सामाजिक आरोग्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

गेल्या दोन-तीन दशकामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने भरीव कामगिरी केली आहे.

‘‘डॉक्‍टर, तुमचा हातगुण चांगला आहे.’’
‘‘डॉक्‍टर, तुम्ही गोड बोललात आणि मी बरा झालो.’’
‘‘तुमच्या एका इंजेक्‍शनने मी ठणठणीत झालो.’’
ही अतिशयोक्ती वाटणारी विधाने असले, तरी त्यात किती तथ्य आहे, हे एखादा रुग्णच सांगू शकेल.

गेल्या दोन-तीन दशकामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने भरीव कामगिरी केली आहे. रोगनिदान करण्यासाठी आणि रोगावर उपचार करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची खूप मदत होत आहे. 

सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्‍स-रे, अद्ययावत लॅब व चाचण्या, सुसज्ज आईसीयू, ऑपरेशन थिएटर व स्पेशालिस्ट सुपरस्पेशालिस्ट डॉक्‍टर्स आज जनतेसाठी उपलब्ध आहेत. परंतु डॉक्‍टर, रुग्ण यांच्यातील नाते कळीचा मुद्दा बनलेला आहे. 

डॉक्‍टरांना होणारी मारहाण, सरकारी दवाखान्यावर असणारा अविश्‍वास, गरीब व मध्यमवर्गीयांना न परवडणारा खासगी उपचार, उदयास येणारे नवनवीन रोग, रुग्ण व डॉक्‍टरांच्या वाढलेल्या अपेक्षा तसेच एकमेकांवरच्या शंका या ढासळत चालेल्या ‘सामाजिक आरोग्याची’ लक्षणे आहेत. भारताच्या आरोग्याशी निगडीत निर्देशकांमध्ये सुधारणा होत असतानाच ढासळत चाललेल्या ‘सामाजिक आरोग्या’बद्दल चिंता वाटते.

सर्वच डॉक्‍टर प्रत्येक उपचारात यश मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. यात शंका घ्यायला कुठेही जागा नाही. परंतु, प्रत्येकवेळी ते यशस्वी होतील, असेही सांगता येत नाही. वैद्यकीय शास्त्रामध्ये गणिताची समीकरणे लागू पडत नाहीत. प्रत्येक आजार व त्याचे परिणाम हे रुग्णांनुसार विभिन्न असतात. रुग्णांना झालेला आजार, त्यामधील कारणे, वेळेत उपचार होण्याचे फायदे आदींची माहिती रुग्ण, नातेवाईकांपर्यंत पोचविले जावे.

त्यातून डॉक्‍टर व रुग्ण, नातेवाईक यांनी एकत्रितपणे निर्णय घेणे एक आदर्श पद्धत ठरू शकेल. रुग्णाला झालेल्या आजाराविषयी, गुंतागुंतीविषयी नातेवाईकांशी मोकळेपणाने बोलायला सध्या डॉक्‍टर कुठेतरी कमी पडत असावेत, असे वाटते. ‘डॉक्‍टर म्हणजे देव’ किंवा ‘डॉक्‍टर म्हणजे दानव’ या प्रकारच्या भूमिकांच्या भारतीय छटा लक्षात घेण्यासारख्या आहेत. परंतु, डॉक्‍टरही एक माणूस आहे. त्यांना मानवासारखेच राहून जनतेची निरंतर सेवा करू द्या. एकमेकांवरचा विश्‍वास व एकमेकांतील सुसंवादच एकमेकाला तारू शकतात व एक सदृढ समाज घडवू शकतात. शेवटी एक म्हणावेसे वाटते...
चला....

एकमेकाशी सुसंवाद साधूया ।।
एकमेकांना धीर देऊ या  ।।

सध्या जनतेचा डॉक्‍टरांवरील विश्‍वास कमी झालेला आहे. पेशंट व डॉक्‍टर एकमेकांपासून अलिप्त होताना दिसत आहेत. बदललेल्या सामाजिक परिस्थितीने डॉक्‍टर व पेशंट या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. त्यामुळे डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यात सुसंवाद वाढून विश्वासाचे नाते तयार होणे अंत्यत गरजेचे बनले आहे.
- डॉ. आर. जी. विवेकी, अध्यक्ष, आयएमए, बेळगाव.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News