नेहरे काकांकडे बाबांनी दुचाकी थांबवली. मग बाबा मला बोलले,"तुम्ही गप्पा मारा. मला भोसरीत काम आहे, मी जातो." नेहरे काका आणि माझी ओळख एक खूपच विशेष कारणाने झाली होती, ते थोडक्यात सांगतो.

(मी तीन वर्षांपूर्वी नेहरे काकांकडे वडापाव खायला गेलो होतो, वडापाव खूपच चविष्ट होता. तेव्हा आमची ओळख नव्हती. मला त्यांची वडापावची गाडी खूपच वेगळी वाटली, कारण त्यांनी गाडीवर सोलर लावलं होत. याआधी मी असं कुठेच पाहिलं नव्हतं. तेव्हा मला ते जाणून घेण्याची उत्सुकता लागली. तेव्हा नेहरे काकांनी वडापावची गाडी का टाकली याबद्दल सर्व सांगितलं. हे ऐकल्यावर मी थक्कच झालो. मला ही खूपच प्रेरणादायी कथा वाटली. मग मी याची प्रेरणादायी कथा करण्याचं ठरवलं. सकाळच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयाचा २८ नोव्हेंबरला २०१७ रोजी २५ वा वर्धापन दिवस होता, नेमकं त्याच दिवशी फोटोसहित पिंपरी-चिंचवडच्या टुडेमध्ये लेख छापून आला आणि मला वर्धापन दिवसानिमित्त प्रथमच 'सकाळ' समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना भेटण्याची संधी मिळाली. ते म्हणाले,"लेख छान लिहिलायस." हे शब्द खूपच प्रेरणा देऊन गेले. इथूनच नेहरे काका आणि माझी ओळख दृढ झाली.)

मग बाबा निघून गेले. मी नेहरे काका आणि काकुंबरोबर गप्पा मारल्या. मग काका बोलले की,"संदेश वडापाव खा ना." मग मी बोललो,"हो काका खातो." त्यांनी वडापाव दिला. वडापावच्या चवीत थोडासा बदल झाला होता म्हणजे तो मला अजूनच चविष्ट वाटला. वडापाव खालला आणि हात धुवून पाणी प्यायलो. खिशात हात टाकला.

मग माझ्या लक्षात आलं की, मी पाकिटच आणलं नाही. मग ऑनलाईन पेमेंटसाठी काकांना विचारलं की,"या क्यू आर कोडवर पैसे पाठवतो." काका लगेच बोलले,"संदेश पैसे देऊ नकोस." मग मी काकांना विचारलं,"का ओ काका ?" काकांनी खूपच छान उत्तर दिलं.

काका म्हणाले,"संदेश आम्ही तुला वडापाव खायला बोलावल आहे, त्यामुळे त्याचे पैसे देऊ नकोस. पण जेव्हा तू वडापाव खायला येशील तेव्हा त्याचे पैसे दे." मला हे उत्तर खूपच समर्पक वाटलं. यातून मला धडा मिळाला की, जीवनात 'मी'पणापेक्षा 'आम्ही'पणा नेहमी जागृत ठेवा. मग मी त्यांचा निरोप घेऊन तेथून निघून गेलो.

- संदेश संजय थोरवे

मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, वृत्तविद्या विभाग

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News