सारे तिरथ बार बार... गंगासागर एक बार...

सौ. शंकुतला विठ्ठलराव कराड
Tuesday, 26 February 2019

दिलीपभाऊ ठाकूर व माय हॉलिडे सोबत चा हा माझा पहिलाच टुर. त्यांंच्या बद्दल खुप काही वाचले होते... ऐकले होते.. पण आम्ही १४ जनीचा महीलांचाच ग्रुप असल्यामुळे मनात थोडी धाकधूक होती की आता कसे होणार.

दिलीपभाऊ ठाकूर व माय हॉलिडे सोबत चा हा माझा पहिलाच टुर. त्यांंच्या बद्दल खुप काही वाचले होते... ऐकले होते.. पण आम्ही १४ जनीचा महीलांचाच ग्रुप असल्यामुळे मनात थोडी धाकधूक होती की आता कसे होणार. टुर ची सुरुवातच काळजीने झाली. आमचा सिंकद्राबाद चा प्रवास नांदेड- हैदराबाद पॅसेंजर ने होणार होता.  रात्री साडे अकराची पॅसेंजर दीड वाजला तरी नांदेड ला आली नव्हती. त्यावेळी  दिलीपभाऊंनी रेल्वे बोर्डाचे सदस्य शांतनु डोईफोडे यांच्यासहअ अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यामुळे नांदेड हुन रेल्वे तातडीने रवाना झाली. दिलीपभाऊ मध्ये नेतृत्वगुण असल्याची जाणीव त्यामुळे आम्हा सर्व प्रवाशांना झाली. आपापल्या बर्थवर चिंतेमध्ये आम्ही झोपून गेलो. सकाळी सात ला जाग आली. रेल्वे हळूहळू धावत असल्यामुळे सर्व यात्रेकरूंच्या चेहर्‍यावर टेन्शन होतेच. दिलीपभाऊंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना ट्विट करून प्रॉब्लेम सांगितला आणि चमत्कार झाल्यासारखे रेल्वेची गती वाढली .पॅसेंजर गाडी जी पूर्वी प्रत्येक स्टेशनला पंधरा ते वीस मिनिटात थांबायची ती आता अर्धा मिनिट सुद्धा थांबत नव्हती.  सकाळी साडेदहा वाजता ची हावडा एक्सप्रेस आपल्याला सापडेल काय या विचारातच  प्रत्येक जण होता. रेल्वे हावडा एक्सप्रेस येण्याच्या पंधरा मिनिटा आधी सिकंदराबाद ला पोहंचली आणि दिलीप भाऊ सोबत सर्व प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. 

