अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद राहणार: सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 April 2020
  • ग्रामीण भागात नियम, अटी-शर्ती पाळून उद्योग सुरू होणे शक्‍य आहे.

मुंबई : सोमवारपासून मर्यादित स्वरूपात उद्योग-व्यापार सुरू करण्याचे सरकारने ठरवले असले तरी मुंबई, ठाणे आदी महापालिका रेड झोनमध्ये असल्याने अत्यावश्‍यक सेवेतील केवळ 10 ते 15 टक्के आस्थापना सुरू असल्याचा अंदाज आहे. मुंबई व शेजारच्या महापालिका रेड झोनमध्ये असल्याने अत्यावश्‍यक सेवांखेरीज अन्य काहीही सुरू होणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात नियम, अटी-शर्ती पाळून उद्योग सुरू होणे शक्‍य आहे. त्यासाठी एमआयडीसीच्या पोर्टलवर प्रस्ताव आले आहेत. हे उद्योग सुरू करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे, कर्मचारी वाहतूक न करता केवळ मालवाहतूक करणे आदी नियम पाळल्यास परवानगी मिळू शकेल. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. उद्योगांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यांच्याकडे कामगारच नाहीत. या अडचणींमधून मार्ग काढण्याबाबत सरकारच्या या उद्योगांशी चर्चा करत आहे, असेही देसाई म्हणाले.

मुंबईत जेमतेम 10 ते 15 टक्के अत्यावश्‍यक आस्थापना सुरू आहेत. मंत्रालय व अन्य सरकारी कार्यालयांतील उपस्थिती वाढल्याने हळूहळू इतर खासगी कार्यालये सुरू होऊ शकतील, असे ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी सांगितले.

टाळेबंदी असल्याने वरळीत काहीही सुरू होणार नाही, मात्र शेजारच्या प्रभादेवीत टाळेबंदी नाही. गोरेगाव-जोगेश्‍वरी येथील आयटी झोन किंवा घाटकोपरचा इंडस्ट्रियल झोन येथे काही आस्थापना सुरू होऊ शकतात. 30 ते 40 टक्के आस्थापना सुरू होण्यासाठी आणखी एक आठवडा लागेल, असे कलंत्री म्हणाले.

मुंबई, ठाणे, पुणे महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये असल्याने व्यापार-उद्योग सुरू होणार नाहीत. कल्याण, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या महापालिकाही रेड झोनमध्ये असल्याने अत्यावश्‍यक सेवांखेरीज अन्य काहीही सुरू होणार नाही.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News