ऑनलाइन पर्यायाची निवड करून देखील नोंद ऑफलाइन परीक्षेची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020
  • अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • त्यानंतर त्या परीक्षा दोन पध्दतीने घेण्याचा निर्णय देखील झाला होता.
  • परीक्षेसाठी दोन पर्याय दिले आहेत ते म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन पर्याय आहेत.

पुणे :-  अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर त्या परीक्षा दोन पध्दतीने घेण्याचा निर्णय देखील झाला होता. परीक्षेसाठी दोन पर्याय दिले आहेत ते म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन पर्याय आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाइनचा पर्याय निवडूनही त्यांच्या नावावर ऑफलाइन (प्रत्यक्ष) पर्याय निवडल्याचे  दाखवले जात आहे. या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षेसाठी जवळचे महाविद्यालय केंद्र निवडण्याची सूचना देण्यात आली असून, ऑनलाइन परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसमोर आता अडचण निर्माण झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  अंतिम वर्षांतील नियमित, विषय राहिलेल्या (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने, बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिके द्वारे होणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन यातून पर्याय निवडण्याची संधी देण्यात आली होती. त्यापैकी ८५ टक्के  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाइनचा पर्याय निवडला. परंतु, काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पर्याय निवडूनही प्रणालीमध्ये त्यांच्या नावापुढे ऑफलाइन पर्याय निवडल्याचे दाखवले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दापोडी येथील वाणिज्य शाखेतील आशुतोष सिंग म्हणाला की, पर्याय निवडताना ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला होता. पण आता लॉगिनमध्ये ऑफलाइन का दाखवले जात आहे हे कळत नाही.

‘ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडून दोन वेळा पडताळणीही केली होती. परीक्षेचे प्रवेशपत्र ही डाऊनलोड केले. पण आता ऑफलाइन पर्याय निवडल्याचे दिसून येत आहे. माझ्यासह आणखी आठ-दहा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार झाला आहे. महाविद्यालयात चौकशी केली तर विद्यापीठाकडे संपर्क  साधा असे सांगितले जाते. विद्यापीठात संपर्क साधला तर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न आहे,’ असे नाशिकच्या प्रवीण गांगुर्डेने सांगितले.

‘विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाइनचा पर्याय निवडूनही आता ऑफलाइन परीक्षेसाठी केंद्र निवडण्यास सांगितले जात आहे. काही विद्यार्थ्यांनी अडचणींमुळे परीक्षेचा पर्याय निवडला नव्हता. त्यांना मुदत वाढवून द्यायला हवी. विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी विद्यापीठाने हेल्पलाइन सुरू करावी,’ असे कमलाकर शेटे म्हणाला.

विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक परीक्षा पर्याय अर्ज भरलेला नाही. विद्यापीठाच्या प्रणालीत चूक नाही. अर्जामध्ये किमान ३जी किंवा त्यापेक्षा जास्त इंटरनेट आणि किमान १ एमबीपीएस वेगाचे इंटरनेट या पर्यायांना विद्यार्थ्यांनी ‘नॉट अ‍ॅप्लिके बल’ आणि ‘नो’ हे निवडले असल्यास त्यांना ऑफलाइन परीक्षेसाठी ग्राह्य धरले आहे. कारण इंटरनेट उपलब्ध असल्याशिवाय ऑनलाइन परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे परीक्षेसाठी ऑनलाइन पर्याय निवडून ऑफलाइन दिसत असलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी २७ सप्टेंबपर्यंतची मुदत देण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी  covid19helpdesk@unipune.ac.in या ई मेलवर संपर्क साधावा.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News