भारतात मद्यपानाचे सर्वाधिक प्रमाण केरळ आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आढळते. त्याचप्रमाणे ११ टक्के लोकसंख्या खूप प्रमाणात व्यसनाधीन आहे. अल्कोहोल यकृतावर नक्की काय परिणाम करते? मद्यपानामुळे यकृताच्या अनेक व्याधी होतात.
१) यकृताच्या रक्ततपासण्यांमध्ये दोष आढळणे. २) फॅटी लीव्हर होणे, यकृतामध्ये चरबीचे प्रमाण वाढणे. ३) अल्कोहोलिक हिपॅटायटिस होणे. या आजारात तीव्र स्वरूपाची कावीळ होते. यकृताला सूज येऊन ते अतिशय मोठे होते आणि दुखू लागते. हा आजार खूप गंभीर स्वरूपाचा असतो आणि त्यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता असते. काही वेळा यकृतामुळे मेंदूला सूज येऊन ग्लानी येणे, पोटात पाणी होणे, रक्त पातळ होणे अशा प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. सुरवातीच्या काळात अशा रुग्णांची भूक मंदावलेली आढळते.
तज्ज्ञांकडून लवकरात लवकर उपचार करून घेणे आवश्यक आहे. प्रमाणाबाहेर मद्यपान व काही प्रसंगी यकृतावर अयोग्य परिणाम झाल्यामुळे हा रोग उद्भवतो.
अल्कोहोलिक लिव्हर सिऱ्हॉसिस
मद्यपानामुळे कालांतराने यकृतावर व्रण होऊन सिऱ्हॉसिसमध्ये रूपांतर होते आणि यकृताचा न बरा होणारा टोकाचा आजार होतो. एकदा सिऱ्हॉसिस झाला, की वरचेवर पोटात पाणी होणे, कावीळ होणे, रक्ताच्या उलट्या होणे, ग्लानी येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
यकृताचा आजार होण्याची इतर कारणे-
१. मद्यपानाचे प्रमाण : सर्वसाधारणपणे प्रत्येकाला कुतूहल असते, की किती प्रमाणात मद्य प्यायल्यामुळे यकृताचे आजार होतात. हे प्रमाण इंग्लंड/अमेरिकेतल्या लोकांसाठी नोंदविलेले आहे. ते पुरुषांमध्ये सुमारे ६० ते ८० ग्रॅम/ प्रतिदिन म्हणजेच सुमारे ५-६ रेग्युलर ड्रिंक्स ऑफ व्हिस्की, हार्ड लिकर किंवा बिअरचे ६ ते ८ कॅन एवढे आहे. या प्रमाणात सुमारे २० वर्षे मद्यपान केल्यास यकृताचा आजार होऊ शकतो. हे प्रमाण स्त्रियांमध्ये तर २० ग्रॅम एवढेच आहे. परंतु भारतीयांमध्ये परदेशी व्यक्तींपेक्षा शरीरयष्टी आणि गुणसूत्रांची जडणघडण वेगळी आहे. कमी प्रमाणात मद्यपान केल्यामुळेही यकृतावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
२. जेवणाच्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळी मद्यपान केल्यास हा विपरीत परिणाम ३ पटींनी अधिक होतो.
३. स्त्रियांमध्ये हे प्रमाण दुपटीने अधिक असते. कमी प्रमाणात व कमी काळ मद्यपान केल्यासही यकृतावर विपरीत परिणाम होतो. मद्यावर काम करणाऱ्या संप्रेरकाची मात्रा कमी असणे हे प्रमुख कारण आहे.
४. हिपॅटायटिस सी : रुग्णाला हिपॅटायटिसची लागण झालेली असल्यास मद्यपानाचा विपरीत परिणाम लवकर होतो.
५. आनुवांशिकतेमुळे काही व्यक्तींमध्ये यकृताचा आजार लवकर होतो. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकास मद्यामुळे यकृताचा आजार झाला असल्यास अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
६. Haemachronatosis हा आजार असल्यास मद्याचा परिणाम यकृतावर अधिक होतो.
७. आहार : कमी आहार आणि आहारामध्ये जीवनसत्त्व अ आणि इ चे प्रमाण कमी असल्यास यकृतावर विपरीत परिणाम होतो.