अंबागड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 June 2020

विदर्भाच्या उत्तरसीमेवर सातपुडाच्या पर्वतरांगा पूर्वपश्चिम अशा पसरलेल्या आहेत. या रांगांच्या दक्षिणेकडील विदर्भातील एक जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील टेकड्या या गायमुखच्या टेकड्या अथवा अंबागडाच्या टेकड्या म्हणून ओळखल्या जातात

विदर्भाच्या उत्तरसीमेवर सातपुडाच्या पर्वतरांगा पूर्वपश्चिम अशा पसरलेल्या आहेत. या रांगांच्या दक्षिणेकडील विदर्भातील एक जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील टेकड्या या गायमुखच्या टेकड्या अथवा अंबागडाच्या टेकड्या म्हणून ओळखल्या जातात.

या टेकडयांमध्ये बलदंड असा अंबागड नावाचा वनदुर्ग आहे. अंबागडाचा वनदुर्ग हा भंडारा जिल्ह्यामधील तुमसर तालुक्यात आहे. अंबागडाच्या पायथ्यापासून गायमुख हे स्थळ जवळ आहे. 

गायमुखचे देवस्थान हे भंडाऱ्यात प्रसिध्द असून अनेक भावीकांचा राबता या परिसरामध्ये असतो. भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून ते मुंबई-कोलकता या राष्ट्रीय महामार्गावर आहे. तसेच भंडारा हे रेल्वेमार्गानेही जोडले गेले आहे. हा मार्ग तुमसरमधून जातो.

तुमसरच्या पुढे गोवरवाहीकडे निघाल्यावर मिटेवानीकडून अंबागडाकडे जाता येते. अंबागडाकडे येण्यासाठी अजून एक मार्ग आहे. नागपूरकडून रामटेक, कांद्री, गायमुख मार्गेही अंबागडाचा पायथा गाठता येतो.

अंबागडाच्या पुर्व पायथ्याला हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराचे नव्यानेच नुतनीकरण करण्यात आले आहे. मंदिराजवळूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. गडावर जाणारा हा मार्ग गडाच्या पुर्वेकडून असून या संपुर्ण मार्गावरील पायऱ्या नव्यानेच बांधून काढलेल्या आहेत. 

या पायर्यांच्या मार्गाने वीस-पंचवीस मिनिटांत आपण गडाच्या महादरवाजाजवळ पोहोचतो. दोन बलदंड बुरूजांमध्ये दरवाजा लपवलेला असून तो उत्तराभिमुख आहे. यातील डावीकडील बुरूज ढासळत चालेला दिसतो. दरवाजातून आत आल्यावर पहारेकर्यांच्या रहाण्याच्या खोल्या दिसतात.

याच्या आतल्या बाजूने दरवाजाच्या वर जाण्याचा मार्ग आहे. वरच्या बाजूला एक मनोरा आहे. येथून किल्ल्याच्या परिसरातील दृष्य दिसते. 

किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे तटबंदीवरून फेरी मारता येत नाही. तटबंदीमध्ये असलेल्या बुरूजावर तोफा ठेवण्याचे उंचवटे आहेत. गडाचा आकार लंबगोलाकृती असून आटोपशीर आहे. मधल्या पठारावर तीन-चार मजली बांधकाम केलेले आहे. ते जागोजाग ढासळलेले आहे. 

या ढासळलेल्या बांधकामामध्ये राजनिवास तसेच अधिकारी यांची निवास व्यवस्था असल्याचे दिसते. किल्ल्याची रूंदी कमी असल्यामुळे उत्तरेकडे असलेल्या तटबंदीवरच बांधकाम केलेल्या दिसतात. या महालाच्या बांधकामामध्ये अनेक ठिकाणी संरक्षणासाठी केलेली व्यवस्था आढळते. 

या बांधकामामध्ये एक तळघरही आहे. त्यात उतरण्यासाठी काही पायऱ्या असून या जागेला अंधार कोठडी असे म्हणतात. येथून पुढे चालत गेल्यावर आपण पश्चिम टोकावर पोहोचतो. गडावर झाडी झाडोर्याचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे अनेक वास्तू ढासळलेल्या दिसतात.

गडाला पुर्ण फेरी मारण्यासाठी आपल्याला तास दीडतासाचा अवधी पुरतो. या फेरीमध्ये घोड्याची पागा, अंबरखाना पाण्याचे टाके, भुलभुलैया सारखे निवासातील रस्ते पहाता येतात. गौंड राजवटीतील अनेक वैशिष्ठे या किल्ल्यामध्ये दिसतात. गौंड राजांनी बांधलेला अंबागड पुढे नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात आला. 

पुढे तो इंग्रजांनी ताब्यात घेतला. संरक्षण सिध्दतेबरोबर या किल्ल्याचा वापर नामांकित कैदी ठेवण्यासाठी झाल्याचे दिसून येते. गडावरील बांधकामाची दुरूस्ती आणि देखभाल योग्यरितीने केल्यास तसेच माहितीचे फलक जागेजाग लावल्यास पर्यटकांना निश्र्चित उपयुत्त्क ठरेल. काही माफक सुविधा उपलब्ध झाल्यास अंबागडाचा गोडवा चिरकाल स्मरणात राहिल यात शंका नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News