सुंदर व रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, देवालये आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्याला नेहमीच पर्यटकांची पसंती असते. रायगड, मुरूड-जंजिरा किल्ला, अलिबाग, दिवेआगर, मुरूड-काशीद असे समुद्रकिनारे, महड व पालीचा गणपती अशी काही ठराविक ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनस्थळे सोडल्यास जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या पर्यटनस्थळांकडे पर्यटक पाठ फिरविताना दिसतात. जिल्ह्यात अनेक पर्यटन व ऐतिहासिक ठिकाणे आहेत तिथे योग्य सोई-सुविधा करून विकास साधल्यास पर्यटकांना भुरळ घालू शकतात. त्यांचाही विकास होऊन रोजगारनिर्मितीला वाव मिळू शकतो.
रायगड, मरूड-जंजिरा, कुलाबा, कर्नाळा या किल्ल्यांवर नेहमीच शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळते; परंतु शिवरायांच्या काळातील अनेक गड-किल्ले आहेत. ज्याचा विसर शिवप्रेमींना झाला आहे. त्यामध्ये अलिबागजवळील भव्य जलदुर्ग खांदेरी-उंदेरी, चौलचा किल्ला, मुरडजवळील कोर्लई किल्ला, रायगडावर निजामपूर मार्गे जाताना लागणारे माणगाव तालुक्यातील माणगड व कुर्डूगड (विश्रामगड) पालीजवळ असलेले सरगड व सुधागड हे भव्य किल्ले. शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेली उंबर खिंड, तळा तालुक्यातील तळगड किल्ला त्याच्यासमोरच दिसणारा घोसाळगड किल्ला.
पाचाड येथे असलेली जिजाबाईंची समाधी या सर्व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू उपेक्षित आहेत; मात्र येथे अजूनही म्हणावा तसा विकास झालेला नाही. अनेक वास्तूंची पडझड झाली आहे. रायगड किल्ल्यावर दुरुस्ती व सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत; मात्र इतर ठिकाणीही लक्ष दिल्यास तेथील महत्त्व वाढणार आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
समुद्रकिनारे ओस
जिल्ह्याला २४० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे; परंतु अलिबाग, नागाव, मुरूड, काशीद, हरिहरेश्वर असे काही ठराविक समुद्रकिनारे सोडल्यास अनेक चांगल्या किनारी पर्यटक फिरकत नाहीत. त्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव, शेखाडी, बागमांडला, दिघी येथील मनोहारी समुद्रकिनारे तसेच अलिबाग व मुरूडमधील अनेक समुद्रकिनारे ओस असतात. समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण, दिवाबत्तीची सोय, चांगले रस्ते, स्वच्छता, पार्किंगच्या सुविधा, एमटीडीसीसारख्या हॉटेलची व्यवस्था, कोकण मेव्याच्या उद्योगांची निर्मिती तसेच स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन दिल्यास येथेही सागरी पर्यटन बहरू शकेल. काही ठराविक समुद्रकिनारे सोडल्यास अनेक चांगल्या किनारी पर्यटक फिरकत नाहीत.
शूरवीरांची स्मारके दुर्लक्षित
खालापूर तालुक्यातील पाली-खोपोली मार्गावर शेमडी गावापासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेली उंबरखिंड जेथे शिवरायांनी अवघ्या एक हजार सैनाला घेऊन स्वराज्यावर चाल करून आलेल्या कारतलबखानचा पाडाव केला. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयस्तंभ तेथे उभारण्यात आला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे ठिकाण खूपच आकर्षक आहे. पुणे-मुंबईच्या पर्यटकांना येथे सहज येता येऊ शकते; परंतु हे ठिकाण सध्या उपेक्षित आहे. गड आला पण सिंह गेला त्या नरवीर तानाजी मालुसरेंचे जन्मगाव पोलादपूर तालुक्यातील उमरठ गाव. तेथे तानाजी व मराठ्यांचा शूर सरदार शेलारमामांची समाधी आहे. तानाजींचा भव्य पुतळाही आहे; परंतु ते पाहण्यासाठी आमचे शिवप्रेमी तेथे फिरकत नाहीत. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मस्थळ असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांच्या घरातील चौथऱ्यावर पेशवे स्मारक/मंदिर उभारण्यात आले आहे; परंतु तेथेही कोणी फारसे जात नाही, अशी अनेक स्मारके दुर्लक्षित आहेत.
