मुंबईच्या सुरक्षेसाठी हवा शुद्धीकरण यंत्रणा आवश्‍यक : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

दंडात्मक कारवाई सुरू

वांद्रे-कुर्ला संकुलातील विकासकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एमएमआरडीए आयुक्तांनी संबंधितांना दंड करण्याचा निर्णय नुकताच घेतला असून, अंमलबजावणीही सुरू झाली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या शहर कृती आराखड्यात परिसरातील कारखाने, सरकारी विभाग व संस्था यांचा सहभाग राहील. प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्रदूषणकारी उद्योगांवरही कारवाई होत असल्याची माहितीही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

मुंबई : मुंबई शहर व उपनगरांतील वायुप्रदूषणामुळे नागरिकांना नाक, तोंड, घसा, फुफ्फुस आदींचे आजार होऊन त्याचे रूपांतर कर्करोगात होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्रे उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.मुंबई, नवी मुंबई, भिवंडी येथे बांधकामे आणि कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्याबाबतचा प्रश्‍न देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर, योगेश सागर, यामिनी जाधव, सुनील राणे, मंगलप्रभात लोढा, प्रकाश फातर्पेकर आदींनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लेखी उत्तर दिले. वायुप्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनुसार मुंबई, नवी मुंबई, चंद्रपूर, उल्हासनगर, बदलापूर, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, जालना, सांगली, कोल्हापूर, लातूर, नाशिक, ठाणे व सोलापूर या शहरांसाठी कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू असल्याचेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे.

बांधकामांसाठीच्या प्लांटमधून उडणारी धूळ, धूलिकण, धूर, कारखान्यांचा धूर यामुळे या शहरांमधील हवा प्रदूषित असल्याची नोंद ‘सफर’ संस्थेने केली होती. भिवंडी शहराची नोंद तर पहिल्या १० प्रदूषित शहरांमध्ये झाली होती. याबाबत वेळीच उपाययोजना करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले होते. मुंबईच्या हवेतील तरंगत्या धूलिकणांचे परिमाण (पीएम १० व पीएम २.५) सरासरीपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना तोंड, नाक, घसा, फुफ्फुसे यांचे आजार होऊन त्याचे रूपांतर कर्करोगात होण्याचा धोका असतो. त्यामुळे मुंबईतील हवा शुद्ध करण्यासाठी ‘विंड ऑगमेंटेशन अँड प्युरिफाईंग’ यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचा मुद्दा या सदस्यांनी मांडला होता.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News