भटकंती सह्याद्रीतील अनवट घाटवाटांची...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 January 2020

ट्रेकिंगसाठी काही अनवट वाटा निवडल्या तर त्याचा आनंद काही औरच.  अशा भटक्‍यांना सह्याद्रीतील घाटवाटा नेहमीच साद घालणाऱ्या. शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या घाटवाटांविषयी...

दुर्गम गड-किल्ले पाहिल्यानंतर या भटक्‍यांची पाऊले आपसूकच जुन्या व ऐतिहासिक घाटवाटाकडे वळतात. घाटमाथ्यावरून कोकणात ये-जा करण्यासाठी पाऊल वाटांचा वापर व्हायचा. दळणवळणाची साधने मार्यदित होती. सह्याद्रीच्या डोंगररांगाच्या पूर्वेस दख्खनचे पठार व पश्‍चिमेस कोकण यामधील दळणवळणासाठी अशा अनेक घाटवाटा त्या काळात प्रचलित होत्या. त्या नैसर्गिकरीत्या निर्माण झाल्या. पाण्याच्या घळीने, डोंगरधारेने व काही ठिकाणी मानव निर्मित सह्याद्रीच्या कातळात बनवलेल्या पायऱ्यांच्या या वाटा प्रत्येक भटक्‍याला आकर्षित करतात. 

घाटवाटांची भटकंती शारीरिक मानसिक क्षमता पाहणारी असते. तुम्हाला भौगोलिक परिस्थिती-ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत हवी. पूर्वीपासून या घाटवाटांचा व्यापारासाठी उपयोग व्हायचा. अजूनही यातल्या काही घाटवाटा माहीत असतील तर तुमचे डांबरी रस्त्याचे अंतर ४० ते ५० किलोमीटरने कमी होऊ शकते. पूर्वी या वाटांवर लुटमारी, शत्रूकडून अडवणूक व्हायची.  

या घाटवाटावर लक्ष ठेवता यावे यासाठीच मग अनेक गड-किल्ल्यांची निर्मिती झाली. तर काही ठिकाणी केवळ डोंगराच्या सुळक्‍याला बुरुजाचे रूप देऊन त्याकाळी वॉच टॉवर बनवले गेले. जेणेकरून प्रदेशावर लक्ष रहावे. तिथला राजा व्यापाऱ्यांकडून सुरक्षतेसाठी म्हणून जकात वसूल करी. 

सह्याद्रीत अजूनही नाणदांड घाट, अंधारबन घाट, वाघजाई सवाष्ण घाट, वाजंत्री घाट, काजीर्डे घाट, आहुपे घाट, मढेघाट, ढवळे घाट व जगप्रसिद्ध असा जुन्नर जवळील नाणे घाट अशा घाटवाटा वापरात, परिचित आहेत. या वाटांवर वाटसरूना राहण्यासाठी लेणी, कातळात खोदलेल्या थंड पाण्याचे टाके, जकातीसाठी रांजण, कातळात कोरलेल्या पायऱ्या, विश्रांतीसाठी छोट्या गुहा अशा काही खाणाखुणा अजूनही दिसून येतात. नाणेघाटातील एका गुहेत तर ब्राह्मी लिपीतील सातवाहन काळातील राजांची वंशावळ कोरलेली आहे. 

या वाटांवरील ऊन-सावल्यांचा खेळ अनुभवावा असाच. दाट जंगलातील बिकट वाट, जंगली प्राण्यांचे भय, डोंगरधारेवरील निसरड, घाटमाथ्यावरील धारोष्ण वारे, तळ कोकणातील दमट हवा, वाटेतला रानमेवा, पावसाळ्यातील चिंब झालेला सह्याद्रीच्या डोंगरारांगा, तर कधी डोळे फिरवणारी दरी असं सारं काही तुम्हाला या वाटा तुडवल्या तरच अनुभवता येईल. हे क्षण तुम्हाला आयुष्यभरासाठी जगण्यासाटी सदैव ऊर्जा देत राहतात..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News