प्राचीन लेण्यांची दुरवस्था
महाडकडे जाताना महामार्गाच्या कडेलाच गांधारपाले गावाजवळ डोंगरात कोरलेल्या २९ भव्य बौद्ध लेण्या आहेत. रायगडावर जाणारे पर्यटक फक्त रस्त्यावरूनच या लेण्या पाहतात व पुढे मार्गस्थ होतात. तसेच माणगाव तालुक्यातीत मांदाड खाडी मुखाजवळ डोंगरात कोरलेल्या खाडी वीस बौद्ध लेणी आहेत. सुधागड तालुक्यातील नेणवली येथील एकवीस लेणी तर गोमाशी गावजवळी प्राचीन भृगू ऋषींचे लेणे आहे. अशा अनेक प्राचीन लेण्यांची दुरवस्था झाली आहे. पुरातत्त्व खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे. येथे निधी उपलब्ध करून देऊन या ठिकाणांची प्रसिद्धी केल्यास या लेण्यांनाही महत्त्व प्राप्त होईल.
वारसा मोठा; पण...
शिरढोण आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव तेथे त्यांचा वाडा आहे. कर्नाळा किल्ल्यावर अनेक लोक जातात; परंतु क्रांतिवीरांच्या वाड्यावर फारसे कोणी जात नाही. विनोबा भावे यांचे पेण तालुक्यातील गागोदे हे जन्मगाव तेथे त्यांचा वाडा आहे. क्वचित शाळेतील मुलांच्या ठराविक सहलींशिवाय येथे कोणीही जात नाही. माणगाव तालुक्यातील वडघर येथे साने गुरुजींचे स्मारक आहे. त्यांच्या स्वप्नातील आंतरभारतीची कल्पना येथे साकारली आहे. भारतातील सर्व भाषांचे अनुवाद केंद्र येथे आहे; परंतु येथे जाण्याची तसदी फारशी कोणी घेत नाही. बॅ. ए. आर अंतुले यांचे आंबेत गाव, पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे रोहा येथील निवासस्थान, तेथीलच स्वाध्याय परिवाराचे अध्वर्यू पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जन्मगावही दुर्लक्षित राहिले आहे.
शिवथरघळीकडे दुर्लक्ष
महाड-पोलादपूर रस्त्यावरून शिवथरघळीकडे जाणारा फाटा आहे. महाडवरून येथे जाण्यास बस सेवा उपलब्ध आहे. शांत, नीरव व रमणीय या घळीत समर्थांनी दहा वर्षे वास्तव केले होते. येथेच त्यांनी दासबोधाची निर्मिती केली. या मठास सुंदरमठ म्हणतात. धुळ्याचे श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी १९३० मध्ये या घळीचा शोध लावला. डोंगरदऱ्यांत व दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी फारसे कोणी येत नाही.
गरम पाण्याच्या झऱ्याला प्रतीक्षा
पालीपासून अवघ्या तीन किमीवर असलेल्या उन्हेरे येथील तसेच महाड तालुक्यातील सव येथील गरम पाण्याच्या झऱ्यांकडे पर्यटक फारसे फिरकताना दिसत नाहीत. उन्हेरे येथे दोन गरम पाण्याचे कुंड आहेत. बाहेरील कुंड मोकळा आहे. महिला व पुरुषांसाठी एका कुंडाचे दोन विभाग केले असून, ते चारही बाजूंनी बंदिस्थ आहेत. गंधक मिश्रित असलेल्या औषधी गुणधर्माच्या या पाण्यात आंघोळ केल्यास अनेक त्वचाविकार बरे होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. येथे दोन्ही ठिकाणी निवासाची, स्वच्छतागृहाची सोय करून दिल्यास अधिक पर्यटक येतील.
संग्रहालयांकडे पर्यटकांची पाठ
अलिबाग तालुक्यात सासवणे गावात प्रसिद्ध शिल्पकार करमरकरांचे संग्रहालय आहे. शशांक काठे यांचे खडूपासून निर्माण केलेले शिल्पाचे अनोखे संग्रहालय. तसेच रोहा तालुक्यात कोलाड गावाजवळ मुंबई-गोवा मार्गावर घोणे यांचे काष्ठशिल्पांचे संग्रहालय आहे. या दोन्हीही संग्रहालयांकडे पर्यटक पाठ फिरवत असल्याचे दिसतात.
चौल, रेवदंडा शहरांची शोकांतिका
भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी अफनासी निकितीने इ.स. १४७२ च्या सुमारास चौल, रेवदंडा बंदरात प्रवेश केला होता. रेवदंडा येथे त्याचे स्मारक उभारण्यात आले आहे. चौल हे प्राचीन ऐतिहासिक शहर व शिलाहार राजाची राजधानी होती. अनेक प्राचीन मंदिरेही आहेत. मोघल, पोर्तुगीज व मराठेकालीन राजवटींचे अनेक अवशेष आढळतात. शोकांतिका म्हणजे समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी अलिबाग व मुरूडकडे येणारे पर्यटक या गावांवरून जाऊनही तेथे फारसे थांबत नाहीत. याचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे.