महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि जलदुर्गांची रेलचेल दिसूनयेते.मुंबईच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये काही जलदुर्ग आहेत. त्यांपैकीच एक आहे दंडा-राजपुरीजवळील अभेद्य जंजिरा किल्ला. जंजिऱ्याचा अर्थच आहे समुद्रानं वेढलेला किल्ला.
अरबी भाषेत त्याला जझिरा म्हणत असत. त्याचा अर्थ बेट. राजापुरी खाडीच्या मुखावर अगदी मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे. राजपुरीच्या पश्चिमेकडील समुद्रात एका विस्तीर्ण बेटावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या तटावरील ५७२ तोफांमुळं जंजिरा अभेद्य ठरला होता. या तोफांमध्ये ४० फूट लांबीची एक जंगी आणि लांब पल्ल्याची तोफ आहे आणि तिचं नाव आहे कलालबांगडी. त्याशिवाय चावडी आणि लांडा कासम नावाच्या आणखी दोन जबरदस्त तोफा होत्या. हबशी, म्हणजे आफ्रिकेतल्या ॲबिसिनिया देशातील निग्रो वंशियांनी इथं राज्य केल्यामुळं हा संपूर्ण परिसर त्या काळात हबसाण म्हणून प्रसिद्ध होता.
जंजिरा आणि परिसर पंधराव्या शतकात रामभाऊ पाटील नावाच्या एका कोळी राजाच्या अधिपत्याखाली होता. यादवांचं राज्य बुडाल्यानंतरही १४९०पर्यंत जंजिरा परिसर स्वतंत्र होता. या राजाचे पूर्वजच कदाचित जंजिऱ्याचे जनक असावेत. जुन्नरच्या मलिक अहमदने १४८५मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. राम पाटील यांच्या सैन्यानं त्याला पराभूत केलं. अहमदनगरचा निजाम मलिक अहमद १५०८ मध्ये मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा बुऱ्हाण गादीवर आला. त्या काळात स्थानिक आणि परदेशांतून येणारी गलबतं सागरी चाचे लुटत असत. या प्रदेशाचा ताबा मिळवण्यासाठी निजामानं व्यापाऱ्याच्या मिषानं पेरीमखान नावाच्या सरदारास पाठवलं.
पिरमखानानं सुरतेहून आल्याची बतावणी केली आणि त्याच्या मालाचे पेटारे किल्ल्यात आणले. घनघोर लढाई झाली आणि १४९०मध्ये किल्ला निजामाच्या ताब्यात आला. हुसेन निजामशाहनं १५६७मध्ये लाकडी कोटाच्या जागी दगडी किल्ला बांधण्याचा हुकूम दिला आणि १५७१मध्ये किल्ला तयार झाला. त्यानं किल्ल्याचं नामकरण जंजिरे मेहरूब असं केलं आणि सिद्दीवंशीय सरदाराकडं त्याची जबाबदारी सोपवली. मुरुड परिसरातून मिळणारं उत्पन्न आणि खर्चाची सांगड बसत नसल्यानं मलिक अंबरनं हा मुलूख तोडून नवी जहागीरदारी स्थापन केली आणि सिद्धी अंबरसानक याच्याकडं त्याची जबाबदारी सोपवली.
सिद्धी अंबरसानक हाच जंजिऱ्याचा संस्थापक ठरला. मलिक अंबर १६२५मध्ये मरण पावल्यानंतर जंजिऱ्याचे नवाब स्वतंत्र झाले. या घराण्याच्या २० नवाबांनी १९४८पर्यंत २२३ वर्षं राज्य केलं आणि अखेर भारतीय संघराज्यात विलीन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा, तर पेशव्यांनी एकदा हा किल्ला स्वराज्याला जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता.
किल्ल्यात जाण्यासाठी राजापुरी गावातून रोज होड्या सुटतात. प्रवेशद्वारावर गजान्तलक्ष्मीचं शिल्प आहे. या दरवाजावर नगारखाना आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर कलालबांगडी आणि इतर तोफा दिसतात. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डावीकडं पीरपंचायतनची वास्तू आहे. इथंच गलबतांचे गंजलेले नांगर दिसतात. इथून जवळच घोड्यांची पागा आहे.
पुढं गेल्यावर पडझड झालेली तीन मजली वास्तू दिसते. सुरुलखानाचा वाडा या नावानं ती ओळखली जाते. वाड्याच्या उत्तरेला मोठा गोड्या पाण्याचा षटकोनी आकाराचा तलाव आहे. त्याच्या चार कोपऱ्यांत चार हौद आहेत. बालेकिल्ल्याच्या मागे सदरेची चुनेगच्ची इमारत आहे. तलावाच्या बाजूने घडवलेल्या दगडी पायऱ्यांवरून गेल्यानंतर किल्ला सुरू होतो. किल्ल्याच्या पश्चिमेला तटातून बाहेर पडण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे.
त्याला दर्या दरवाजा म्हणतात. संकटकाळी इथून बाहेर पडता येत असे. किल्ल्याला एकूण २२ बुरूज आहेत. आजही ते सुस्थितीत आहेत. किल्ला पाहण्यासाठी तीन तास लागतात. जलदुर्गापासून जवळच एका कड्यावर सिद्दी नवाबांचा मोगल आणि गॉथिक शैलींचा मिलाफ असलेला ४५ एकरांत पसरलेला अहमदगंज नावाचा राजवाडा आहे. आता तो ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंदवला गेला आहे.
कसे जाल?
पुण्याहून ताम्हिणी घाटमार्गे सुमारे १६६ किलोमीटर. मुंबईहून सुमारे १६० किलोमीटर आहे. मुरुडमध्ये निवास आणि भोजनासाठी अनेक हॉटेल आणि उपाहारगृहे आहेत.