जम्मू-काश्‍मीरमध्ये अमित शहा करणार हे बदल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • नंदनवनात मतदारसंघांचे फेरबदल
  • अमित शहा यांनी घेतली महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली - सत्तारूढ भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज देशाच्या संरक्षणमंत्री, परराष्ट्र व्यवहारमंत्री, केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत घेतली. कमालीचे अशांत बनलेल्या जम्मू-काश्‍मीरमधील मतदारसंघ फेररचना हा मुद्दा बैठकीत मुख्यत्वे चर्चेस आल्याची माहिती आहे.

शहा यांनी यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याच्या युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. १९९५ नंतर बंद पडलेली ही फेररचना पुन्हा झाली, तर या राज्यातील सामाजिक गणिते लक्षणीयरीत्या बदलू शकतात, हे लक्षात घेऊन सत्तारूढ नेतृत्वाने या हालचाली सुरू केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गृहमंत्री शहा यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यपाल सत्यपाल मलिक यांची दिल्लीतच भेट घेतली. मलिक यांना बदलून तेथे एखाद्या ‘कणखर व्यक्तिमत्त्वा’ची नियुक्ती केंद्र सरकार करेल, अशीही चर्चा आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने प्रस्तावित मतदारसंघ फेररचनेसाठी विधानसभेच्या वा अन्य परवानग्यांची आवश्‍यकता भासणार नाही.

जम्मू-काश्‍मीरमध्ये वर्षअखेरीस निवडणूक
अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीचा आढावा घेऊन विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. १ जुलैला सुरू होणारी अमरनाथ यात्रा १५ ऑगस्टला संपणार आहे.

या यात्रेदरम्यान परिस्थितीचे निरीक्षण करून नंतर राज्यातील निवडणुकीचे वेळापत्रक
जाहीर करू, असे आयोगाने म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News