आम्ही एकदाचे हावडा एक्सप्रेस मध्ये बसलो. सामान वगैरे ठेवून सीट वर स्थिरावत नाही तोवर गरमा गरम  इडली वडा आणि उपमा चहा घेवून टूर मॅनेजर शैलेश व किरण हे हजर झाले.प्रवासाची सुरुवात तर चांगली झाली. नाश्ता पचे पर्यंत दुपारचे भोजन आले. कोणी तरी म्हटले 'अरे हे तर खरंच वेळेवर जेवण नाश्ता देत आहेत म्हणजे हा ग्रुप चांगला दिसतोय.' जेवणानंतर दिलीपभाऊ आले आणि सर्वांना म्हणाले "चला भोजन झाले आता भजन करूयात ".भजनाला त्यांनी "हे भोळ्या शंकरा "या भजनाने सुरुवात केली. सुरुवातीला आढेवेढे घेणारे प्रत्येकजण  भजने म्हणू लागले.भजनाची मैफिल इतकी रंगली की,वेळ कसा गेला हे समजले देखील नाही.दुपारी चार ला चहा- कॉफी, दुधाची व्यवस्था करण्यात आली. आमच्या या टूरमध्ये एकूण 72 यात्रेकरू होते. व्यवस्थेसाठी दिलीप भाऊ सोबत दोन टूर मॅनेजर व पालघर येथील केटरिंग टीमची सात माणसे होती. संपूर्ण दिवस रेल्वे प्रवासात असून देखील छान गेला. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेपाच ला हावडा स्टेशनला उतरून हॉटेल ईस्टीम ला पोहोचलो. रूम अतिशय सुरेख होत्या. राहण्याची व्यवस्था अतिशय उत्तम होती. रात्री जेवायला हॉलमध्ये जमलो. दिलीपभाऊनी अनाऊमेंट केली की आपल्याला पहाटे चारला गंगासागरला निघायचे आहे त्यामुळे सर्वांनी लवकर झोपावे. गंगासागरला जायचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून आम्ही चार मैत्रिणी गप्पा मारत रात्रभर झोपलोच नाही. सकाळी बरोबर चार ला सर्व प्रवासी तयार होते. चौहान ट्रॅव्हल्सची टू बाय टू लक्झरी बस अतिशय आरामदायी होती. गंगासागर च्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. साडेसहा वाजेपर्यंत आम्ही बसमध्ये झोपा काढल्या. चहा घेतल्यानंतर भाऊंनी बसमध्येच सर्वांचे खेळ घेतले. खेळ खेळता खेळता गंगासागर कधी आले हे समजलेच नाही. तिथे पोहोचल्यानंतर गरमागरम वडापाव व पोहे यावर ताव मारला. इथून पुढे आमचा प्रवास बोटीने सुरू झाला. बोटीमध्ये माशांना पिठाच्या गोळ्या व बगळ्यांना हिरवे वाटाणे खायला देताना अतिशय आनंद वाटत होता. बगळे वरच्यावर आम्ही फेकलेले पदार्थ चोचीत झेलत होते. एक तासाचा  बोटीचा प्रवास पूर्ण करून आम्ही पैलतीरावर उतरलो. तेथून 40 किलोमीटर  अंतर जीप ने पूर्ण केले. त्यानंतर  हातगाड्यावर बसून आम्ही समुद्र व गंगा यांचा जिथे संगम होतो त्या पवित्र ठिकाणी पोहोचलो. विधिवत स्नान करून पूजा अर्चना केली.त्यानंतर आम्ही कपिलमुनी चे दर्शन घेतले.परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची म्हटलं की घोषणा झाली अहोटी लागली असल्यामुळे जहाज जाणार नाही. दिलीपभाऊंनी तात्काळ सूत्रे फिरवून आम्हाला दुसऱ्या धक्क्यावरून जहाजात बसवले .एक तास बोटीतून प्रवास करून   आम्ही आमच्या बस जवळ आलो. तिथे जेवण तयार होतेच. जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासासाठी लक्झरी बस मध्ये बसलो.दिवसभर भरपूर धावपळ झाली असल्यामुळे बसमध्ये बसल्या बसल्या सर्वांना झोप लागली. रात्री बाराच्या सुमारास आम्ही कलकत्त्यातील आमच्या हॉटेलवर पोहोचलो.

      

कोलकत्ता.. चार महानगर पैकी एक महानगर.. अतिशय दाट लोकसंख्या असलेले हे ठिकाण. बंगाली लोकांचा अभिमान. कोलकत्ता पाहण्यासाठी आम्ही सकाळी निघालो. सुरुवातीला कालीमाता दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचलो. मंदिरात भरपूर गर्दी होती. दर्शनासाठी वेळ जास्त  लागणार होता. रांगेत उभे राहून काही फायदा नव्हता. दिलीपभाऊनी चक्रे फिरवली. एका कर्मचाऱ्याला गाठून विशेष दर्शनाची व्यवस्था केल्यामुळे आम्हाला लवकर दर्शन मिळाले. तिथून आम्ही निघालो विक्टोरिया मेमोरियल पाहण्यासाठी .अनेक जुन्या वस्तूंचा संग्रह इंग्रजांनी या ठिकाणी केलेला होता. वस्तू कशी सांभाळून ठेवावी हे इंग्रजांकडून शिकावे. प्रचंड मोठा असलेला हा परिसर पाहिल्यानंतर सर्वांना भूक लागली होती. गार्डनच्या बाहेरच आमच्या जेवणाची व्यवस्था किरण,शैलेश व निलेश ने केली होती. हिरवळीवर जेवत असताना वनभोजनाचा आस्वाद घेतला. तेवढ्यात त्या ठिकाणाहुन ट्राम गेली. ट्राम ही दोन डब्याची रेल्वे रस्त्यावरून धावते, तीदेखील फक्त कोलकत्त्यातच.ट्राम पाहण्याची
आमची इच्छा अशा रीतीने अचानक पूर्ण झाली.दुपारच्या जेवणानंतर आम्ही निघालो बेलुर माठ पाहण्यासाठी. स्वामी  रामकृष्ण परमहंस यांचा हा मठ.स्वामी विवेकानंद यांच्या पद स्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण. कोलकत्त्यात कोणी आलं की काली माते नंतर बेलूर मठला जाणार म्हणजे जाणार. हा परिसर देखील फार मोठा होता .येथील स्वच्छता पाहण्यासारखी होती. या ठिकाणी गार्डनची अतिशय चांगली निगा राखली  आली होती. येथील विविध रंगांची फुले पाहून सेल्फी घेण्याचा मोह काही आवरला नाही. एकंदरीत आजचा दिवस अतिशय मजेत गेला होता.

