आश्चर्यकारक! सन्की प्रियकराने घरात घुसून प्रेयसीवर गोळीबार केला आणि मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020
  • प्रेमप्रकरणातून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एका तरूणाने थेट तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार केला.
  • त्यानंतर त्याने स्वत: वर देखील गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिर्डी :- प्रेमप्रकरणातून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एका तरूणाने थेट तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत: वर देखील गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात सदर तरुणी थोडक्यात बचावली आहे पण तरुणाच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावातील विक्रम मुसमाडे वय वर्ष ३० आहे, या तरूणाचे एका तरूणीवर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. परंतु, नातेवाईकांच्या विरोधामुळे तरुणीने विक्रमला लग्नासाठी नकार दिला होता. त्यामुळे विक्रम गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता.

आपल्या प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात घेऊन विक्रम मुसमाडे याने मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तरुणीचे घर गाठले आणि तिच्यावर गोळीबार केला. सुदैवाने तरुणीच्या आजीने वेळीच तरुणाला धक्का दिला. त्यामुळे पिस्तूलमधून सुटलेली एक गोळी तरुणीच्या डोक्याला चाटून गेली.

त्यानंतर विक्रमने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. यात तो गंभीर जखमी झाला असून लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली तर फॉरेन्सिक लँबचे पथक, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट देत पुढील तपासाची चक्रे फिरवली आहे.

विक्रम मुसमाडेकडे पिस्तूल कसे आले, त्याच्याकडे अधिकृत परवाना होता का? अशी अनेक प्रश्न या घटनेमुळे समोर आले आहेत. पोलीस सर्व बाजू तपासत आहे. विक्रम याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. परंतु, पोलिस संबंधित तरुणीची चौकशी करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आपल्या मुलीने प्रेमविवाह केला तर लोक काय म्हणतील, आता समाजात तोंड काढायला जागा ठेवली नाही, आपली बदनामी होईल, अशा खोट्या प्रतिष्ठेमुळे जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती. वडिलांनी पतीचा निर्घृण हत्या केल्यानंतर मुलीने आत्महत्या केली. विशेष म्हणजे मुलगी पोलिस कॉन्स्टेबल होती. उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथी ही घटना घडली आहे.

पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या मुलीच्या डोळ्यांसमोरच १५  दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी पतीची चाकूने भोसकून हत्या केली होती पतीच्या हत्येनंतर दुःखी झालेल्या तरुणीने देखील आत्महत्या करून आपला जीवनप्रवास संपवला. धक्कादायक म्हणजे महिलेला पाच महिन्यांचा मुलगा आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News