 रात्रीच्या ट्रेनने आम्ही भुवनेश्वर कडे निघालो. दिवसभर थकल्यामुळे रात्री थर्ड ऐसी च्या थंडगार वातावरणात झोप कधी लागली ते समजले देखील नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी  आठच्या सुमारास भुवनेश्वरला उतरलो. तिथून लक्झरी बसने जगन्नाथपुरी कडे निघालो. साठ किलोमीटरचे अंतर दोन तासात पूर्ण करून आम्ही जगन्नाथपुरी ला पोहोचलो. होटेल विशाल प्लाझा ची बिल्डिंग अतिशय सुरेख होती. सगळ्यांना एसी रूम मिळाल्या नंतर गरम पाण्याने येथेच स्नान केले. नाश्ता वगैरे करून आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. तिथे असलेल्या कुलकर्णी या पंडितजीने मराठीतून आमच्याशी संवाद साधल्याचे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मंदिराची व्यवस्थित माहिती दिली. चार धाम पैकी असणारे हे जगन्नाथ धाम.या
मंदिरात  कृष्ण, बलराम आणि सुभद्रा अशा  भाऊ बहिणीच्या लाकडी मुर्त्या आहेत.  या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. या परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. या ठिकाणी कल्पवृक्षाचे देखील एक झाड आहे .इथे एकावर एक  सात मातीची भांडी रचून प्रसाद बनविला जातो. सर्वात आधी  शिजते ते वरच्या भांड्यातील अन्न 
आणि त्यानंतर क्रमाक्रमाने खालच्या भांड्यातील अन्न शिजते हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. जवळजवळ चार तास आम्ही मंदिरात घालवल्यानंतर हॉटेल ला पोहोचलो. तिथे दुपारचे जेवण केले आणि लक्झरी बसने जवळच असलेल्या साक्षी गोपाल मंदिराला भेट दिली. व्यवस्थित दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वजण गोल्डन बीच ला पोंहचलो.हे बीच अतिशय स्वच्छ व सुंदर आहे. या ठिकाणी भरपूर दंगा-मस्ती केली.बीच वरच  आमच्यासाठी चहाची व्यवस्था करण्यात आली होती .गरमागरम चहाचा आस्वाद घेत  कपल गेम खेळलो. त्यानंतर आम्ही हॉटेल ला पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी ओरिसा बंद होते, त्यामुळे दिलीपभाऊंनी आमची बैठक घेऊन परिस्थितीची कल्पना दिली .सर्वांनी सकाळी लवकर निघण्याचा बेत ठरवण्यात आला. त्यामुळे सकाळी साडेपाचला आम्ही हॉटेल सोडले. लक्झरी बसने आम्ही चंद्रभागा बीच वर गेलो.पहाटे च्या प्रसन्न वातावरणात  समुद्राच्या लाटांशी वय विसरून भरपूर मस्ती केली. प्रत्येकाने आपली फोटो काढण्याची हौस पूर्ण करून घेतली. त्यानंतर आम्ही निघालो कोणार्क सूर्य मंदिराकडे.  अद्भुत असे हे मंदिर आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष मूर्ती नसली तरी कलाकुसर पाहण्यासारखी आहे. गाईड ने या मंदिराची महती व्यवस्थित सांगितली. नवीन शंभराच्या नोटा वर सूर्य मंदिराचा फोटो आहे.आमच्या सर्वांचा ग्रुप फोटो काढून दिलीपभाऊंनी सर्वांना भेट दिला. त्यानंतर आम्ही जवळ असलेल्या एका गार्डन रेस्टॉरंट मध्ये दुपारच्या भोजनासाठी गेलो. त्या ठिकाणी आमची  उत्तम व्यवस्था केली होती व्यवस्था केली होती.  वनभोजनाचा आस्वाद घेत आम्ही जेवणावर ताव मारला. ओरिसा बंद असल्यामुळे पुढील प्रवास करता येणे शक्य नव्हते. ठिक ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला होता. त्यामुळे याच ठिकाणी टाइमपास करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळ मिळाला की त्याचा फायदा कसा घ्यावा हे दिलीपभाऊ कडून शिकावे. त्यांनी या ठिकाणी महिलांकडून फॅशन शो करून घेतला. कॅटवॉक करताना सर्वजण वय विसरून सामील झाल्यामुळे खूप मजा आली. त्यानंतर शैलेशने घेतलेल्या गाण्याच्या अंताक्षरीमध्ये सर्वजण सामील झाले.  

यानंतर आमच्या पैकी एका जोडप्याचा  लग्नाचा वाढदिवस चक्क त्यांचे पुन्हा एकदा लग्न लावून दिलीपभाऊ नी साजरा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी  रस्ता सुरू झाल्याचे सांगितल्यामुळे आम्ही तिथून पुढे बसने निघालो. भुवनेश्वर ला पोहोचल्यानंतर लिंगराज मंदिराचे दर्शन घेतले.  काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी लिंगराज मंदिरा ला भेट दिली असल्यामुळे त्यानंतर दर्शन घेणाऱ्या ची गर्दी दुपटीने वाढली होती. संध्याकाळचा चहा घेतल्यानंतर आम्ही सर्वजण भुवनेश्वर रेल्वे स्टेशनला पोहोचलो. या ठिकाणी सर्वांना बक्षिसेे देण्यात आली. यात्रेच्या कालावधीत यात्रेकरूंच्या स्वभावावरून त्यांना टायटल देऊन सत्कार करण्यात आला.आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता.  आतापर्यंत आम्ही सर्वजण एका परिवारातील सदस्य असल्यासारखे  रहात होतो. या प्रवासात काका-काकू, ताई भाऊ अशी नवीन नाती तयार झाली होती.दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हैदराबादला आल्यानंतर नांदेड कडे निघालो. संपूर्ण टूर अतिशय छान झाला होता. खरोखरच दिलीपभाऊ, किरण, शैलेश यांचे मानावे तितके  आभार कमी आहेत.  आमची फार चांगली काळजी या टीमने घेतली.कितीही कठीण प्रसंग आला तरी डगमगायचे नाही हा दिलीपभाऊंचा स्वभाव सर्वांना आवडला. राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था,  आरामदायी प्रवास, भरपूर मनोरंजन व अतिशय नियोजन बद्ध आखणी यामुळे हा टूर आमच्या कायमच्या स्मरणात राहणार यात वाद नाही. भविष्यात कोणीही डोळे झाकून दिलीपभाऊ सोबत यात्रेला जावे इतके आत्मविश्वासाने मी सांगू शकते. अनेक वयोवृद्ध व्यक्तींना सांभाळून ही टीम देवदर्शन घडवून आणत असल्यामुळे त्यांना भरपूर आशीर्वाद मिळतात. माय हॉलिडेज व भाऊ ट्रॅव्हल्सच्या सर्व टीम चे मनःपूर्वक आभार. शेवटी एवढेच म्हणेन की "दिलीप भाऊ सोबत सारे तीर्थ बार बार "

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News